किन्निगोळी येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात दुर्ग, छत्तीसगड येथील कु. अंजली आणि कु. शर्वरी कानस्कर यांनी सादर केलेल्या नृत्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

श्री. राम होनप

‘११.११.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्निगोळी येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात दुर्ग, छत्तीसगड येथील कु. अंजली कानस्कर (वय १९ वर्षे) आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) यांनी नृत्यसेवा सादर केली. याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

१. गुरुवंदना

कु. शर्वरी कानस्कर – नृत्य करतांना शर्वरीने आपल्या हातांनी फुले अर्पण करण्याची मुद्रा केली, तेव्हा तिच्या हातातून चंदेरी रंगाचे दैवी कण वातावरणात पसरले.

२. सरस्वती वंदना : कु. अंजली आणि कु. शर्वरी (एकत्रित नृत्य)

सरस्वतीदेवीची उपस्थिती जाणवली आणि स्वर्गलोकातील ४ – ५ देवता उत्सुकतेने हे नृत्य पहातांनाचे दृश्य मला दिसले. ‘या देवतांची नावे काय आहेत ?’, हे मला समजू शकले नाही.

नृत्य सादर करतांना कु. शर्वरी कानस्कर

३. थाट

पारंपरिक नृत्य करतांना ‘समे’ला विशिष्ट मुद्रा करून उभे रहाण्याच्या पद्धतीला ‘थाट’, असे म्हणतात. (संदर्भ : संकेतस्थळ ‘विकिपिडीया’) शर्वरीने केलेल्या नृत्याद्वारे वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण अधिक प्रमाणात होऊ लागले.

४. ‘समे’ची व्याख्या

एखादी रचना तीन वेळा सादर करून येणार्‍या पहिल्या अक्षराला ‘सम’, असे म्हणतात. (संदर्भ : संकेतस्थळ ‘विकिपिडीया’)

४ अ. नृत्यातील ‘समे’तून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होण्याचे कारण : नृत्यातील ‘समे’च्या वेळी वातावरणात सर्वाधिक चैतन्य पसरत असल्याचे मला जाणवले. नृत्यात रचना (हस्तक किंवा पदन्यास यांचा समूह) पूर्ण झाल्यावर ‘सम’ येते. एखादी क्रिया पूर्ण झाल्यावर त्याचे फळ मिळते, त्याप्रमाणे नृत्यातून एखादी रचना तीन वेळा सादर केल्यावर त्याचे आध्यात्मिक फळ समेला प्राप्त होते; कारण त्या वेळी नृत्यातील एक प्रक्रिया पूर्ण झालेली असते. परिपूर्णतेत चैतन्याचा वास असतो. त्यामुळे नृत्यातील ‘समे’तून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. हे सूत्र गायन आणि वादन यांच्यासंदर्भातही लागू आहे.

नृत्य सादर करतांना कु. अंजली कानस्कर

५. कवित् – कु. शर्वरी आणि कु. अंजली (एकत्रित नृत्य)

यात कवितेत दिलेल्या वर्णनानुसार नृत्य सादर केले जाते. (संदर्भ : संकेतस्थळ ‘विकिपिडीया’) कवितेतील श्रीकृष्णाचे वर्णन, त्याचा खोडसाळपणा इत्यादी वर्णनांनुसार शर्वरी आणि अंजली यांनी नृत्य सादर केले.

५ अ. ‘कवित्’ नृत्यप्रकारातून होणारा आध्यात्मिक लाभ : कवितेतील देवतेच्या वर्णनानुसार नृत्य केल्याने साधक देवाशी जोडला जाऊन त्याचा प्रथम देवाशी आपलेपणा निर्माण होतो. त्यानंतर साधकाला देव मित्राप्रमाणे जवळचा वाटू लागतो. त्यामुळे साधकाचे देवाशी ‘मित्रत्व’ होते. त्यानंतर साधकाचे देवाशी हळूहळू ‘सख्यत्व’ होऊ लागते. परिणामी साधकात सख्यभक्ती निर्माण होण्यास साहाय्य होते.

