संगीत अभ्यासक प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांचा शरिरातील कुंडलिनीचक्रांवर झालेला परिणाम

संगीत सदर

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

पू. डॉ. मुकुल गाडगीळ

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका संतांनी त्यांच्या ग्रंथात विविध कुंडलिनीचक्रे आणि त्यांच्याशी संबधित शास्त्रीय संगीतातील राग यांसंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. श्री. प्रदीप चिटणीस यांच्या शास्त्रीय गायनाच्या माध्यमातून चक्र आणि त्यांना अनुसरून सांगितलेल्या रागांच्या परिणामांचा अभ्यास ३.१२.२०१८ ते ५.१२.२०१८ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि  नसलेल्या साधकांवर करण्यात आला. या प्रयोगाचा पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्म स्तरावर केलेला अभ्यास या ठिकाणी देत आहोत.

श्री. प्रदीप चिटणीस

१. मिया मल्हार

अ. ‘राग गायनाच्या प्रयोगाच्या आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या मणिपूरचक्रावर स्पंदने जाणवू लागली. त्यानंतर ५ ते १० सेकंदांतच ती स्पंदने स्वाधिष्ठान आणि त्यानंतर मूलाधार चक्रावर पोहोचली.

इ. या रागामुळे मूलाधारचक्राला थोडे जडत्व आले. ‘हा राग त्या चक्राला स्थिरता देतो’, असे जाणवले. हा संथ लयीतील राग आहे. त्यामुळे ‘आपली चंचलता दूर होऊन आपल्याला स्थिरता येते’, असे मला जाणवले.

ई. ‘मूलाधारचक्र पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असल्याने आणि हा राग स्थिरता देत असल्याने तो गायल्यावर हा राग गात असलेल्या ठिकाणी आकाशात पावसाचे ढग स्थिरावतात आणि त्या ढगांतील बाष्परूपातील पाण्याचे घनीकरण होऊन पाऊस पडू लागतो’, असे जाणवले.

उ. प्रयोगात आणखी ५ मिनिटांनी माझी कुंडलिनीशक्ती जागृत झाली. त्यामुळे मूलाधारचक्रावरचे जडत्व दूर होऊन तेथे मला थंडावा जाणवू लागला.

ऊ. माझी चंद्रनाडीही थोड्या प्रमाणात कार्यरत झाली.

ए. काही वेळाने माझ्या आज्ञाचक्रावर रागाची स्पंदने जाणवू लागली. ती शक्तीच्या स्वरूपात होती.

ऐ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘मधल्या बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे’, ही तेजतत्त्वाची निर्गुण-सगुण स्तराची मुद्रा आली. ती मुद्रा केल्यावर माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली आणि रागाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवू लागली. त्यामुळे रागाच्या स्पंदनांचा प्रवास ‘प्रथम मूलाधारचक्रापर्यंत आणि नंतर तेथून सहस्रारचक्रापर्यंत’, असा पूर्ण झाला.

ओ. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६० होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले. याप्रमाणेच रक्तदाबही मोजला. आरंभी तो १२७/७३ (mm Hg) होता. त्यामध्येही राग ऐकल्यावर फारसा पालट झाला नाही.

सारांश : मिया मल्हार राग मुख्यत्वे मूलाधारचक्रावर परिणाम करणारा आणि शरिराला स्थिरता देणारा आहे.

२. पुरिया

अ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर माझ्या स्वाधिष्ठानचक्रावर, तसेच ओटीपोटात स्पंदने जाणवू लागली. ही स्पंदने थोडी थंडावा देणारी होती.

इ. हा राग संथ लयीतील असून त्यामध्ये गोडवा आहे. त्यामुळे तो ऐकतांना मन लगेच एकाग्र होते. तसेच हा राग ऐकतांना भाव जागृत होतो.

ई. थोड्या वेळाने माझ्या छातीमध्ये, तसेच हातांमध्येही थंडावा जाणवू लागला.

उ. हा रागही ‘मिया मल्हार’ रागाप्रमाणे मनाला स्थिर करणारा आहे. तसेच तो थोडी शीतलता देणाराही आहे.

ऊ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘अनामिकेच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’, ही आपतत्त्वाची मुद्रा आली. स्वाधिष्ठानचक्र हे आपतत्त्वाशी निगडित आहे. आलेली मुद्रा केल्यावर माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली आणि रागाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवू लागली. मुद्रेमुळे रागाच्या स्पंदनांचा मूलाधारचक्रापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. हे एक प्रकारे रागाचा परिणाम साध्य होण्यातील पूर्णत्व आहे.

ए. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६८ होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले. याप्रमाणेच रक्तदाबही मोजला. आरंभी तो ११९/६५ (mm Hg) होता. त्यामध्येही राग ऐकल्यावर फारसा पालट झाला नाही.

सारांश : पुरिया राग स्वाधिष्ठानचक्रावर परिणाम करणारा, मनाला एकाग्र करणारा आणि शरिराला थोडासा थंडावा देणारा आहे.

३. मुलतानी

अ. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

आ. रागाचा आरंभ झाल्यावर माझ्या मणिपूरचक्रावर परिणाम होऊ लागला.

इ. त्यानंतर २ – ३ मिनिटांनी मला माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवू लागली.

ई. या रागाची स्पंदने भरीव स्वरूपाच्या शक्तीची होती. माझे मणिपूरचक्र ते आज्ञाचक्र या पूर्ण भागात मला ती शक्ती जाणवत होती.

उ. माझी चंद्रनाडीही कार्यरत होऊ लागली. रागाची भरीव शक्ती माझी चंद्रनाडी कार्यरत करत असल्याने मला माझ्या डाव्या बाजूला अधिक प्रमाणात शक्ती जाणवत होती. त्यामुळे आपोआपच मी माझ्या डाव्या बाजूला थोडासा कललो होतो.’

ऊ. जेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली, तेव्हा मी पुन्हा सरळ झालो आणि भरीव शक्तीमुळे माझे शरीर थोडे डोलू लागले.

ए. या रागातील जडत्वामुळे माझे ध्यान लागू लागले.

ऐ. या रागाला पूरक अशी हाताच्या बोटांची मुद्रा शोधली असता ती ‘तर्जनीचे टोक हाताच्या तळव्याला लावणे’, ही वायुतत्त्वाची निर्गुण-सगुण स्तराची मुद्रा आली. दोन्ही हातांनी ही मुद्रा केल्यावर रागाची स्पंदने सहस्रारचक्रापर्यंत पोहोचली.

ओ. या रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६० होते. राग ऐकून झाल्यावर ते तेवढेच राहिले. याप्रमाणेच रक्तदाबही मोजला. आरंभी तो १०४/६६ (mm Hg) होता. राग ऐकून झाल्यावर तो वाढून ११६/७० (mm Hg) झाला. या रागाची स्पंदने शक्तीच्या स्वरूपात असल्याने आणि ती मणिपूर ते आज्ञा या संपूर्ण भागात जाणवल्याने रक्तदाब वाढला; पण सुषुम्ना नाडी आरंभ झाल्यामुळे नाडीचे ठोके मात्र वाढले नाहीत.

सारांश : मुलतानी राग आरंभी मणिपूरचक्रावर परिणाम करतो; पण पुढे त्याचा परिणाम मणिपूर ते आज्ञा या संपूर्ण भागात जाणवतो. या रागाच्या स्पंदनांमध्ये भरीव शक्ती जाणवली.

(उत्तरार्ध वाचा पुढील गुरुवारी)

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४ आणि ५ डिसेंबर २०१८)

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF