‘सनबर्न’ – एक धर्मविरोधी कार्यक्रम !

परात्पर गुरु पांडे महाराज

मागील काही वर्षांपासून आपल्या देशात ‘सनबर्न’ हा धर्मविरोधी कार्यक्रम चालू झाला आहे. यामध्ये आधुनिक संगीत आणि नृत्य यांसोबत मद्य अन् तत्सम मादक पदार्थ यांचा अनियंत्रित वापर केला जातो आणि या नशेतच तरुण पिढी या कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमाला शासनाची अनुमती आहे. अशा कार्यक्रमांना शासनाने अनुमती देणे, हे शासनाचा थिटेपणाच दर्शवते. युवावर्गाला भारतीय संस्कृतीच्या विरोधात जाण्यास प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम अत्यंत निषेधार्ह आहे. या वर्षी हा कार्यक्रम पुणे येथे चालू झाला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी शासनाला भरायचा कर बुडवला असूनही त्याच्या सादरीकरणाला शासनाकडून अनुमती दिली गेली आहे. अशा धर्मविरोधी कार्यक्रमाविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मांडलेले तेजस्वी विचार पुढे देत आहे.

१. ‘सनबर्न’ सारख्या रज-तमात्मक कार्यक्रमांना समर्थन करणार्‍यांची संख्या पुष्कळ असल्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अधिक काही करावे न लागणे

‘सध्याच्या काळात अशा प्रकारे पैसा उधळणे अत्यंत अयोग्य आहे. काही लोक या कार्यक्रमाचा अपलाभ करून घेऊन त्यांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगले कार्य करण्यासाठी संयम पाळावा लागतो, तसेच साधना करावी लागते. ‘सनबर्न’ सारख्या रज-तमात्मक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मात्र अधिक काही करावे लागत नाही. कारण कलियुगात माणसाचा स्वभाव मूलतः रज-तमयुक्त असतो. त्याला सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. असे न करता मानवाच्या वृत्तीला अधिकतम लयाकडे नेण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; कारण अशांना समर्थन (प्रोत्साहन) देणार्‍यांची संख्या आज पुष्कळ वाढली आहे.

२. आवश्यकतेपेक्षा अधिक पैसे मिळाले आणि वृत्ती तमोगुणी असली की, विचारांत पालट होणे

प्रत्येकाला गरजेपेक्षा अधिक पैसे मिळाले आणि त्याची वृत्ती तमोगुणी असेल, तर त्याचे विचार पालटतात. म्हणजे त्याचे विचार भौतिक सुखाच्या बाजूने अधिक होतात. अशा वेळी त्याला स्वतःच्या हिताचे भान रहात नाही. यावरून अलक्ष्मीची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी कायदाही काही करत नाही; कारण सध्या कायदा विकारग्रस्त झाला आहे. तो केवळ नावापुरता राहिला असून कायद्यांचे उल्लंघनच होतांना दिसते.

३. ‘सनबर्न’सारखा कार्यक्रम हेे भगवंताचे नियोजन असावे का ?

३ अ. चांगले आणि वाईट ही माया असून सृष्टीचे कार्य चालू रहाण्यासाठी दोन्हींची आवश्यकता असणे अन् ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांद्वारे वाईट शक्तींनी कार्य केल्याने त्यांच्या विरोधात चांगल्या शक्तींना कार्य करण्यास वाव मिळणार असणे : ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमातून वाईट शक्तींनी कार्य केले नाही, तर चांगल्या शक्तींना कार्य करण्यास वाव मिळणार नाही. सर्वच चांगले वागले, तर विरोध करायला वाव मिळणार नाही. यात ‘चांगल्याची परीक्षा होऊन त्याची वाढ होण्यासाठी ‘हे भगवंताचेच नियोजन असावे’, असे मला वाटते. याचे कारण म्हणजे अंधार आहे; म्हणून प्रकाशाला महत्त्व आहे. चांगले आणि वाईट ही मायाच असून सृष्टीचे कार्य चालू रहाण्यासाठी दोन्हींचीही आवश्यकता आहे. त्यामुळे शक्ती निर्माण होते. एखादा चांगला आणि एखादा वाईट, म्हणजे तेथे द्वैत आले. हा तुलनात्मक भाग झाला.

३ आ. चांगली आणि वाईट शक्ती या दोन्हींमध्ये भगवंताची शक्ती कार्यरत असून सृष्टीचे कार्य चालू रहाण्यासाठी विरोधात्मक शक्ती आवश्यक असली, तरी ती प्रमाणित अन् संतुलित हवी ! : चांगली आणि वाईट शक्ती कार्य करतांना त्यांतही भगवंताचीच चैतन्यशक्ती कार्य करत असते. दुष्ट शक्तींना उत्तेजन देऊन तिला नामोहरम करण्यासाठी सज्जन शक्ती वाढवणे आवश्यक असल्याने ‘भगवंतच त्यांना तसे सुचवत असावा’, असे मला वाटते; कारण विद्युत जोडणीतून वीज प्रवाहित होण्यासाठी तेथे ‘धन’ आणि ‘ऋण’ असे दोन्ही भार असावे लागतात. प्रत्येक व्यक्तीमध्येही चांगली आणि वाईट अशा दोन्ही शक्ती आहेत.

वाईट (दुष्ट) शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयम आवश्यक असतो. पृथ्वीचे उत्तरायण आणि दक्षिणायन असते. केवळ उत्तरायण असते, तर काय झाले असते ? उत्तरायण म्हणजे त्याग ! दक्षिणायन म्हणजे भोग ! भोग हा संयमात असला पाहिजे. तोे संयमाने साध्य होतो. संयमाच्या बाहेर भोग भोगला, तर तो विकार होतो. यावरून प्रत्येक ठिकाणी दोन भाग दिसतात. यावरून विरोधात्मक शक्ती आवश्यक आहे; मात्र ती प्रमाणित आणि संतुलित पाहिजे.

४. भौतिक गोष्टींचा उपभोग त्यागाने केला पाहिजे आणि त्यासाठी वृत्ती सुधारली पाहिजे !

भौतिक गोष्टींचा उपभोग त्यागाने केला पाहिजे. चैतन्य ग्रहण करून अनावश्यक सर्व टाकून दिले पाहिजे; पण आपण याच्या उलट करतो; कारण आपण वासनेत बद्ध असतो; म्हणून ‘वासनेच्या आहारी जाणे’ वाईट आहे. त्यासाठी वृत्ती सुधारली पाहिजे; पण आपण त्याचा विचार करत नाही. चांगला विचार करण्यासाठी देवाने बुद्धी दिली आहे आणि बुद्धी शुद्ध होण्यासाठी साधना आवश्यक आहे. योग्य साधनेसाठी गुरूंची आवश्यकता असते.

५. विचारधारेवर कार्य अवलंबून असणे

अ. केवळ विचारधारा चांगली असली; पण कृती झाली नाही, तरी काही उपयोग नाही. कार्य करण्यासाठी थोडातरी रजोगुण असायला पाहिजे. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज एकत्रित येऊन कार्य झाले, तर तमोगुणाचा नाश होतो, उदा. परशुराम एकटा होता, तरी त्याने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली.

आ. कोणतीही विचारधारा ही एकप्रकारे निर्गुण स्तरावरील असून ‘त्यानुसार कृती करणे’, म्हणजे सगुणात येणेे होय; मात्र या विचारांचा चांगला-वाईट परिणाम सगुणातून दिसून येतो. हिलाच आपण ‘परिस्थिती’ म्हणतो, जी आज अतिशय विघातक बनली आहे; कारण आजची विचारधारा योग्य धर्माचरणाच्या अभावामुळे तमोगुणी बनली आहे.

६. कार्य करण्यासाठी सातत्याने साधना करणे आवश्यक !

यासाठी सज्जन शक्तीला संघटित करून त्याद्वारे कार्य केले पाहिजे. दगड मारणे, व्यभिचार करणे आदी दुष्कर्म करण्यासाठी वाईट शक्ती त्वरित कार्यरत होते; मात्र चांगले कार्य करण्यासाठी संघटन करावे लागते. वाईट शक्ती अधिक आहे, तसेच तिच्यावर रज-तमाचा प्रभावही आहे. यासाठी प्रतिदिन साधना केली पाहिजे आणि स्वतःवरील आवरण काढले पाहिजे. जसे झाडून काढल्याने घर स्वच्छ रहाते, त्याप्रमाणे कार्य होण्यासाठी सातत्याने साधना केली पाहिजे.

७. रजोगुणाचे कार्य सत्त्वगुणासह झाल्यास ते यशस्वी होणे आणि रजोगुण तमोगुणासह कार्यान्वित झाल्यास अधर्माचरण होऊन अयोग्य कृती होणे

‘सर्वत्र चैतन्यच कार्यान्वित आहे’, हे जाणून कार्य करावे, यासाठी भगवंताने त्रिगुण दिले आहेत. कारणाविना कार्य होत नाही. त्यासाठी रजोगुण हे कारण आहे. जेव्हा रजोगुण सत्त्वगुणासह कार्य करतो, तेव्हाच तो ईश्‍वरचरणी लीन होतो. अशा प्रकारे केलेले कार्य यशस्वी ठरते. ते खरे राजकारण होय. रजोगुण तमोगुणासह कार्यान्वित होतो, म्हणजे अधर्माचरणी होतो आणि त्याच्याकडून अयोग्य कृती होऊ लागतात. तेव्हा तो जीव भगवंतापासून दूर जाऊ लागतो. यामुळे ‘यशस्वी कार्यासाठी सावधानतेने कार्य करण्याची किती आवश्यकता आहे ?’, हे लक्षात येते. ‘भगवंताविना हे होणे अशक्य आहे’, हे शेवटी सिद्ध होते.

८. पिढ्यान्पिढ्या धर्माचरण करण्याचे महत्त्व !

भगवंताने श्रीमद्भगवत्गीतेच्या ३ रा अध्याय, श्‍लोक १६ मध्ये ‘एवं प्रवर्तितं चक्रं । ..’ असे म्हटले आहे, म्हणजे ‘जो मनुष्य या जगात परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगांत रमणारा आणि पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थ जगतो.’ याउलट धर्माप्रमाणे चालणारे कर्म पिढ्यान्पिढ्या अखंडपणे घडत राहिल्यास आपल्याला रामराज्याप्रमाणे परिस्थिती दिसून येईल.

पडणार्‍या दोन थेंबांमध्ये काही अवकाश असेल, तर त्याला अखंड म्हणता येणार नाही. कोणतेही कार्य करतांना त्यामध्ये अखंडता नसल्यास वाईट शक्ती मध्ये घुसण्याचा धोका असतो. यासाठी साधनेच्या दृष्टीने पिढ्यान्पिढ्या धर्माचरण करत राहिले पाहिजे. ते अंगवळणी पडले पाहिजे. यासाठी साधना आणि कार्य दोन्हीही महत्त्वाचे आहे. कार्यासमवेत साधनाही झाली पाहिजे.

९. कार्य करतांना सत्य-असत्याची परीक्षा घेणे आवश्यक !

९ अ. सत्याची परीक्षा झाल्याविना ते सिद्ध न होणे : नेहमी सर्वत्र सत्य असले पाहिजे. थोडे जरी असत्य असले, तरी सर्वांचाच नाश होतोे. जसे बासुंदीमध्ये मिठाचा खडा टाकला, तर ती नासून जाते. सत्याची परीक्षा झाल्याविना सत्य सिद्ध होत नाही; म्हणून सत्याची परीक्षा घेऊन ते सिद्ध करावे लागते. जसे सोन्याला तापवल्याविना त्याची परीक्षा होत नाही. तापणे म्हणजे ‘तपस्या किंवा साधना करणे’ होय. एखाद्या व्यक्तीला साधनेने तापवून त्यातील काळी शक्ती गेल्याविना तिच्यातील चैतन्य प्रगट होत नाही. यावरून ‘सर्व ठिकाणी साधना किती महत्त्वाची आहे’, हे दिसून येते.

९ आ. सत्य जाणण्यासाठी असत्याला बाजूला केले पाहिजे ! : सत्याला उघडण्यासाठी असत्याला बाजूला केले पाहिजे, जसे सूर्यावर आलेले ढग बाजूला झाल्यावर सूर्यप्रकाश दिसतो. चैतन्य असतेच; पण ते उघड केले पाहिजे; म्हणून सज्जन शक्तींनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे.

९ इ. सत्यामध्ये सामर्थ्य असल्यानेच ते टिकून रहाणे; मात्र सत्य सिद्ध करण्यासाठी त्याची परीक्षा घेतली जाणे : पूर्वीपासूनच ‘सत्यमेव जयते ।’ असे म्हटले जाते. सत्याचा विजय होण्यासाठी प्रथम जिवाच्या आत्मचैतन्यावरील काळे आवरण काढावे लागते. जसे पितळ्याच्या बांगडीला सोन्याचा मुलामा दिला, तर काही दिवसांनी पितळ उघडे पडते.