अध्यात्मात सख्यभक्ती साध्य करणे कठीण आहे; पण या नृत्यप्रकारामुळे देवाशी जवळीक लवकर साधली जाते आणि त्यातून साधकाला मिळणारा आनंद वृद्धींगत होऊ लागतो.

६. नृत्यातील हस्तक, म्हणजे एका विशिष्ट मुद्रेचा सूक्ष्मातील परिणाम

नृत्य करणार्‍या साधिकांनी हस्तक, म्हणजे वरच्या दिशेने हाताने काहीतरी मिळवल्याप्रमाणे मुद्रा केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःभोवती वर्तुळाकारात फिरून आपले हात श्रोत्यांच्या दिशेने केले. साधिकांनी हात वरच्या दिशेने केले, तेव्हा त्यांना हातांच्या बोटांद्वारे चैतन्य ग्रहण करता आले आणि वर्तुळाकारात फिरतांना साधिकांच्या हातातून श्रोत्यांच्या दिशेने चैतन्याचे प्रक्षेपण झाले.

‘ज्याप्रमाणे मनुष्य फळांच्या झाडावरील फळे तोडून इतरांना देतो त्याप्रमाणे वरील प्रक्रिया घडली’, असे मला जाणवले. ही मुद्रा विविध नृत्यप्रकारांतही अधून-मधून वापरली जाते. अशा मुद्रांतून नृत्य करणार्‍या साधकाला वेळोवेळी चैतन्य प्राप्त होऊन त्याचे नृत्य आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिणामकारक होण्यास साहाय्य होते.

७. पढन्त

या नृत्याच्या वेळी तबल्यासमवेत पखवाजचा उपयोग केला जातो. (संदर्भ : संकेतस्थळ ‘विकिपिडीया’)

७ अ. कु. शर्वरी आणि कु. अंजली (एकत्रित) : पढन्त करतांना वातावरणात वेगाने लाल-पिवळ्या रंगाच्या सात्त्विक लहरी पसरत होत्या.

८. गतनिकास

यात सुंदर चाल-चलन प्रदर्शित केले जाते. (संदर्भ : संकेतस्थळ ‘विकिपिडीया’)

८ अ. नृत्यातील मारक शक्ती सहन न झाल्याने वाईट शक्ती कार्यक्रम असलेल्या सभागृहाच्या बाहेर पडणे आणि अहं दुखावल्याने वाईट शक्ती लढण्यासाठी परत सभागृहात येणे : नृत्य करतांना शर्वरी आणि अंजली विशिष्ट गतीने आपले पाय भूमीवर सतत आपटत होत्या. त्याच्या जोडीला त्यांच्या पायातील घुंगरांचा नाद होत होता. त्या वेळी वातावरणात मारक शक्ती पुष्कळ प्रमाणात पसरू लागली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या लहान, म्हणजे अल्प शक्ती असलेल्या वाईट शक्तींना या नृत्यप्रकारातील मारकता सहन न झाल्याने त्या कार्यक्रम असलेल्या सभागृहाच्या बाहेर पडल्या; परंतु यात वाईट शक्तींचा अहं दुखावल्याने त्या परत सूक्ष्मातून लढण्यासाठी कार्यक्रमस्थळी आल्या. नृत्यातील मारक शक्ती सहन न झाल्याने त्या सैरभैर होऊन इकडे-तिकडे फिरतांना दिसल्या.

९. शिवासंबंधीचे नृत्य – कु. प्रतीक्षा आचार्य

अ. शिवाची साधना करणारी पुष्कळ भुते हातात त्रिशूळ घेऊन नृत्य करतांना दिसली.

आ. प.पू. देवबाबा शिवाच्या स्मरणात खोल ध्यानात गेल्याचे जाणवले.

१०. शिवस्तुती – कु. अंजली कानस्कर

तिसर्‍या पाताळातून वटवाघुळे वरच्या दिशेने आली. त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्पन्न होणारी शिवाची शक्ती प्राप्त करायची होती.

