हसीना जिंकल्या; पण …

बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी निर्भेळ यश मिळवले. त्यांच्या आवामी लीग या पक्षाने ३०० पैकी २६६ जागांवर, तर त्यांनी युती केलेल्या सहकारी पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. हसीना यांच्या या दणदणीत यशानंतर त्या आता चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनणार आहेत. तेथील विरोधी पक्षांनी मात्र हा निकाल अमान्य केला आहे. विरोधकांनी उघडलेल्या आघाडीच्या ‘नॅशनल युनिटी फ्रंट’ला केवळ ७ जागा मिळाल्या आहेत. मतमोजणीमध्ये फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. विरोधी पक्षांना केवळ ७ जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ तेथील संसदेत आता विरोधकांच्या आवाजाला धार नसेल. शेख हसीना यांनी घेतलेल्या निर्णयांना आता विरोध होणार नाही अथवा विरोध झालाच, तरी त्या आवाजाला तीव्रता नसेल. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाएवढेच विरोधी पक्षालाही महत्त्व आहे. विरोधी पक्षांमुळे सत्ताधारी पक्षावर नेहमीच अंकुश रहातो. बांगलादेशात आता असे काही होणे शक्य नाही. पूर्वी शेख हसीना यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून बांगलादेश नेशनॅलीस्ट पार्टी’च्या (बीएन्पीच्या) खालीदा झिया यांना पाहिले जायचे; मात्र या निवडणुकीमुळे बांगलादेशातील सर्व समीकरणे पालटली आहेत. अलीकडच्या काळात हसीना यांची एकाधिकारशाही वाढली असल्याचे बोलले जात होते. या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यावर कोणाचाच निर्बंध नसेल, हेही तितकेच खरे. हसीना यांच्या काळात त्यांनी बांगलादेशाचा केलेला विकास, पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी घेतलले कष्ट यांमुळे जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकले, असे बोलले जात आहे. काहीही असले, तरी हसीना यांच्या या विजयाची तेथील हिंदूंच्या दृष्टीकोनातून मीमांसा होणे आवश्यक आहे.

हिंदूंचा नाईलाज  !

बांगलादेशातील हिंदू हे आवामी लीगचे पाठीराखे म्हणून ओळखले जातात. खालीदा झिया यांच्या बांगलादेश नेशनॅलिस्ट पार्टी ही हिंदुविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. हसीना या सौम्यभाषी, तेथील अल्पसंख्यांकांच्या बाजूने बोलणार्‍या आणि त्यांच्या विरोधात होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या या भूमिकेमुळेच हिंदूंची एकगठ्ठा मते आवामी लीगला मिळत असत. आवामी लीग सत्तेत आल्यावर मात्र त्यानेही हिंदुविरोधी रंग उधळायला आरंभ केला. सध्या बांगलादेशात कुठेही हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या मागे आवामी लीगचे नेते अथवा कार्यकर्ते यांचा हात असल्याचे समोर येत आहे. एवढेच काय तेथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या घरावर आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले होते. स्वतःच्या रक्षणासाठी ज्या पक्षाला सत्तेत बसवले, त्या पक्षानेच विश्‍वासघात केल्याचा अनुभव तेथील हिंदूंना अनेक वेळा आला; मात्र दोन वाईटांपैकी एक अल्प वाईट म्हणजे ‘बीएन्पीपेक्षा आवामी लीग बरा’ हा पर्याय तेथील हिंदू निवडतात. वर्ष २००१ आणि २००६ मध्ये बीएन्पी पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंवर अत्याचार करण्याचे सत्र आरंभले होते. ‘बीएन्पी पक्षाला बांगलादेशातून हिंदूंना हाकलून लावायचे आहे. आवामी लीगचे कार्यकर्तेही हिंदूंवर अत्याचार करतात; मात्र त्यांचा हिंदूंच्या संपत्तीवर डोळा आहे’, असे तेथील स्थानिक हिंदूंचे मत आहे. या निवडणुकीत आवामी लीगने हिफाजत-ए-इस्लामी या संघटनेशी युती केली आहे. ही संघटना धर्मांध असून हिंदूविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे.  ‘बांगलादेशी हिंदूंसाठी आवाज उठवणारा एक स्वतंत्र पक्ष असावा’, असे तेथील हिंदूंना वाटते. त्यासाठी अधिवक्ता रवींद्र घोष स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र आवामी लीग सरकारचा या पक्षाच्या नोंदणीस विरोध आहे. ‘असा पक्ष स्थापन झाल्यास आवामी लीगला मिळणारी अल्पसंख्यांकांची मते या राजकीय पक्षाकडे जातील’, अशी भीती आवामी लीगला वाटत आहे. थोडक्यात बांगलादेशात कोणताही पक्ष सत्तेवर आल्यास तेथील हिंदूंना काही ‘अच्छे दिन’ येतील, अशी शाश्‍वती नाही.

भारताची भूमिका महत्त्वाची !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांचे अभिनंदन केले आहे. ‘त्यांच्या नेतृत्वामुळे बांगलादेशाचा विकास झाला’, असे मोदी यांनी म्हटले आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारताने बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तेथील अनेक विकास प्रकल्पांमध्ये भारताने निधी गुंतवला आहे. या पार्श्‍वभूमीवर आवामी लीग निवडून आल्यावर मोदी यांनी विकासाचा सूर आळवला आहे. ‘बांगलादेशाशी संबंध सुधारणे म्हणजे तेथे गुंतवणूक करणे’, सध्या भारत सरकारने हेच सूत्र केंद्रभूत धरले जाते. दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकत्रित येतात, त्या वेळी प्रकल्पांवर चर्चा होते; मात्र बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार अथवा तेथील हिंदू भोगत असलेल्या नरकयातना यांविषयी चर्चा होत नाही. सध्या बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणात वाढ झाली असतांना भारत सरकारने उघडपणे बांगलादेशला खडसावले, असे झालेले नाही. यावरून तेथील हिंदूंना कोणीच वाली उरला नाही, हेच खरे !

‘विकासाच्या सूत्रावर वर्ष २०१४ ची निवडणूक जिंकलो’, या भ्रमात भाजपवाले आजही वावरत आहेत. ३ राज्यांत सपाटून मार खाऊनही भाजपवाल्यांना जाग आलेली नाही, असेच म्हणावे लागेल. हिंदूंनी भाजपला हिंदुत्वाच्या सूत्रावरून निवडून दिले, हेच सत्य आहे; मात्र भाजप हे सत्य स्वीकारण्यास सिद्ध नाही. विकासाचा सूर आळवत राहिल्याने भारतातील हिंदूंवर अत्याचार होतच आहेत. बांगलादेशातील हिंदूंना ‘अच्छे दिन’ येण्यासाठी भाजप सरकारने प्रथम बांगलादेशाच्या संदर्भातील परराष्ट्रनीती पालटायला हवी. तसे केले, तरच तेथील हिंदूंना आधार मिळेल ! नाही तर बांगलादेशात शेख हसीन आल्या किंवा खालिदा झिया तेथील हिंदूंना मात्र कधीच अच्छे दिन येणार नाहीत !


Multi Language |Offline reading | PDF