डॉक्टर आणि रुग्णालये यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून खासगी विधेयक सादर

मुंबई – डॉक्टर आणि रुग्णालयांवरील वाढती आक्रमणे रोखण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या चालू असलेल्या अधिवेशनात २८ डिसेंबरला एक खासगी विधेयक मांडले.

१. पोलीस आणि शासन ही आक्रमणे रोखण्यास, तसेच आक्रमण करणार्‍यांना न्यायपालिकेमार्फत शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेत केली होती.

२. खासदार डॉ. शिंदे यांच्या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे त्यांनी याविषयीचे खासगी विधेयक मांडले. या अंतर्गत आक्रमण करणार्‍यांना किमान ६ मास ते कमाल ५ वर्षे कारावास आणि किमान ५ सहस्र ते कमाल ५ लाख रुपयांचा आर्थिक दंड या शिक्षेची तरतूद आहे.

३. यासह आक्रमणात स्थावरजंगम मालमत्तेची जी हानी होईल, त्याचीही वसुली आक्रमण करणार्‍यांकडून करण्याची तरतूद या खासगी विधेयकात आहे. आक्रमण करणार्‍यांची आर्थिक दंड भरण्याची क्षमता नसल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही विधेयकात आहे.

४. या विधेयकात उपचार करण्यापूर्वी रुग्ण आणि नातलग यांना रुग्णाची सद्य:स्थिती, करावे लागणारे वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया, या उपचारांचे होऊ शकणारे परिणाम, त्यातील संभाव्य धोके यांची संपूर्ण कल्पना लिखित स्वरुपात देण्याचे दायित्व डॉक्टरांकडे देण्यात आले आहे.

५. ‘या कठोर कलमांमुळे डॉक्टर अथवा रुग्णालयांवर आक्रमण करण्यापूर्वी आक्रमणकर्ते दहावेळा विचार करतील. आक्रमण झाल्यानंतर आक्रमणकर्त्यांना शिक्षा होण्याऐवजी आक्रमण होऊच नये, यादृष्टीने कायद्यात कठोर कलमांची तरतूद करण्यात आली आहे’, खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्‍वासाचे वातावरण निर्माण होण्यास असे या कायद्यामुळे साहाय्य होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.


Multi Language |Offline reading | PDF