राममंदिर नाही, तर वर्ष २०१९ मध्ये मोदी सरकारही नाही ! – आखाडा प्रमुखांची चेतावणी

  • राममंदिराविषयी संत-महंतांचे विचार भाजप सरकारपर्यंत पोहोचत नाहीत कि त्याला ते ऐकूनच घ्यायचे नाहीत ?
  • संतांच्याही म्हणण्याकडे दुर्लक्ष करणारे शासनकर्ते हिंदूहित काय साधणार ?

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – राममंदिर बांधले नाही, तर वर्ष २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही जिंकणार नाहीत, अशी चेतावणी कुंभपर्वासाठी प्रयागराज येथे आगमन झालेल्या आखाड्यांच्या महंतांनी दिली आहे. ‘आज तक’ वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये हे महंत बोलत होते. या कुंभपर्वाच्या कालावधीत विश्‍व हिंदु परिषद धर्मसंसद आयोजित करण्याची शक्यता आहे; मात्र ‘धर्मसंसद आयोजित करण्याचा अधिकार कोणत्याही संघटनेला अथवा पक्षाला नाही, तर केवळ ४ पिठांच्या शंकराचार्यांना आहे’, असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले.

विकासासाठी नव्हे, तर राममंदिरासाठी भाजपला मते ! – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी

१. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना विकासाच्या नावावर मते मिळालेली नाहीत. जर विकासाच्या नावावर जनतेने मते दिली असती, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आता कोणी वेगळेच असते किंवा अखिलेश यादव मुख्यमंत्री असते.

२. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर नरेंद्र मोदी एक हिंदुत्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले. त्यामुळे हिंदूंनी विचार केला की, देहलीमध्ये मोदी आणि उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ असतील, तर अयोध्येत राममंदिर उभे राहील.

३. मोदी यांच्या राज्यात विकास होत आहे, वीज मिळत आहे, रस्ते बनले जात आहेत; मात्र आम्ही त्यांना मते रामाच्या नावावरच देऊ.

४. जर तुम्ही राममंदिर बांधणार नाही, तर तुमच्यासाठी खूपच कठीण होईल. राममंदिरासाठी सरकारचा विचार सकारात्मक असल्याचे दिसत नाही. असे वाटते की, मंदिर बनणारच नाही. त्यामुळे आम्ही आता केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहात आहोत.

राजकीय नेते मंदिर बांधू शकणार नाहीत. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपला याचा परिणाम भोगावा लागेल; कारण लोकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही.

हिंदु आणि मुसलमान धर्मगुरु यांनी चर्चा करून मार्ग काढावा !

राममंदिर बांधण्यासाठी हिंदु आणि मुसलमान धर्मगुरूंनी एकत्र येऊन चर्चा केली, तर यातून मार्ग निघेल. ते यासाठी एकत्र येऊन चर्चा करू शकत नाहीत; कारण राजकारणी त्यांना तसे करू देत नाहीत, असा आरोप महंत नरेंद्र गिरी यांनी केला.

राममंदिर बांधले, तरच सरकार टिकून राहील ! – निरंजनी आखाड्याचे प्रमुख महंत केशव पुरी

साधूसंतांनी केवळ यासाठीच भाजपची साथ दिली; कारण राममंदिर बांधले जाईल आणि ही समस्या सुटेल; मात्र आता असे वाटू लागले आहे की, साडेचार वर्षांत सरकारने याविषयी काहीच केले नाही अन् काही करतही नाही. जर राममंदिर बांधले गेले, तरच हे सरकार टिकेल अन्यथा कठीण आहे; कारण लोकांचा सरकारवरील विश्‍वास उडून जाईल. आम्हाला वाटते की, मंदिर बांधले जावे आणि तेव्हाच भाजप परत सत्तेवर येईल.

सरकारचे हात बांधले गेले आहेत ! – आनंद आखाड्याचे प्रमुख महंत गणेश आनंद सरस्वती

राममंदिर आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि सरकार हे प्रकरण न्यायालयात असल्याने काही करण्याच्या स्थितीमध्ये नाही. यामुळे साधूसंत अप्रसन्न असले, तरी सरकारचे हात बांधलेले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF