ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे ! – मुख्यमंत्री

सोनिया गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे ‘इडी’च्या चौकशीत उघड !

घोटाळा होत नाही, असे एक तरी क्षेत्र आहे का ? काँग्रेस म्हणजे घोटाळ्यांचा पक्ष, असेच समीकरण झाले आहे. अशा पक्षावर सरकारने बंदी घालावी, अशी जनतेने मागणी केल्यास चूक ते काय ?

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’) ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा असलेला ख्रिश्‍चिअन मिशेल याची भारतात आणून चौकशी केली. या चौकशीत मिशेल याने लाचखोरांच्या सूचीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची नावे असल्याचे सांगितले आहे. या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पक्षाला झाला आहे, असे मिशेल यांनी न्यायालयासमोर सांगितले. प्रत्येक घोटाळ्यामध्ये दलाली आणि एकाच कुटुंबाचे नाव का येते ? त्यामुळे आता काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय यांनी याविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,

१. इटलीच्या न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत, त्यामध्ये सोनिया गांधींचे नाव ४ वेळा आले आहे. यामध्ये ‘इटालीयन स्त्रीचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो’, असा उल्लेख आला आहे.

२. मिशेलने त्याच्या वकिलांना एक चिठ्ठी दिली, त्यात त्याने ‘सोनिया गांधींच्या संदर्भात काय प्रश्‍न येऊ शकतात आणि त्याची उत्तरे कशी द्यायची’, हे विचारले. जर सोनिया गांधी यात (घोटाळ्यात) सहभागी नसतील, तर त्याने हे का केले ?

३. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना वापरण्यात येणार्‍या १२ हेलिकॉप्टरसाठी तीन आस्थापनांना निविदा देण्यात आल्या होत्या. त्यातील रशियन आस्थापनाने माघार घेतली. शेल आस्थापनाच्या माध्यमातून ही लाच देण्यात आली. वायूदल आणि तत्कालीन सत्तेवर असणारे नेते यांना लाच दिल्यानंतर हा व्यवहार पार पडला.

४. या सर्वांमधून गांधी कुटुंबाचा यात समावेश असल्याचे स्पष्ट होत असल्याने काँग्रेसने याविषयी स्पष्टीकरण दिले पाहिजे. या संदर्भात न्यायालयात खटला चालू असल्याने यातील भ्रष्टाचार उघडकीस आल्याशिवाय रहाणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF