विरार (जिल्हा पालघर) येथे अवैधरित्या होणारी गायींची वाहतूक हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांच्या साहाय्याने रोखली !

आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – विरार येथे गायींची अवैधरित्या होणारी वाहतूक भारतीय गोवंश रक्षण परिषदेचे श्री. राजेश पाल आणि श्री. अशोक चौधरी यांनी विरार पोलिसांच्या साहाय्याने साईनाथनगर येथे रोखली. या प्रकरणी अवैध वाहतूक करणारे राजेश तांडेल याला पोलिसांनी कह्यात घेतले असून त्याच्यावर महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम १९७६ आणि पशूंच्या प्रती क्रूरतापूर्वक व्यवहार अधिनियम १९६० अंतर्गत विरार पोलीस ठाण्यात श्री. राजेश पाल यांनी ‘एफ.आय्.आर्.’ नोंदवली आहे. पोलिसांनी अवैध वाहतुकीचा टेम्पो कह्यात घेतला असून त्यामधून २ गायी आणि २ वासरे यांची सुटका करण्यात आली आहे. २८ डिसेंबरच्या रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुटका करण्यात आलेल्या गायी आणि वासरे यांना भालीवली, सकवार येथील गोशाळेत संगोपनासाठी ठेवण्यात आले आहे. श्री. राजेश पाल यांना राजेश तांडेल हे गोवंशियांची अवैध वाहतूक करत असल्याची कुणकुण लागली. ही बातमी समजताच श्री. पाल आणि श्री. चौधरी यांनी याविषयी विरार पोलीस ठाण्यात कळवून गोवंशाची अवैध वाहतूक होत असलेल्या वाहनाचा पाठलाग केला.


Multi Language |Offline reading | PDF