ख्रिसमस (नाताळ) सप्ताह ?

भारत हे हिंदुबहुल राष्ट्र असले, तरी ‘सर्वधर्मसमभाव’ जपणार्‍या एका ‘निधर्मी’ देशात  ख्रिसमस हा सण उत्साहात साजरा होतो, यात आश्‍चर्य नाही ; मात्र हिंदूबहुल भारतात हिंदूंनी ख्रिसमस साजरा करणे, हे भयावह आहे. छळाने, बळाने अथवा विविध प्रलोभने दाखवून हिंदूंना धर्मांतरीत केले जात आहे. ‘सर्वधर्मसमभावा’ची बाधा झालेले जन्महिंदू भावनिक होऊन २५ डिसेंबर ते १ जानेवारी हा कालावधी ‘ख्रिसमस (नाताळ) सप्ताह’ म्हणून साजरा करू लागले आहेत, हे विचार करायला लावणारे आहे.

सातारा शहराला गौरवशाली इतिहासाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या याच भूमीत इंग्रजांना पळता भुई थोडी करणार्‍या नाना पाटील यांनी पत्री सरकारची स्थापना केली; मात्र आता त्याच भूमीत हिंदु बांधवांच्या धर्मांतरामुळे हिंदुत्वाला ग्रहण लागले आहे. आतापर्यंत भागवत सप्ताह, गाथा सप्ताह वगैरे ऐकले होते; मात्र ‘ख्रिसमस (नाताळ) सप्ताह’ प्रथमच ऐकण्यात आला. शहरातील चर्चमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, संगीतरजनी, नववर्ष स्वागत असे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यालाच ‘ख्रिसमस (नाताळ) सप्ताह’, असे नाव देण्यात आले होते. असे असले, तरी संपूर्ण कार्यक्रम ‘येशू’ कसा श्रेष्ठ, तो कसा महान होता, तोच कसा सर्वांचा तारणहार आहे’, हे सांगण्याचाच प्रयत्न चर्चकडून केला गेला. ख्रिस्ती मिशनरींनी संथ गतीने चालवलेल्या या विषप्रयोगाला हिंदु बांधव बळी पडत आहेत. हिंदु बांधव ‘हॅप्पी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. चौकाचौकात फलकांवर ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत. चौकाचौकात डिजे लावून यथेच्छ मद्यप्राशन करून ‘ख्रिसमस (नाताळ) सप्ताहा’ची सांगता करत आहेत. नववर्षाचे स्वागत हिंदु धर्मशास्त्रानुसार ‘गुढीपाडव्या’ला नव्हे, तर ३१ डिसेंबरला साजरे करत आहेत. यामुळे एरव्हीला ‘हिंदु’ म्हणून जीवन व्यतीत करणारे ‘२५ डिसेंबर ते १ जानेवारी’ या कालावधीत ७ दिवसांचे धर्मांतर करून ‘ख्रिस्ती’ झाले कि काय, असे प्रखरतेने जाणवते. खरे तर कोणतेही शास्त्रीय कारण नसणार्‍या ३१ डिसेंबरला नववर्ष स्वागत करणे, हीसुद्धा एक अंधश्रद्धाच नाही का ?

हिंदूंच्या धार्मिक परंपरांचे अनुकरण करत ‘सप्ताह’ साजरे करण्याची नवी टूम आता चर्च आणि मिशनरी यांनी चालू केली आहे; मात्र संत तुकाराम महाराज यांच्या ‘भले तरी देऊ । कासेची लंगोटी ॥ नाठाळाचे माथा । हाणू काठी ॥ या उक्तीप्रमाणे हिंदु बांधवांनी ख्रिस्त्यांच्या या ‘सप्ताहा’ला बळी न पडता, आम्ही कसे धर्मनिष्ठ आहोत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा


Multi Language |Offline reading | PDF