लोकसभेमध्ये तोंडी तलाक विधेयक संमत

नवी देहली – २७ डिसेंबरला लोकसभेमध्ये तोंडी तलाक विधेयक २४५ विरुद्ध ११ मतांनी संमत करण्यात आले. मतदानाआधीच काँग्रेससहित काही इतर विरोधी पक्षांनी सभात्याग करत विरोध दर्शवला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर २५६ खासदारांनी मतदान केले. लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर आता ते राज्यसभेत मांडण्यात येईल. त्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

काँग्रेससह विरोधी पक्षांकडून गदारोळ

विधेयक संमत होण्यापूर्वी सकाळी लोकसभेत तोंडी तलाक विधेयकावर चर्चा चालू झाली; मात्र त्याच वेळी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष यांनी राफेल करारावरून चर्चेची मागणी करत गदारोळ केला. (मुसलमानांना खूश करण्यासाठी त्यांच्या महिलांना वार्‍यावर सोडणारी काँग्रेस म्हणे महिलांवरील अन्याय दूर करणार ! शाहबानो हिला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला पोटगी मिळण्याचा न्याय हिरावून घेणारी हिच काँग्रेस आहे, हे लक्षात ठेवा ! – संपादक) यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. तसेच राज्यसभेतही राफेल करारावरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (गदारोळ करून संसदेचे कामकाज बंद पाडल्यामुळे होणारा खर्च संबंधित खासदार आणि त्यांचा पक्ष यांच्याकडून वसूल करण्याचा नियम भाजप सरकार का करत नाही ? – संपादक) संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे. २४ डिसेंबरला सरकारने तोंडी तलाकचे विधेयक लोकसभेत मांडले होते. त्यावर २७ डिसेंबरला चर्चा होणार होती.

१. सकाळी संसदेबाहेर बोलतांना काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘‘काँग्रेस या विधेयकावर चर्चा करण्यास सिद्ध आहे; पण सरकारने धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये.’’ (हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक गोष्टींत काँग्रेसने हस्तक्षेप केला आहे, याविषयी खरगे बोलतील का ? मंदिरांच्या सरकारीकरणाचे पाप काँग्रेसनेच चालू केले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. सकाळी ११ वाजता कामकाजाला प्रारंभ होताच खरगे यांनी राफेल करारावर चर्चेची मागणी केली. (सकाळी एक बोलायचे आणि नंतर दुसरेच करायचे, अशा खोटारड्या वृत्तीचे काँग्रेस नेते ! – संपादक) ‘यावर १२ वाजता बोलण्याची संधी देऊ’, असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले.

३. यानंतर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष यांच्या खासदारांनी गदारोळ घातला. यावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी, ‘तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही’, असे खरगे यांना सांगितले. ‘जे सदस्य कामकाजात अडथळे आणतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही लोकसभेच्या अध्यक्षांनी दिली. तरीही गदरोळ चालू राहिल्याने दुपारपर्यंत लोकसभा स्थगित करण्यात आली. दुपारी भोजनानंतर पुन्हा यावर चर्चा चालू झाली.

तोंडी तलाक विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही ! – कायदेमंत्री रविशंकर प्रसाद

असे असले, तरी ही मुसलमानांमध्ये असलेली कुप्रथा असून त्यामुळे सामान्य मुसलमान महिलेचे जीवन उद्ध्वस्त होते, हे सांगण्यास भाजपचे मंत्री का घाबरतात ?

नवी देहली – तोंडी तलाक विधेयक कोणत्याही समाज किंवा धर्म यांच्या विरोधात नाही, असे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत स्पष्ट केले. हे विधेयक महिलांचे अधिकार आणि त्यांच्या न्यायासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे ! – काँग्रेस

हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक असून यावर सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. हे विधेयक घटनेशी संबंधित असून ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे,असे  काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले.

‘या विधेयकाचा थेट परिणाम ३० कोटी महिलांवर होणार असून त्यांचे रक्षणही महत्त्वाचे आहे’, असेही त्यांनी नमूद केले.  सर्वच विरोधी पक्षांची ही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हा देश शरीयतवर नाही, तर घटनेवर चालतो’, असे सांगत अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या विधेयकावरील सरकारची बाजू स्पष्ट केली.


Multi Language |Offline reading | PDF