११. ‘श्रीराम चंद्र कृपाळू भज मन’ हे भक्तीगीत – कु. शर्वरी कानस्कर

हे नृत्य पहातांना श्रीरामाचे स्मरण होऊन माझा भाव जागृत झाला. शर्वरीच्या भावमुद्रेतून निरागसता व्यक्त होत होती.

१२. प.पू. देवबाबा आणि श्री. राम होनप यांच्यात विविध विषयांवर सूक्ष्म ज्ञानाच्या संदर्भात झालेले संभाषण

१२ अ. कु. शर्वरी आणि कु. अंजली यांनी देहभान विसरून नृत्य केल्याने त्यांच्या हृदयातील ज्योत प्रज्वलित झाल्याचे प.पू. देवबाबा यांनी सांगणे

श्री. राम होनप : कु. शर्वरी आणि कु. अंजली यांनी कार्यक्रमाच्या शेवटी ‘तराना’ हा नृत्यप्रकार सादर केला. त्या वेळी दोघींच्या हृदयाच्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित झाल्याचे दृश्य मला दिसले. त्यामागील कारण काय ?

प.पू. देवबाबा : दोघी नृत्य करतांना देहभान विसरून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना ही अनुभूती आली.

१२ आ. नृत्य करणार्‍या साधिकांच्या हृदयाच्या ठिकाणी ज्योत दिसणे, हे अनाहतचक्र जागृत झाल्याचे लक्षण असणे

श्री. राम होनप : हृदयाच्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित झाल्याचे दिसणे, म्हणजे साधिकांचे नृत्याच्या वेळी अनाहतचक्र जागृत झाल्याचे लक्षण आहे का ?

प.पू. देवबाबा : हो

१२ इ. नृत्य करतांना साधिकेच्या मनात ‘माझे नृत्य कसे होईल’, हा काळजीयुक्त विचार आल्याने तिच्याभोवतीच्या दैवी ऊर्जेचा रंग पालटल्याचे प.पू. देवबाबा यांनी सांगणे

श्री. राम होनप : कार्यक्रमाच्या शेवटी कु. शर्वरी आणि कु. अंजली नृत्य करतांना त्यांच्याभोवती मला लाल रंगाची दैवी ऊर्जा बर्‍याच वेळ दिसत होती. ‘ही ऊर्जा त्यांना कुठून मिळत आहे ?’, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा लक्षात आले, ‘प.पू. देवबाबा हे दोघींच्या नृत्यावर प्रसन्न असून त्यांच्या आशीर्वादाने शर्वरी आणि अंजलीला लाल रंगाची आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होत आहे.

प.पू. देवबाबा : तुम्ही बरोबर सांगितले; पण नंतर नृत्य करतांना अंजलीच्या मनात ‘माझे नृत्य कसे होईल’, हा काळजीचा विचार येऊन गेला. त्यामुळे तिच्याभोवतीच्या आध्यात्मिक ऊर्जेचा रंग पालटला.

(वरील उत्तर ऐकून माझ्या मनात पुढील विचार आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी ईश्‍वरप्राप्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन करण्याविषयी प्रकर्षाने सांगितले आहे. याचे महत्त्व वरील उदाहरणावरून लक्षात येते. मनात आलेल्या एका नकारात्मक विचाराने व्यक्तीच्या आभेत पालट होतो. यावरून दिवसभरातील विविध विचारांचा आपल्यावर सूक्ष्म परिणाम किती होत असेल !’)

१२ ई. नृत्यातील ‘समे’तून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होत असून एका लयीत पाय भूमीवर आपटण्याच्या क्रियेतून वातावरणात मारक शक्तीचे प्रक्षेपण होत असणे

श्री. राम होनप : नृत्यातील ‘समे’तून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होते आणि नृत्यात एका लयीत पाय भूमीवर आपटण्याच्या क्रियेतून वातावरणात मारक शक्तीचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवते.

प.पू. देवबाबा : बरोबर आहे.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF