राष्ट्र आणि धर्महितैषी अंक निघावेत !

दोन मासांपूर्वी दिवाळी सण साजरा झाला. दिवाळीत दिवाळी अंकांची विशेष चर्चा असते. हे अंक विशेषत: दिवाळीनंतर वाचले जातात. सुशिक्षित आणि वाचनसंस्कृतीची आवड असलेल्या कोणत्याही घरात किमान एक तरी दिवाळी अंक हमखास आढळून येतो. शहरातील वाचनालयेही दिवाळीनंतर सर्व दिवाळी अंक वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात. वाचकप्रेमीही हे अंक वाचून आपली वाचनाची भूक भागवतात. महाराष्ट्रात अनुमाने ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात. पहिल्या दिवाळी अंकाचा मान काशिनाथ रघुनाथ मित्र यांच्या १९०९ या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘मनोरंजन’ या दिवाळी अंकास जातो. वर्ष २०१९ मधील दिवाळी अंकाकडे नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे अजूनही दिवाळी अंक पूर्वीच्याच चाकोरीत अडकलेले आहेत. सध्याच्या भीषण कालगतीचे भान त्यांना नाही. वाचकांना विचारप्रवण करून त्यांची अभिरुची समृद्ध करणे आणि नव्या लेखकांना व्यासपीठ निर्माण करण्याचे दायित्व दिवाळी अंकांनी पेलले होते. सध्याच्या दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच, एखाद्या विषयावर परीसंवादात्मक चर्चा, खेळ, पाकस्पर्धा अशा विषयांची रेलचेल असते. लोकांना जे आवडते ते देवून खप वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पूर्वीचा काळ हा थोडा चांगला काळ असल्याने ते ठीक होते; परंतु सध्याची देशाची राजकीय आणि सामाजिक स्थिती दिवसेदिवस गंभीर होत आहे. नोटाबंदी आणि जी.एस्.टी. यांमुळे महसुलात घट झाल्याने देशाची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडील राखीव निधीला हात घालण्याची अवदसा आठवत आहे. हिंदूंचे प्रचंड धर्मांतर होत आहे. ‘लव्ह जिहाद’ सारख्या समस्येमुळे हिंदूंचा वंशविच्छेद होत आहे. नक्षलसमर्थकांची सरकार उलथवण्याची सिद्धता चालू आहे. या अशा बिकट प्रसंगी वाचकांना वास्तवतेची जाणीव करून देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने याचे भान आपल्याकडील संपादक आणि लेखक मंडळींना नाही. अजूनही कथा, कादंबरी, कविता असे लिखाण दिवाळी अंकात दिले जाते. कालानुरूप दिवाळी अंकातील लिखाणात पालट करणे आवश्यक आहे. सद्यकालीन समस्येचे विषय दिवाळी अंकात हाताळणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दिवाळी अंकातून लव्ह जिहाद, धर्मांतर, बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोर, देशाची राष्ट्रीय सुरक्षा यांसारखे समस्यांचे विषय हाताळून त्याच्या भीषणतेची जाणीव हिंदूंना करून देणे आवश्यक आहे. वाचनातून पुष्कळ शिकायला मिळते. वैचारिक प्रगल्भता वाढते. एखादी समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याची विचार प्रक्रिया चालू होते. हे वाचन संस्कृतीचे लाभ आहेत. यासाठी सध्याची समाज, राष्ट्र, धर्माची स्थिती अवलोकून वाचकांना काय आवडते यापेक्षा राष्ट्र आणि धर्म हिताच्या व्यापक दृष्टीने काय आवश्यक आहे, याचा विचार आपल्याकडील विद्वान संपादक मंडळी करतील का ?

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF