एस्.एस्.आर्.एफ्.च्या अमेरिकेतील साधिका सौ. शिल्पा कुडतरकर (वय ४८ वर्षे) संतपदी विराजमान

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांच्या मांदियाळीत आणखी एका संतरत्नाची भर !

एस्.एस्.आर्.एफ्.चे ६ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

रामनाथी – विदेशात अध्यात्मप्रसार करणार्‍या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वार्षिक आंतरराष्ट्रीय शिबिराला आज सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात प्रारंभ झाला. प्रतिवर्षी जानेवारी मासात हे शिबीर आयोजित करण्यात येते. या शिबिरात साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची सुवार्ता समजते. त्यामुळे ‘आजच्या या कार्यक्रमात श्रीकृष्ण आपल्याला काय भावभेट देणार ?’ याकडे उपस्थित साधकांचे लक्ष लागले होते. कार्यक्रमस्थळीही वेगळेच चैतन्य जाणवत होते. कार्यक्रमाला आरंभ झाल्यावर व्यासपिठावर उपस्थित असलेले सद्गुरु सिरियाक वाले, पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली, पू. रेन्डी इकारांतियो यांनी साधकांची गुणवैशिष्ट्ये सांगत ऑस्ट्रिया येथील चि. नारायण डूर् (वय २ वर्षे), त्याची आई सौ. लवनिता डूर् (वय २३ वर्षे), इंडोनेशिया येथील श्री. फ्रान्सिकस बुडाअजी (वय २६ वर्षे), फ्रान्स येथील गियोम ऑलिव्हिए (वय २५ वर्षे), कॅनडा येथील अ‍ॅलन हार्डि (वय ५२ वर्षे) आणि सिंगापूर येथील व्हिन्सेंट मलहेर्बे (वय ३८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता दिली.  साधकांच्या सत्काराच्या कार्यक्रमानंतर या शिबिराच्या आयोजक आणि व्यासपिठावर उपस्थित असलेल्या अमेरिकेतील साधिका सौ. शिल्पा कुडतरकर, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला किती भरभरून देत आहेत’, हे सांगत होत्या.

त्या वेळी पू. भावना शिंदे-हर्ली यांनी सौ. शिल्पा कुडतरकर यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला संदेश वाचून दाखवला.

‘सौ. शिल्पाताईंनी ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद गाठले आहे’, असे गुरुदेवांनी कळवले आहे’, असे पू. भावनाताईंनी सांगितल्यावर साधकांची भावजागृती झाली.

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर या दोनापावला, गोवा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक कै. प्रभाकर वेरेकर आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कै. डॉ. (सौ.) मंगला वेरेकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती श्री. राजीव कुडतरकर यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

चैतन्याची उधळण करणारा आणि साधकांना भावस्थितीत ठेवणारा सोहळा !

शिबिरामध्ये इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका, भारत, लेबनन, ऑस्ट्रिया, इंग्लंड, फ्रान्स, स्कॉटलँड, जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, अल् साल्वादोर, बोलिव्हिया, एशिया पॅसिफिक आदी १९ देशांतील ६५ साधक सहभागी झाले आहेत. जगभरातील १०५ साधकही ‘ऑनलाईन’द्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सद्गुरु सिरियाक वाले, पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली, पू. रेन्डी इकारांतियो आणि पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांनी संबोधित केले. या वेळी कार्यक्रमात मधे मधे भावप्रयोग घेण्यात आले, तसेच प्रार्थनाही करण्यात येत होत्या. त्यामुळे साधक भावस्थितीत होते.

अमेरिकेसारख्या रज-तमाचे आधिक्य असलेल्या ठिकाणी राहूनही समष्टी साधना करून सौ. शिल्पा कुडतरकर संत झाली ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोव्यात सनातन संस्थेचे कार्य वाढू लागले आणि सनातनचे साधक-दांपत्य डॉ. (सौ.) मंगला आणि श्री. प्रभाकर (भाई) वेरेकर यांच्या दोनापावला, पणजी येथील बंगल्याचे जणू सनातनच्या आश्रमात रूपांतर झाले. दैनिक सनातन प्रभातचा आरंभही तेथूनच झाला. वेरेकर दांपत्याची कन्या शिल्पा हिलाही साधनेची गोडी लागली. वर्ष १९९६ मध्ये विवाहानंतर अमेरिकेला जातांना ती मला भेटायला आली. तेव्हा ‘माझ्याकडून पहिल्याप्रमाणे मार्गदर्शन मिळू शकणार नाही’, या विचाराने ती खिन्न झाली होती. तिची खिन्नता पाहून मला पुढील ओळी सुचल्या. त्या पटकन लिहून मी तिला तो कागद दिला. तो वाचल्यावर तिला वाटणारी खिन्नता दूर झाली आणि ‘ईश्‍वर अमेरिकेतही मार्गदर्शन करील’, अशी खात्री वाटून ती शांतपणे निरोप घेऊ शकली. त्या ओळी पुढीलप्रमाणे होत्या,

‘स्थूल देहा असे । स्थळकाळाची मर्यादा ।

कैसे असू सर्वदा । सर्वा ठायी ॥

सनातन संस्था । माझे नित्य रूप ।

त्या रूपे मी सर्वत्र । आहे सदा ॥’

सेवेची आणि ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ असलेल्या शिल्पाने अमेरिकेत गेल्यावरही अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू ठेवले अन् ‘अमेरिकेसारख्या रज-तमाचे आधिक्य असलेल्या ठिकाणी राहूनही समष्टी साधना चांगल्या प्रकारे कशी करता येते ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. आई-वडिलांच्या त्यागी वृत्तीचा वारसा शिल्पानेही घेतला असून न्यूजर्सी, अमेरिका येथील तिचे राहते घर म्हणजे ‘एस्.एस्.आर.एफ्.चे सेवाकेंद्रच बनले आहे. तेथे एस्.एस्.आर.एफ्.च्या कार्यशाळा होतात, तसेच साधकही वास्तव्याला असतात. सौ. शिल्पाचे पती श्री. राजीव यांचेही कौतुक करावे, तेवढे थोडेच ! पत्नीच्या सेवाकार्याला आणि साधनेला अशा प्रकारे साथ देणे, हे त्यांच्यातील उत्तम साधकत्व दर्शवते. त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.

वर्ष २०१८ च्या गुरुपौर्णिमेला शिल्पाची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के होती. अवघ्या ५ मासांतच ३ टक्क्यांनी वाढून ती आता ७० टक्के झाली आहे आणि पू. (सौ.) शिल्पा राजीव कुडतरकर ‘एस्.एस्.आर.एफ्.च्या ‘५ व्या समष्टी संतपदावर विराजमान झाल्या आहेत.

‘पू. (सौ.) शिल्पा राजीव कुडतरकर यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF