हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा रत्नागिरी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

सभेला ४ सहस्र हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती

आता आंदोलन नको, राममंदिर उभारण्याला प्रारंभ करा ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

 रत्नागिरी, १ जानेवारी (वार्ता.) – हिंदूंनी राममंदिरासाठीच भाजपला केंद्रात आणि उत्तरप्रदेशमध्येे निवडून दिले आहे; मात्र राममंदिरासाठी विश्‍व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा आंदोलन करत आहे. राममंदिरासाठी ३० वर्षे केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या जागृतीमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. आता पुन्हा लाठ्या आणि गोळ्या झेलायची वेळ येऊ नये. राममंदिर उभारणे, हे आता सत्तेत बसलेल्यांचे कर्तव्य आहे. आता आंदोलन नको, तर राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ करा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ३० डिसेंबर या दिवशी येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअममध्येे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण विभाग तथा गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या सभेला रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना श्री. प्रमोद मुतालिक, श्री. मनोज खाडये आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

 

देशद्रोहरूपी कर्करोगाला वेळीच रोखले नाही, तर तो देशाला संपवून टाकेल ! – प्रमोद मुतालिक

१. केवळ चरखा फिरवून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. त्यासाठी त्याग आणि बलीदान करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी तंत्र आणि मंत्र यांसमवेत क्रांतीही पाहिजे.

२. ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) शब्द उच्चारणे म्हणजे हिंदु धर्म आणि देवता यांचा अपमान आहे. त्यामुळे हा शब्द उच्चारणे बंद करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना निर्माण केली, तेव्हा ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द नव्हता.

३. काश्मीरमध्ये सैनिकांना दगड मारून ठार मारण्यात येते. हे दगड मारणारे कोण आहेत ? दगड मारणार्‍यांना गोळ्या का घालत नाहीत ? जो सैनिक देशवासियांच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करतो, त्याला दगड मारून मारले जाते. आपले रक्त का सळसळत नाही ? सैनिकाच्या जीवनाचे काहीच मूल्य नाही का ?

४. देशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या जातात. अफझल, याकूब यांचे उदात्तीकरण होते. देशात हे काय चालले आहे. ‘जेएन्यू’ विद्यापिठात ‘अफझल झिंदाबाद’, ‘घर-घर में अफझल होगा’, अशा घोषणा दिल्या जातात. आमच्या रक्तातही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. घरात घुसून अफजल फाडू. देशद्रोह हा ‘कॅन्सर’ आहे. तो वेळीच थांबवला नाही, तर तोच देशाला संपवून टाकेल.

पुरोगामी, राज्यकर्ते, पोलीस यांनी कितीही मुस्कटदाबी केली, तरी वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच !  सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

अखंड हिंदुस्थान हा पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र व्हावा, यासाठी सनातन संस्था प्रयत्नरत आहे; मात्र गुलामगिरीची मानसिकता बाळगणारे काही जन्महिंदू हिंदु राष्ट्र या संकल्पनेला विरोध करत आहेत. अशाच विरोधकांमुळे मागील १० वर्षे आम्ही पीडित आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, श्रीराम यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून सनातन संस्था संपूर्ण विश्‍वात अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. काही अविचारवंत डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनला दोषी ठरवण्यासाठी आकाशपाताळ एक करत आहेत. आम्ही हिंदु धर्माचा प्रचार आणि हिंदु राष्ट्र जागृती यांसाठी तेजस्वीपणे कार्य करतो, हाच आमचा गुन्हा आहे. त्यासाठीच धर्मविरोधी विचारसरणी सूडबुद्धीने आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘काही पुरोगामी आणि राजकारणी तर सकाळी उठल्यावर आधी सनातनवर बंदीची मागणी करतात, नंतर चहा पितात’, अशी स्थिती आहे. अर्थात् कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही. सनातन संस्थेला आतंकवादी ठरवून सामान्यजन सनातनपासून दूर जावेत, यासाठी काँग्रेसने पुरोगाम्यांच्या हत्यांमध्ये सनातनला गोवण्याचा प्रयत्न केला. तिच नीती आता हिंदुत्वनिष्ठ पक्षही अवलंबत आहेत. पुरोगामी, राज्यकर्ते, पोलीस यांनी सनातनची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, तरी वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.

सार्वजनिक सभेत पुन्हा ‘क्षात्रधर्म साधना’ ग्रंथाचे प्रकाशन करणार !

‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून पुरोगाम्यांच्या हत्या झाल्याचे आतंकवादविरोधी पथकाने आरोपपत्रात म्हटले आहे. २० वर्षांपूर्वीच या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या कालावधीत हा ग्रंथ वाचून किती हत्या झाल्या हेही अन्वेषण यंत्रणेने घोषित करावे. अन्वेषण यंत्रणेमध्ये धमक असेल, तर नक्षलवादी, जिहादी ज्या हत्या करतात, देशद्रोही दगडफेक करतात, फादर बलात्कार करतात ते कोणता ग्रंथ वाचतात, हे तिनेे घोषित करावे. ‘क्षात्रधर्म साधना’ं या ग्रंथामध्ये काय आहे, हे समाजाला कळावे, यासाठी पुन्हा सार्वजनिक (जाहीर) सभेत या ग्रंथाचे आम्ही प्रकाशन करणार आहोत.

शासकीय कार्यालयात देवतांची चित्रे लावण्याला विरोध करणार्‍यांना देवस्थानामधील निधी कसा चालतो ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंची मंदिरे म्हणजे सरकारला दुभती गाय वाटू लागली आहे. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा सपाटाच शासनाने लावला आहे. भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीतील पैसा संपल्याने आता हिंदूंच्या मंदिरांतील देवनिधीवर डोळा ठेवून देवस्थानांच्या तिजोर्‍या रिकाम्या करण्याचे कारस्थान चालू आहे. छत्रपती शिवरायांची कुलदेवता आणि हिंदवी स्वराज्याची अधिष्ठाती देवता श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून १२० किलो दागिने अल्प झाले आहेत, २४० एकर भूमी गायब आहे. पंढरपूर देवस्थानाची १ सहस्र २२० एकर भूमी गायब आहे. श्री सिद्धीविनायक मंदिरात हिंदु भाविकांनी अर्पण केलेले धन अन्य पंथियांना वाटले जाते. हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे. समाजकारणासाठी मंदिरांचे धन घेता, तर मशिदी आणि चर्च मधील धन कधी घेणार ?, असा प्रश्‍न राज्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. आजवर राज्यातील सहस्रावधी मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. राज्यातील पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डीचे श्री साई संस्थान, तुळजापूरचे श्री भवानीमाता मंदिर, मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, श्री ज्योतिबा देवस्थान यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती स्थापन करून ३ सहस्र ६७ मंदिरे शासनाने कह्यात घेतली आहेत. दुसरीकडे पुरोगामी आणि निधर्मी मंडळी शासकीय कार्यालयात देवतांची छायाचित्र लावण्याला विरोध करत आहेत. शासनाने त्यासाठी परिपत्रक काढले आहे. शासकीय कार्यालयात देवतांची चित्रे लावण्याला विरोध करणार्‍यांना देवस्थानामधील निधी कसा चालतो ?

‘फेसबूक लाईव्ह’द्वारे १८ सहस्र ५०० जणांनी सभा पाहिली !

या सभेचे ‘फेसबूक लाईव्ह’वरून प्रसारण करण्यात आले होते. ‘फेसबूक लाईव्ह’वर १८ सहस्र ५०० जणांनी ही सभा पाहिली. ७१५ जणांनी आवडले, १०९ जणांनी टिपणी (कमेंट) दिली, तर ४२१ जणांनी इतरांना ‘शेअर’ केली.

लातूर आणि मुंबई या ठिकाणाहून ‘तुमचे कार्य स्तुत्य आहे. या कार्यात आम्हालाही सहभागी व्हायचे आहे’, अशी टिपणी (कमेंट) देण्यात आली होती, तर पुणे येथून ‘१ नंबर सभा’ अशी कमेंट आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहाण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या Fb.com/HJSRATNAGIRI या ‘फेसबूक पेज’ला भेट द्या !


Multi Language |Offline reading | PDF