५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गोवा येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी (वय ७ वर्षे)!

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईश्‍वरी जोशी ही आहे !

कु. ईश्‍वरी जोशी

(‘डिसेंबर २०१४ मध्ये कु. ईश्‍वरीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी (४.१.२०१९) या दिवशी पणजी (गोवा) येथील कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. नीटनेटकेपणा

‘कु. ईश्‍वरी हिच्या कपाटातील कपडे आणि अभ्यासाच्या पुस्तकांचा खण व्यवस्थित आवरलेला लागतो. मी अनेक दिवस खण न आवरल्यास ती मला म्हणते, ‘‘आई, चल आपण खण आवरूया.’’

२. उत्तम स्मरणशक्ती

अ. कु. ईश्‍वरीची स्मरणशक्ती उत्तम (Photographic Memory) आहे. कुठलीही गोष्ट केवळ एकदा पाहिल्यावर ती तिच्या स्मरणात रहाते.

आ. ईश्‍वरी ४ वर्षांची असल्यापासून तिला रामरक्षा, मारुतिस्तोत्र, गणपतिस्तोत्र, चंडीकवच मुखोद्गत आहेत. तिला वरील स्तोत्रे अल्प कालावधीत पाठ झाली आहेत.

इ. आम्ही घर पालटल्यावर ‘कुठल्या पोत्यात काय साहित्य भरले आहे ?’, हे आम्ही (मी आणि पती) दोघांनी साहित्य भरूनही आम्हाला आठवत नव्हते. तिने आम्हाला ‘काय हवे आहे ?’, असे विचारले आणि आम्ही वस्तूचे नाव सांगितल्यावर तिने ‘ते कुठल्या पोत्यात आहे ?’, हे अचूक सांगितले. त्या वेळी तिचे वय ५ वर्षे होते.

३. उत्तम आकलनक्षमता

आम्ही घरी लादी पुसण्याचा मॉप आणल्यावर तिने ‘आम्ही तो कसा बसवला ?’, ते एकदाच पाहिले. साधारणतः सहा मासांनी आजोळी गेल्यावर तसाच मॉप आणल्यावर तिने स्वतःच तो मॉप खोक्यातून काढला आणि आजी-आजोबांनी त्याचे माहितीपत्रक (मॅन्युअल) पहाण्याच्या आतच त्यांना तो बसवून दाखवला.

४. घरकाम करण्याची आवड

अ. मी माहेरी गेल्यावर तिने आजीला भांडी घासतांना पाहून आजीजवळ हट्ट धरला, ‘‘मला आता भांडी घासता येतात. तू मला भांडी घासायला दे.’’ आईने हसून सांगितले, ‘‘आधी मोठी हो. मग देते’’, तरीही तिने मागे लागून भांडी घासायला मागितलीच. लहान-मोठी ताटे, वाट्या, पेले अशी १० ते १५ भांडी तिने घासली. तिची भांडी घासून झाल्यावर आई मला म्हणाली, ‘‘तू भांडी घासल्यावर त्यावर साबणाचे डाग उमटलेले असतात. नंतर ते मला स्वच्छ करावे लागतात. याउलट ईश्‍वरीने घासलेली भांडी अगदी स्वच्छ आहेत.’’

आ. मी घरी धान्य निवडत असतांना एकदा ती मला म्हणाली, ‘‘आई, तू मला धान्य निवडायला शिकव ना, नाहीतर मी मोठी झाल्यावर मला कसे येणार ?’’

इ. एकदा तिने आजीच्या मागे लागून स्वयंपाकघरातील मळके कापड धुणे धुण्याच्या दगडावर घासून स्वच्छ केले.

ई. ती मला कपड्यांच्या घड्या घालणे, झाडणे, मॉपने लादी पुसणे इत्यादी कामांत साहाय्य करते. कपडे शिलाईयंत्रावर शिवणे, पोळ्या करणे, अशी कामे तिला शिकायची आहेत. ती त्यासाठीही हट्ट करते.

उ. ती अडीच वर्षांची असतांना ती आणि चि. श्रीरंग सुदेश दळवी भातुकली खेळत होते. श्रीरंगचे आजोबा पू. रमेश गडकरीकाका तिच्याकडे पाहून म्हणाले, ‘‘ही मुलगी पुढे संसार चांगला करील.’’

५. विविध कलागुण अवगत असणे

५ अ. संगीत – गाणी केवळ ऐकूनच सूर-ताल-लयीत म्हणायला शिकणे : कु. ईश्‍वरी हिला लहानपणापासून संगीत आणि नृत्य यांची आवड आहे. मी घरात काम करतांना अनेकदा मराठी आणि हिंदी भजने, तसेच भक्तीगीते म्हणत असते. ईश्‍वरी केवळ ऐकूनच गाणी सूर-ताल-लयीत म्हणायला शिकली. तिला आणलेल्या बालगीतांच्या पुस्तकातील अनेक बालगीतांना ती स्वतःहून चाल लावते.

५ आ. नृत्य – कु. ईश्‍वरीची नृत्याची आवड पाहून शाळेतील शिक्षिकेने तिला नृत्याच्या शिकवणीवर्गाला पाठवण्यास सांगणे आणि तिला चांगले नृत्य करता येत असल्याने वर्गातील नृत्याच्या अनेक कार्यक्रमांत त्यांनी तिला सर्वांत पुढे उभे राहून नृत्य करण्याची संधी देणे : ईश्‍वरीला नृत्याची, विशेषतः ‘भरतनाट्यम्’ या भारतीय नृत्यप्रकाराची आवड आहे. आतापर्यंत आम्ही तिला कुठल्याही शिकवणीवर्गाला घातलेले नाही. ती शिशु गटात (वय ४ वषेर्र्) असतांना शाळेतील समूहनृत्यात तिला घेतले होते. ईश्‍वरीने मोठ्या वर्गातील मुलींना शिकवला जाणारा शास्त्रीय नृत्यप्रकारातील पदन्यास करून दाखवला. तेव्हा तिची नृत्याची आवड बघून बाईंनी आम्हाला तिला शिकवणीवर्गाला घालायला सांगितले.