सत्य हे सत्यच रहाते; मात्र सत्य सिद्ध करण्यासाठी त्याची परीक्षा घेतली जाते. तेव्हाच ते अधिक उजळून निघते. सत्याला सिद्ध करण्यासाठी नेहमी विरोध होत असतो; मात्र जे सत्य आहे, त्यामध्ये सामर्थ्य असल्याने ते टिकून रहाते. असत्य मात्र तात्पुरते असते. त्यामुळे ‘सत्यमेव जयते ।’ असे म्हटले आहे.

९ ई. रज-तमाचा थोडासा मुलामा असेल, तरच सत्य कार्य करते ! : सरकार नावापुरते ‘सत्यमेव जयते ।’ अशी पाटी लावते. प्रत्यक्षात राजकारणी मंडळी असत्याच्या आहारी जातात. असत्य असल्याने तेथे जडत्व येते. असत्यावर काळे आवरण असल्याने ते स्थूल रूपात दिसते. कार्य करतांना सत्य अगदी शुद्ध आणि सत्य स्वरूपात राहू शकत नाही; म्हणून त्याला ‘अनृत (असत्य)’ असे म्हटले आहे.

अगदी निखळ सत्य कार्य करू शकत नाही. शुद्ध सोन्याची बांगडी केली, तर ती वाकते. ती ताठ रहाण्यासाठी तिच्यामध्ये काही अंशी तांबे मिश्रित करावे लागते. याचप्रकारे राज्यकारभार करतांना रजोगुण असलेल्या राजाची आवश्यकता आहे. ब्राह्मतेजाला क्षात्रतेजाची आवश्यकता असतेे. यासाठी राजाला ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ अशी संज्ञा घ्यावी लागते. याला ‘भगवंताचे नियोजन’ म्हणतात. हे सर्वांना शिकवायला पाहिजे; म्हणून रजोगुण सत्त्वगुणाकडे वळल्यासच कार्य चांगले होऊ शकते.

१०. ‘सत्यमेव जयते’च्या पाट्या लावून आतून असत्याचे कार्य केले जाणे

सध्या केवळ ‘सत्यमेव जयते ।’ च्या पाट्या लावून आतून असत्याचे कार्य केले जाते. बाहेरून ‘उपाहारगृह’ चांगले वाटते; मात्र आत मद्यविक्री आणि अवैध धंदे चालू असतात. दिखाऊ व्यक्तीचा पोशाख बाहेरून शुभ्र दिसतो; मात्र त्याची वृत्ती दूषित असू शकते. समजा गाढवाने वाघाचे कातडे पांघरले; तरी तो वाघ होऊ शकत नाही. त्याला मारले, तर तो वाघासारखी डरकाळी फोडणार नाही, तर गाढवासारखेच ओरडेल; म्हणून परीक्षा घेतल्यावरच सत्य बाहेर पडते.

न्यायालयात ‘मी सत्य सांगेन’, अशी शपथ घेतली जाते. वास्तविक तेथे सत्य सांगणेच अपेक्षितही असते; पण तेथे बहुतेक असत्यच चालू असते. जगात सर्वत्र दिखाऊ अशा सत्याचे नाटकच चालू असते.

११. ‘सनबर्न’सारख्या धर्मविरोधी कार्यक्रमाद्वारे वातावरण दूषित करण्याचे षड्यंत्र चालू असून ते हाणून पाडण्यासाठी सत्याचा आधार घेणे आवश्यक असणे

वरील विवेचनावरून असे लक्षात येते की, माणूस ‘सर्व काही सत्य आहे’, असे गृहीत धरून वागतो; म्हणून सत्य बाहेर काढायला पुष्कळ वेळ लागतो. ‘सनबर्न’ सारख्या धर्मविरोधी कार्यक्रमाचे नियोजन करून, समाजातील असत्य गोष्टींना पुढे आणून वातावरण दूषित करण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे हाणून पाडण्यासाठी सत्याचा आधार घेणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील प्रत्येकावर धर्माचरणाचा संस्कार होऊन सत्य गोष्टींना (धर्माला) पुढे आणणे आवश्यक आहे.

१२. सनातन संस्था समाजातील अशा प्रकारचे दूषित आवरण काढण्यासाठी धर्माचरणाला प्राधान्य देऊन सत्य प्रस्थापित करण्याचे कार्य करत आहे. अशा प्रकारचे कार्य होण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !’

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१२.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF