राफेल विमान खरेदी प्रकरणावरून लोकसभेत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप

‘राफेल प्रकरणात घोटाळा झाला’, अशी ओरड करत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले; मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळल्याने हा निर्णय काँग्रेसच्या जिव्हारी लागला ! आता काहीही करून या प्रकरणात घोटाळा झाल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस अशा प्रकारे आटापिटा करत आहे !

नवी देहली – राफेल विमान खरेदी प्रकरणावरून लोकसभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केल्यावर तितक्याच जोरकसपणे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. या कालावधीत गदारोळ झाला.

१. राहुल गांधी यांनी टीका करतांना ‘ राफेल करारात घोटाळा झाला असतांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तो लपवण्यासाठी खोटे बोलत आहेत’, असा आरोप केला. तसेच त्यांनी अनिल अंबानी यांच्या आस्थापनाला या विमानांच्या बांधणीचे कंत्राट देण्यावरून भाजपला धारेवर धरले.

२. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देतांना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांना लढाऊ विमानांविषयीचे सामान्यज्ञानही नाही. राहुल गांधी यांना केवळ पैसेच दिसतात. बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलॅण्ड आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी परिवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन संमत झाला आहे.’’

मनोहर पर्रीकर यांच्या घरात राफेलची कागदपत्रे ! – काँग्रेसचा आरोप

नवी देहली – राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भातील एका संभाषणाची ध्वनीफीत प्रसारित केली आहे. यात गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे एका अज्ञात व्यक्तीशी दूरभाषवरून बोलत आहेत आणि यात राणे यांनी ‘मंत्रीमंडळाच्या बैठकीत पर्रीकर यांनी त्यांच्या घरामध्ये राफेल कराराची कागदपत्रे आहेत’, असे म्हटल्याचे संभाषण आहे. काँग्रेसने या करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वीच केला आहे. आता या संभाषणावरून काँग्रेसने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पर्रीकर यांनी ट्वीट करून संभाषणातील दावा फेटाळला !

काँग्रेसकडून प्रसारित करण्यात आलेल्या या संभाषणाच्या ध्वनीफितीवरून पर्रीकर यांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, ‘राफेल करारावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसचा खोटारडेपणा उघड झाला. यामुळे काँग्रेसकडून सत्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न म्हणून ही ध्वनीफीत प्रसारित करण्यात आली. राफेलच्या संदर्भात कधीही मंत्रीमंडळ अथवा अन्य कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही.’

ध्वनीफितीची पोलिसांकडून चौकशी व्हावी ! – विश्‍वजित राणे

या ध्वनीफितीविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना गोव्यातील भाजपचे नेते तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले, ‘‘काँग्रेसने मुख्यमंत्री पर्रीकर आणि मंत्रीमंडळ यांच्यातील संभाषणाची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पर्रीकर यांनी कधीच राफेलशी संबंधित कागदपत्रांचा उल्लेख केलेला नाही. या ध्वनीफितीची चौकशी झाली पाहिजे. काँग्रेसने (पर्रीकर यांच्या) आवाजाशी छेडछाड केलेली ध्वनीफीत सादर केली आहे. याची पोलिसांकडून चौकशी व्हायला हवी.’’


Multi Language |Offline reading | PDF