बनावट मुद्रांक घोटाळ्यातील सर्व आरोपींची १५ वर्षांनंतर पुराव्याच्या अभावी मुक्तता !

तब्बल १५ वर्षांनी निकाल लागून आरोपींची निर्दोष मुक्तता होत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ? न्यायदानाची प्रक्रिया गतीमान होण्यासाठी सरकार काही प्रयत्न का करत नाही ?

नाशिक – देशातील बहुचर्चित बनावट मुद्रांक घोटाळ्यातील सर्व आरोपींची येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ३१ डिसेंबरला भक्कम पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केली. नाशिक येथील प्रतिभुती मुद्रणालयातून नादुरुस्त झालेले यंत्र अधिकार्‍यांना हाताशी धरून खरेदी केले आणि त्याआधारे स्टँप छापून घोटाळा केल्याचा गुन्हा अब्दुल करीम तेलगी आणि अन्य ७ आरोपींवर होता. यांतील तेलगी याचा गेल्या वर्षी ऑक्टोबर मासात कारागृहात असतांना आजाराने मृत्यू झाला आहे. या खटल्यात ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. एकूण ३२ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या या घोटाळ्याची सुनावणी वर्ष २००३ पासून नाशिकच्या जिल्हा न्यायालयात चालू होती. प्रतिभुती मुद्रणालयाने काही जुनी यंत्रे त्या वेळी विक्रीस काढली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असलेली यंत्रे विकतांना ती सुट्या भागात विकणे अपेक्षित असतांना तत्कालीन महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांनी संपूर्ण यंत्र एकाच वेळी विकले. आणि ते अब्दुल करीम तेलगी याने विकत घेतले. गंगाप्रसाद यांच्यावरही तेलगीला साहाय्य केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे प्रविष्ट करण्यात आल्यानंतर त्याला काही गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर नोंद झालेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर केले. अन्य आरोपींमध्ये रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता.


Multi Language |Offline reading | PDF