खरा इतिहास समजून घेणार का ?

कोरेगाव भीमा येथील लढाईच्या निमित्ताने पत्र

एरव्ही जातीनिर्मूलनाच्या घोषणा देणार्‍या आणि शक्य त्या सर्व ठिकाणी जातीय दरी वाढवण्याचा प्रयत्न करणार्‍या नेत्यांना एका सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या वतीने खुले पत्र…

महोदय,

‘कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईच्या निमित्ताने पेरणे येथील स्तंभाला भेट देण्यासाठी प्रतिवर्षी सहस्रो नागरिक तेथे जातात. १ जानेवारी १८१८ या दिवशी कोरेगाव येथे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्याचे पाईक असणारे पेशवे यांच्यामध्ये लढाई झाली होती. त्यामध्ये पेशव्यांचा पराभव झाल्याचे सांगितले जाते. वास्तविक याविषयी अनेक इतिहासकारांची मते भिन्न आहेत. या लढाईत तत्कालीन महार समाज इंग्रजांच्या बाजूने लढला. तेव्हापासून हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला सध्या आलेल्या स्वरूपाविषयी आपण अवगत आहातच ! या निमित्ताने कुठल्याही जातीपातीच्या बंधनात न अडकलेला एक भारतीय म्हणून काही प्रश्‍न विचारावेसे वाटतात. या प्रश्‍नांची उत्तरे खुलेपणानेच द्यावीत, असे बंधन नाही; पण किमान सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून चिंतन केले आणि अनुयायांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तरी या पत्राचे सार्थक होईल.

भारतीय समाज हा एक योद्धा समाज आहे. शौर्यजागरणाची एक तेजस्वी परंपरा भारताला आहे. आजही भारतीय सैन्यात ‘महार रेजिमेंट’ या नावाने एक रेजिमेंट आहे. ‘बोलो हिंदुस्तान की जय’, असे या रेजिमेंटचे घोषवाक्य आहे आणि दुसरीकडे मागासवर्गीय समाज १ जानेवारीच्या निमित्ताने ज्या लढाईत मराठ्यांचा पर्यायाने देशाचा पराभव झाला, तो दिवस एक उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा विरोधाभास नव्हे का ?

भारतीय समाजाने पराक्रमाची कधीच उपेक्षा केली नाही; पण हा पराक्रम कुणाच्या विरोधात गाजवला गेला हेही पहाणे महत्त्वाचे आहे. इंग्रज हे भारताचे शत्रू ! ते भारताची लूट करण्यासाठी आले होते. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या तत्त्वाने राज्य केले. त्यासाठी सवर्ण समाज आणि मागासवर्ग समाज यांच्यामध्ये दरी निर्माण केली. कोरेगाव भीमा येथे अंतिमतः शत्रूचाच विजय झाला. पेशव्यांचा म्हणजे पर्यायाने मराठा साम्राज्याचा पराभव झाला. या लढाईत इंग्रज जिंकले, तरी त्यांनी मागासवर्गीय समाजासह सर्व भारतियांना गुलामाचीच वागणूक दिली.

घडलेला इतिहास आपण पालटू शकत नाही; पण किमान इतिहासाकडे योग्य पद्धतीने पहाण्याची दृष्टी तरी आपण नक्कीच विकसित करू शकतो. मागासवर्गीय समाजाचे नेते म्हणून हे दायित्व आपल्यावरच अधिक आहेे; पण दुर्दैवाने आपण इतिहासातून योग्य तो बोध घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याच्या ऐवजी मागासवर्गीय समाजामध्ये सवर्णांविषयी अधिक द्वेष कसा रुजेल, याविषयीच प्रयत्नशील असल्याचे दिसते. शौर्याचाच जागर करायचा असेल, तर स्वदेशाची मान उंचवणार्‍या अनेक घटना आहेत. त्यांचा उत्सव करून समाजाला देशरक्षणाच्या दृष्टीने नवी प्रेरणा देता येईल; मात्र सामर्थ्याला योग्य दिशा देण्याविषयी अस्पृश्यता बाळगून जातीद्वेषाच्या आधारे राजकीय पोळी भाजून घेण्यातच आपण स्वारस्य दाखवले, तर इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही, हे निश्‍चित !’

– ‘स्वतंत्र भारतात शत्रूचा विजय कसा साजरा केला जातो’, याचे कोडे पडलेला एक भारतीय


Multi Language |Offline reading | PDF