स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पित्याची त्याच्या मृत्यूच्या १० मासांनंतर निर्दोष मुक्तता

  • वर्ष १९९६ च्या प्रकरणाचा २२ वर्षांनंतर निकाल लागणे, हा अन्यायच !
  • बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात निर्दोष असणार्‍यास २२ वर्षांनी न्याय मिळत असेल आणि तोपर्यंत त्याचे निधन झाले असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ? २२ वर्षे ही व्यक्ती ‘बलात्कारी’ म्हणून समाजाच्या द्वेषाला कारणीभूत झाली. हा अवमान आणि कारागृहात काढलेल्या दिवसांची हानीभरपाई कधीही भरून काढता येणार नाही ! तरीही याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर खटला प्रविष्ट करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

नवी देहली – वर्ष १९९६ मध्ये स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. तिला १० वर्षे कारागृहात घालवावे लागले होते. आता या व्यक्तीच्या मृत्यूच्या १० मासांनंतर तिला या आरोपातून मुक्त करण्याचा निकाल देहली उच्च न्यायालयाने दिला आहे.

निकाल देतांना न्यायालयाने म्हटले की, हा न्यायाशी गंभीररित्या केलेला खेळ आहे. या आरोपीविषयी पहिल्या दिवसापासूनच वाईट घडले आहे. या व्यक्तीने दावा केला होता की, तिच्या मुलीचे एका युवकाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली; मात्र अन्वेषण यंत्रणा आणि कनिष्ठ न्यायालय यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या व्यक्तीने मुलीच्या गर्भातील भ्रूणाच्या ‘डीएन्ए’ चाचणीचीही मागणी केली होती; मात्र तिही फेटाळण्यात आली होती. जर त्याच वेळेला या मागणीनुसार कृती झाली असती, तर त्याच वेळेस ही व्यक्ती निर्दोष ठरली असती. (न्यायालयाने संबंधितांवरही कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी जनतेची अपेक्षा ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF