मोदी यांनी दिलेली किती आश्‍वासने पूर्ण केली ?

पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीवर टीका करतांना काँग्रेसचा प्रश्‍न

देशातील समस्या सोडवण्यासाठी ना काँग्रेसने प्रयत्न केलेत ना आताच्या भाजप सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आता धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हावे !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ९० मिनिटांच्या मुलाखतीत केवळ ‘‘मी’, ‘माझे’ आणि ‘मला’ याच्याच आसपास फिरत होते.  त्यांच्या या ‘मी’मुळेच गेल्या ५५ मासांमध्ये देशाला अधोगतीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. (काँग्रेसने तिच्या जवळपास ५५ वर्षांच्या सत्ता काळात देशाला अधोगतीकडेच नेऊन ठेवले. अशा काँग्रेसने मोदी सरकारवर टीका करणे हास्यास्पद ! – संपादक) मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांपैकी किती आश्‍वासने त्यांनी पूर्ण केलीत, हे त्यांनी सांगितलेच नाही, अशी टीका मोदी यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. (वर्ष १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाव’ अशी घोषणा केली होती; मात्र प्रत्यक्षात या देशातून गरीबांना हटवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काळात झाला. अशी कितीतरी आश्‍वासने काँग्रेसने पूर्ण केलेली नाहीत, हे जनता अद्याप विसरलेली नाही ! – संपादक) मोदी यांची विशेष मुलाखत १ जानेवारीला दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीनंतर सुरजेवाला यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न

१. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख जमा झाले का? (काँग्रेसने सत्तेवरून पायउतार होतांना देशातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर ५० सहस्रांहून अधिक रुपयांचे कर्ज ठेवले होते, याविषयी ती का बोलत नाही ? – संपादक) 

२. ८० लाख कोटी रुपये काळा पैसा १०० दिवसांत देशात परत आणला का? (काँग्रेसच्या जवळपास ५० हून अधिक वर्षांच्या सत्ताकाळात किती लाख कोटी काळा पैसा परदेशात गेला आणि तो परत आणण्यासाठी काँग्रेसने या वर्षांत काय केले, हे ती का सांगत नाही ? – संपादक)

३. प्रतिवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करणार होता, त्यानुसार ५५ मासांत ९ कोटी रोजगार निर्माण झाले का? त्यातील ९ लाख तरी निर्माण करू शकलात का ? (काँग्रेसच्या काळात बेरोजगारी का वाढली आणि ती न्यून करण्यासाठी काँग्रेसने काय केले होते ? – संपादक)

४. शेतकर्‍यांना झालेल्या खर्चावर ५० टक्के लाभ देणार होतात; पण खर्च तरी दिला का ? (काँग्रेसच्या काळात सहस्रो शेतकर्‍यांनी आत्महत्या केली त्याचे काय ? – संपादक)

५. व्यापार व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले होते; पण ‘गब्बरसिंग टॅक्स’ (जीएस्टी) लावून धंदा मंदा करून टाकला. (काँग्रेसच्या काळात भारतीय व्यापारात किती प्रगती झाली होती, हे काँग्रेस सांगील का ? – संपादक)

६. नोटाबंदीने काळ्या पैसेवाल्यांची ऐश झाली. (यात काँग्रेसवालेही होते, हे सुरजेवाला का सांगत नाहीत ? या काळ्या पैशावाल्यांचा काळा पैसा काँग्रेसने का बाहेर काढला नव्हता आणि पुढे ती काढणार आहे का ? हे सुरजेवाला का सांगत नाहीत ? – संपादक) लाखो महिलांचे स्त्रीधन खर्च झाले. १२० सामान्य नागरिकांचे नोटा पालटण्याच्या रांगेत जीव गेले.

७. देशात भ्रष्टाचार वाढला आहे. राफेल खरेदी भ्रष्टाचाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून का केली जात नाही? (देशातील सर्वाधिक भ्रष्टाचार काँग्रेसच्या काळात झाला आहे. मुळात देशात भ्रष्टाचाराची लागण काँग्रेसमुळे झाली आहे. वर्ष १९४८ मधील जीप घोटाळ्यापासून आताच्या कोळसा खाण वाटप घोटाळ्यापर्यंतचे सर्व घोटाळे काँग्रेसवाल्यांनी केले, याविषयी सुरजेवाला गप्प का ? – संपादक)

८. राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळ केला. ५५ मासांत आतंकवादग्रस्त भागांत ४२८ सैनिक हुतात्मा झाले आणि २७६ नागरिक मारले गेले. नक्षलग्रस्त भागांत २२८ सैनिक हुतात्मा  झाले आणि ३७८ सामान्य नागरिकांचे बळी गेले. (जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद हे काँग्रेसचे पाप आहे. काश्मीरची समस्या हीसुद्धा काँग्रेसचे पाप आहे. या दोन्हींमुळे देशातील लक्षावधी लोकांचा जीव गेला, तर साडेचार लाख हिंदूंना पलायन करावे लागले. ही समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने पूर्वीही काही केले नाही आणि आताही ती काही करणार, अशीही शक्यता नाही ! – संपादक)

९. गंगा स्वच्छ झाली का? स्वच्छतेसाठी निवडलेल्या ३९ पैकी ३८ ठिकाणी आजही गंगेचे पाणी अस्वच्छ आहे. (गंगानदी स्वच्छतेचा पहिला प्रयत्न राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ८० च्या दशकात चालू झाला. त्यानंतर अनेक वर्षे काँग्रेस सत्तेत होती. या कालावधीत गंगानदी स्वच्छ का झाली नाही, याचे उत्तर सुरजेवाला यांनी दिले पाहिजे ! – संपादक)

१०. १०० ‘स्मार्ट सिटी’ बनवणार होतात. एकही बनलेली नाही. (काँग्रेसने कधी ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याचा विचार तरी केला होता का ? उलट मुंबईसारखे शहर अवैध झोपड्यांद्वारे बकाल करण्याचे पाप काँग्रेसने केले !- संपादक)

११. ‘मेक इन इंडिया’चे काय झाले? (काँग्रेसने अशी योजना स्वातंत्र्यापासून का केली नाही ? – संपादक)

१२. पेट्रोलचे दर लिटरला ६८ रुपये झाले. विमानासाठी लागणारे पेट्रोल मात्र ५८ रुपये लिटर आहे. हेच का ‘अच्छे दिन’? (काँग्रेसच्या राज्यात किती वेळा पेट्रोलचे दर अल्प झाले होते, हे काँग्रेस सांगील का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF