‘सिग्नल’ची ऐशीतैशी !

काही दिवसांपूर्वी रात्री साधारण ९ वाजता चारचाकीने प्रवास करतांना शहरातील वाहतुकीने गजबजलेल्या एका चौकात सिग्नल लागल्याने आम्ही थांबलो. सिग्नल संपला, तरी गाड्या काही पुढे जाईनात. आजूबाजूला पाहिले असता चौक असल्याने चारही बाजूंनी सर्वच वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली असल्याचे लक्षात आले. मोठमोठे कंटेनरही यात अडकून पडल्याने काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ५ मिनिटे होऊनही गाड्या पुढे जात नसल्याने काही वाहनांमधील लोक स्वतः रस्त्यावर उतरून वाहनांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न करू लागले. आता गाडी मार्गस्थ होईल असे वाटले; परंतु १० मिनिटे होऊनही आमचे वाहन काही हलेना. तितक्यात शिट्ट्यांंचा आवाज आला आणि २-३ वाहतूक पोलीस दिसले. ‘इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असतांना हे पोलीस होते तरी कुठे’, असा सर्वांनाच प्रश्‍न पडला होता. त्यांनी वाहतूक नियंत्रित केली आणि जवळजवळ १५ मिनिटांनी आम्ही त्या कोंडीतून सुटलो एकदाचे !

वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणा !

प्रत्यक्षात वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष या चौकाच्या अगदी शेजारीच आहे. असे असतांना इतकी कोंडी झालेली पाहून तेथील एकाही पोलिसाने तत्परतेने यायला नको का ?  २-३ पोलीस एकदम तेथे आल्यावर वाटले, ते कदाचित जेवायला गेले असावेत ! असा जरी विचार केला, तरी त्यांनी भरचौकात वाहतूक नियंत्रणासाठी एका पोलिसाची तरी पर्यायी नेमणूक करायला हवी होती. तसे झाले असते, तर ती खर्‍या अर्थाने कर्तव्यदक्षता ठरली असती. नागरिकांची गैरसोय करणारे असे वाहतूक पोलीस काय कामाचे ?

बेशिस्त नागरिक

केवळ वाहतूक पोलिसांनाच दोष देऊन उपयोग नाही, तर रस्त्यावरील सिग्नल न पाळणार्‍या नागरिकांचीही (वाहनचालकांचीही) तितकीच चूक आहे. सर्वांनाच ईप्सित स्थळी लवकर पोहोचण्याची घाई असते. या घाईचा विचार करूनच सध्या सिग्नल सुटण्यासाठी किती सेकंद शेष आहेत, हेही दर्शवलेले असते; मात्र अतिघाईच्या नादात अनेकजण १९  २० सेकंद शेष असतांनाच सिग्नल तोडून पुढे गेलेले असतात. यात एखादा अनर्थ ओढवल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

हे पालटण्यासाठी नागरिकांनी रस्ते वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांनीही आपल्या कर्तव्यांचे पालन करायला हवे. तसे झाल्यासच वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. देशातील अंतर्गत वाहतुकीचे सुनियोजन झाल्यासच हा देश खर्‍या अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, हे निश्‍चित !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now