लहानपणी (अदमासे वय ३ ते ४ वर्षे) ती दूरचित्रवाणीवर कुठलेही शास्त्रीय नृत्य लागल्यास ते टक लावून पहायची. तिला पणजीत प्रतीवर्षी होणारा विविध भारतीय लोककलांवर आधारित ‘लोकोत्सव’ हा कार्यक्रम पुष्कळ आवडतो. तिला चांगले नृत्य करता असल्याने वर्गातील नृत्याच्या अनेक कार्यक्रमांत बाई तिला सर्वांत पुढे उभे राहून नृत्य करण्याची संधी देतात.

मी भक्तीगीत म्हणत असतांना ती त्याचा अर्थ विचारून घेऊन त्यानुसार स्वतः पदन्यास ठरवून नृत्य करते.

५ इ. वादन – खेळण्यातील ‘कॅसिओ’वर राष्ट्रगीत आणि बालगीते वाजवायला लवकर शिकणे : यावर्षी उन्हाळ्याच्या सुटीत आजोळी गेली असतांना तिला आजोबांनी (माझ्या वडिलांनी) खेळण्यातील कॅसिओ घेऊन दिला. त्यावर पूर्ण राष्ट्रगीत वाजवायला ती दोन दिवसांत शिकली. त्यानंतर ती बालगीतेही वाजवायला शिकली. १० दिवसांत ती नवीन गीतांचे ‘नोटेशन’ सिद्ध करायला शिकली. मी कॅसिओवर नवीन गाणी वाजवत असतांना माझे वाजवायचे चुकले, तर ती लगेच तसे सांगून मला ‘नोटेशन’ शोधून देत असे.

५ इ १. अनुभूती – तिला हार्मोनियम वाजवतांना एकदा समुद्र दिसला, तर एकदा खोल गेल्यासारखे वाटले.

५ ई. चित्रकला – वेगवेगळ्या विषयांवरील निसर्गचित्रे; सणांची अन् देवतांची चित्रे, तसेच मानवी आकृत्या तपशिलासह काढणे : वर्ष २०१८ मध्ये ईश्‍वरीमध्ये चित्रकला या विषयातही बरीच आवड आणि गती दिसून येत आहे. मागील वर्षी तिला चित्रकलेची आवडही नव्हती आणि ती चित्रे काढायला बसली, तर तिला ते विशेष जमतही नसे. तिचा मूळ पिंड चित्रकलेचा नसेल; म्हणून आम्ही लक्ष दिले नाही. यावर्षी ती स्वतःहून वेगवेगळ्या विषयांवरील निसर्गचित्रे, सणांची अन् देवतांची चित्रे, तसेच मानवी आकृत्या तपशिलासह काढते. तिच्या चित्रांतील साधकांना ती सणानुरूप केशरचना, वेशभूषा आणि अलंकार यांनी नटवते.

५ उ. रांगोळी – रांगोळीकडे लक्षपूर्वक पाहून ते शिकण्याचा प्रयत्न करणे : तिला रांगोळी काढायला आवडते. तिला अजून रांगोळी बोटांतून सोडणे जमत नसल्याने ती तुळशीच्या कुंडीसमोर रांगोळीच्या सोप्या नक्षी काढते. तिला प्रत्येक सणाला उंबरठ्यावर, दाराबाहेर, देवासमोर आणि तुळशीसमोर स्वतः रांगोळी काढायची असते. मी तिला रांगोळी काढू देत नसल्याने मी काढत असलेल्या रांगोळीकडे लक्षपूर्वक पाहून ते शिकण्याचा ती प्रयत्न करते.

५ ऊ. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे : तिच्या जुन्या झग्याची बटणे, रंगीत वेष्टने (गिफ्ट रॅपिंग पेपर), जुन्या लेस, लग्नपत्रिका, आईस्क्रीमचे कप, प्लास्टिकचे चमचे इत्यादी वस्तू ती जपून ठेवते. माझे साहाय्य घेऊन तिने बर्‍याच वस्तू सिद्ध केल्या आहेत.

५ ए. मातीकाम : तिला मातीकाम आवडते. आजकाल पेठेत मिळणार्‍या ‘मॉडेल क्ले’ने विविध वस्तू बनवायला तिला आवडते. ती प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक हाताळते आणि काटकसरीने वापरते.

६. शिकण्याची वृत्ती

ईश्‍वरी वयाच्या पाचव्या वर्षी बालवर्गात असतांना घरी मला ‘जोडाक्षरे कशी लिहायची ?’, हे विचारायची. त्या वेळी मला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक असल्याने मी तिला साहाय्य करणे तर दूरच; पण माझी तिच्यावरच चिडचिड व्हायची. मी तिला ‘पुस्तकात पाहून कसे काढायचे, ते शिक’, असे म्हणायचे. ती पुस्तकात पाहून ‘कुठल्या अक्षराला कुठले अक्षर जोडल्यावर जोडाक्षर सिद्ध होते ?’, ते स्वतःचे स्वतः शिकली.

– सौ. प्रांजली प्रदीप जोशी (आई), पणजी, गोवा.

(कु. ईश्‍वरीची अन्य गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)


Multi Language |Offline reading | PDF