चुकीचे समर्थन कशासाठी ?

एक विद्यार्थी ‘बे एके बे, बे दुणे चौदा, आठ दुणे बारा…’, असे १ ते १५ पर्यंतचे चुकीचे पाढे म्हणत आहे आणि त्यास अन्य विद्यार्थी हसत आहेत. यातील शिक्षक केवळ त्याच्या चित्रीकरणामध्ये रममाण आहेत. कौतुकाने ते चुकीचे पाढे ऐकत आहेत. असे एक चित्रीकरण सध्या सामाजिक माध्यमांवरून ‘व्हायरल’(प्रसारित) झाले आहे. हे चित्रीकरण कोणत्याही शाळेचे नसून एखाद्या खासगी शिकवणीवर्गातील आहे, असे वाटते. याची नोंद काही वाहिन्यांनीसुद्धा घेतली. वृत्तवाहिन्यांवरून तर या विद्यार्थ्याच्या ‘चुकीकडे नव्हे तर त्याच्यातील आत्मविश्‍वासाकडे पहा’, असा सल्लाही देण्यात आला. पाढे चुकीच्या पद्धतीने म्हटले तरी चालतील; मात्र विद्यार्थ्यांमधील आत्मविश्‍वास दृढ असावा, असे प्रसारमाध्यमांना म्हणायचे आहे का ?

याचा अर्थ चोर, भ्रष्टाचारी, खंडणीबहाद्दर यांच्याकडून आत्मविश्‍वास हा गुण घ्यायला हवा का ? जे चूक आहे, ते चूक आहे. चुकीचेे समर्थन कोणी का करावे ? बालमन हे संस्कारक्षम असते. जे काही संस्कार करायचे असतात, ते या बालवयातच ! म्हणून चूक घडताक्षणीच चुकीची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. मग ते पालक असोत कि शिक्षक. तरच ‘भारताची भावी पिढी’ निर्माण होईल. नैतिक मूल्यांचे शिक्षण मुलांना देणे जितके आवश्यक आहे, तितकेच ते समाजातील प्रत्येक घटकाला देण्याची आवश्यकता आहे. राहिला प्रश्‍न आत्मविश्‍वासाचा. ‘यशामागे आत्मविश्‍वास ओघानेच येत असतो’ (Confidence comes naturally with success) अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचप्रमाणे यश मिळवायचे असेल, तर योग्य मार्गदर्शन असायला हवे.

सध्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणारे सर्वच काही त्याज्य अथवा सर्व काही स्वीकारार्ह असते, असे नाही. प्रसारमाध्यमांनी समाजाला नेहमीच उपयुक्त असेच द्यायला हवे. शिक्षकांनी चित्रीकरण केले ते योग्यच म्हणावे लागेल. कारण या चित्रीकरणात विद्यार्थ्याची गणित या विषयातील प्रगती काय आहे, हे स्पष्ट दिसत आहे. तसेच विद्यार्थीही वयाने लहान नाही. हेच चित्रीकरण प्रसारमाध्यमांनी दाखवतांना ‘शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थी यांची दुःस्थिती’ या मथळ्याखाली दाखवले असते तर ते सर्वांनाच अंतर्मुख करणारे ठरले असते. या चित्रीकरणातून ‘खोटे बोला पण रेटून बोला’ असाच संदेश विद्यार्थ्यांमध्ये पोहोचत आहे. जी मुले पाढे बरोबर म्हणतात त्यांना हे चित्रीकरण पाहून वाटेल की, ‘चुकीची पाढे म्हटले तर आपलही चित्रीकरण प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होईल.’ चित्रीकरण दाखवतांना ‘वृत्त कोणत्या मथळ्याखाली दाखवावे’ याचा विचार प्रसिद्धीमाध्यमांनी करायला हवा, असे वाटते. या आणि यापेक्षा अनेक गंभीर प्रसंग समाजात घडत आहेत. प्रसिद्धीमाध्यमांनी गंभीर प्रसंगांची योग्यप्रकारे दखल न घेणे आणि पाढे चुकीचे म्हटल्याचे समर्थन करणे हे चिंताजनक आहे. – श्री. नीलेश पाटील, जळगाव


Multi Language |Offline reading | PDF