‘बुलेट ट्रेन’ आणण्याऐवजी आहे ती रेल्वे प्रथम सुधारा !

भाजपच्या महिला नेत्याचा घरचा अहेर !

जनतेचे नाही, तर किमान स्वतःच्या पक्षातील नेत्यांचे तरी भाजप ऐकेल का ?

अमृतसर – प्रथम भारतीय रेल्वे सुरळीत करा, प्रवाशांना त्यातून योग्य त्या सुविधा द्या अन् मग ‘बुलेट ट्रेन’चे स्वप्न पहा, असे भाजपच्या पंजाबमधील ज्येष्ठ नेत्या आणि माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांता चावला यांनी म्हटले आहे. चावला यांनी नुकताच अमृतसर ते अयोध्या असा प्रवास केला होता. या प्रवासातील वाईट अनुभवानंतर त्यांनी एक ध्वनीचित्रफीत प्रसारित करून वरील शब्दांत भाजप सरकारला फटकारले आहे.

१. चावला यांनी ‘शरयू-यमुना एक्सप्रेस’मधून प्रवास केला होता. ही गाडी ९ घंटे विलंबाने सुटली होती. तसेच ही गाडी १३ घंटे विलंबाने पोहोचली. यात गाडीमध्ये पिण्याचे पाणी नव्हते. शौचालयाची अवस्था वाईट होती. विनातिकिट प्रवास करणार्‍यांना रेल्वे तिकिट तपासनीस पैसे घेऊन प्रवासाची अनुमती देत होता. तसेच अनधिकृत तिकीट विक्री केली जात होती, आदी गोष्टी या प्रवासात त्यांच्या लक्षात आल्या आणि त्या त्यांनी या ध्वनीचित्रफितीतून मांडल्या आहेत. तसेच ‘या समस्यांकडे गांभीर्याने पहा’, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिला आहे.

२. दुसरीकडे पंजाबचे भाजपचे प्रमुख श्‍वेत मलिक यांनी चावला यांचे म्हणणे खोडून काढले. ते म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून अमृतसर रेल्वेमध्ये बर्‍याच सुधारणा झाल्या आहेत. (वस्तूस्थिती सांगणार्‍या स्वतःच्याच नेत्याला खोटे ठरवणारे भाजपचे नेते ! रेल्वेची स्थिती काय आहे, हे जनतेला ठाऊक आहे, भाजपवाल्यांनी कितीही ती दडपण्याचा प्रयत्न केला, तरी ती लपू शकत नाही. जे भाजपवाले स्वतःच्या नेत्यांनी मांडलेल्या सूत्रांचे चिंतन करून त्यानुसार कृती करण्याऐवजी त्यांना खोटे पाडतात, ते भाजपवाले जनतेच्या मागण्यांकडे काय लक्ष देणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF