मनुस्मृतीला विरोध करणार्‍यांनी मनुस्मृति अभ्यासावी !

श्री. चेतन राजहंस

काही मासांपूर्वी वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांनी ‘सार्थ श्रीमनुस्मृती’ अशा नवीन नावाने मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर करून प्रकाशन केले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड या जातीयवादी नेत्याने ‘हा ग्रंथ ज्या दुकानात विक्रीसाठी असेल, ते दुकान फोडू’, अशी धमकी दिली होती. आता २४ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते छगन भुजबळ यांनी वैजापूर येथे समता परिषदेच्या मेळाव्यात मनुस्मृतीचे दहन केले. या अनुषंगाने मनुस्मृति या धर्मग्रंथाविषयी सनातनचा दृष्टीकोन पुढीलप्रमाणे आहे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

१. मनुस्मृति या धर्मग्रंथावर बंदी असेल, तर ती पूर्णतः चुकीची आहे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याआधी सहस्रो वर्षे मनुस्मृति होती. मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसारच राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.

२. प्रसिद्ध ‘कोलकाता कुराण पीटीशन’वर निकाल देतांना कोलकाता उच्च न्यायालयाने हे मान्य केले की, कुराणमधील काही वाक्ये दोन समाजांत वितुष्ट आणू शकतात; मात्र हा अर्वाचीन धर्मग्रंथ असल्याने त्यावर बंदी आणू शकत नाही. हाच न्याय अन्य धर्मग्रंथांनाही लागू होतो. त्यामुळे जरी अशी बंदी असेल, तर आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ.

३. वर्ष १७९४ मध्ये विल्यम जोन्स या इंग्रजाने मनुस्मृतीचा अनुवाद इंग्रजीत केला. नित्शे या जर्मन तत्त्ववेत्त्यावर मनुस्मृतीचा विलक्षण प्रभाव पडलेला दिसतो. तो म्हणतो, बायबल बंद करा आणि मनुस्मृति उघडा. राज्यशासनाने प्रसिद्ध केलेल्या विश्‍वकोषातच ही माहिती दिलेली आहे.

४. मनु जन्माने ब्राह्मण होता, असे गृहीत धरून ब्राह्मणद्वेषापोटी त्यांच्या नावाने काही जण गोंधळ घालतात. मनु हे ब्राह्मण नव्हते, ते इश्‍वाकु वंशाचे, म्हणजेच प्रभु श्रीरामचंद्र ज्या वंशाचे होते, त्या वंशातील क्षत्रिय होते, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

५. मनुस्मृति हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. तो वाचून आज कोणी त्याप्रमाणे आचरण करत नाही. त्यामुळे त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही.

६. ज्या जातीयवादाविषयी मनुस्मृतीला दोषी ठरवले जाते, त्या मनुस्मृतीमध्ये जातीयवादाचा उल्लेखही नाही.

७. ‘दलित’ हा शब्दप्रयोग मनूने कधीच केला नाही. तो सर्वप्रथम इंग्रजांनी भारतात ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करण्यासाठी आणला. कोणत्याही धर्मग्रंथात ‘दलित’ या शब्दाचा उल्लेख नाही.

८. महर्षि मनु यांनी सांगितले आहे, ‘जन्मना जायते शूद्र: ।’ म्हणजेच व्यक्ती जन्मतःच शूद्र असते. नंतर ती तिच्या गुण-कर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ठरवली जाते. जरी एखाद्या ब्राह्मणाचे अपत्य गुण-कर्मानुसार ब्राह्मण नसेल, तर त्याला शूद्र ठरवले जाते. तसेच शूद्राचे अपत्य गुण-कर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रियही ठरवले जाते. याची उदाहरणेच द्यायची तर, एका मत्स्यगंधेचा पुत्र व्यास आपल्या तपश्‍चर्येने महर्षि व्यास झाले. विश्‍वामित्र हे आधी क्षत्रिय होते, ते साधना करून ऋषि झाले. दरोडे घालणारा वाल्या कोळी तपश्‍चर्या करून वाल्मीकि ऋषि झाला. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

९. आजही शासन-प्रशासनात चार वर्गांनुसार अधिकार्‍यांच्या श्रेणी ठरतात. आजही अनेक क्षेत्रांत वर्गवारी गुण-कर्मानुसारच ठरवली जाते. ती आपण मान्यच करतो. मग धर्मग्रंथांत लिहिलेले का मान्य नाही ?

१०. महर्षि मनु यांनी वेदांचा अभ्यास करून कायदा-सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांसाठी मनुस्मृति हा ग्रंथ लिहिला. अजूनही राजस्थानच्या न्यायालयाबाहेर महर्षि मनु यांचा पुतळा आहे, जो अनेक वर्षांपासून आहे.

११. गुंडगिरीची भाषा करणारे जितेंद्र आव्हाड यांनी आधी मनुस्मृति अभ्यासावी ! : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीवरील ग्रंथ विकणारी दुकाने फोडण्याची घटनाविरोधी धमकी दिली होती. आव्हाडांनी असे करण्याआधी मनुस्मृति वाचली आहे का ? नसेल वाचली, तर त्यांनी ती प्रथम वाचावी आणि अभ्यासावी.

१२. मनुस्मृति ग्रंथ असलेली दुकाने फोडण्याची भाषा करणे, हा राज्यघटनेचा आणि पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान ! : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृति जाळली होती. याचा संदर्भ देत दुकाने फोडण्याची धमकी देणार्‍यांनी ‘बाबासाहेबांनी घटनेत ‘तोडफोड करा’, याला मान्यता दिली आहे का ?’, याचा अभ्यास करावा. आव्हाड यांची ही गुंडगिरीची भाषा पहाता महाराष्ट्राचे किती राजकीय अधःपतन झाले आहे, हे लक्षात येते. आम्ही राज्यघटनेचे पालनकर्ते आणि कायदा पाळणारे आहोत. जर आव्हाड यांनी दुकानांची तोडफोड करून ग्रंथांची नासधूस केली असती, तर आम्ही आव्हाड यांच्या विरोधात धर्मग्रंथांची विटंबना केल्याप्रकरणी घटनेने दिलेल्या कलम २९५ अ नुसार गुन्हा दाखल केला असता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवणारेच कायदा सुव्यवस्था मोडून राज्यघटनेचा आणि पर्यायाने बाबासाहेबांचाच अवमान करत आहेत.

१३. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेत आहात, त्याचे काय ? : नथुराम गोडसे यांच्यावरील नाटक उधळणारे आव्हाड, जेएन्यूत आतंकवादी अफझलचे समर्थन करणार्‍या कन्हैया कुमारचे समर्थन करतात. देशविरोधी घोषणा देणार्‍यांचे समर्थन करून हे बाबासाहेबांच्याच राज्यघटनेची पायमल्ली करतात. खरे घटनाद्रोही हेच आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या झाली, तेथून त्यांना परागंदा व्हावे लागले. त्याविषयी एकदाही न बोलणारे आव्हाड गाझापट्टीवर इस्रायलने आक्रमण केल्याने मुसलमानांचा पुळका आल्यावर ‘सेव्ह गाझा’चे टी-शर्ट घातले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काही करू शकता, मग मनुस्मृति हा ग्रंथ वितरण करणारे किंवा नथुराम गोडसे यांचे नाटक प्रदर्शित करणारे, यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेत आहात, त्याचे काय ?

१४. इशरतजहाँचे समर्थन करणारे आव्हाड यांनी सांगावे की, इशरतने कोणती मनुस्मृति वाचली होती; म्हणून ती आतंकवादी बनली ?

१५. ज्या धर्मग्रंथांचा हवाला देऊन हिंसाचार होतो, आतंकवाद निर्माण केला जातो, हत्या आणि बलात्कार केले जातात, अशा अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांंवर बंदीसाठी ही मंडळी ब्रही काढत नाहीत.

१६. मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी हिंदूंवर अत्याचार केले; म्हणून आता त्यांचा छळ करायचा का ? : पूर्वीच्या काळी काही कर्मठ ब्राह्मणांनी काही चुकीच्या प्रथा निर्माण करून समाजातील वातावरण बिघडवले असेल; मात्र आता तशी स्थिती नाही. त्यामुळे आता ब्राह्मणांना ‘तुमच्या पूर्वजांनी आम्हाला त्रास दिला; म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो’, असे म्हणणे कितपत योग्य आहे ? असेच जर असेल, तर पूर्वीच्या काळी ७ व्या शतकापासून इंग्रजांचे राज्य येईपर्यंत मुसलमान आक्रमकांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, इंग्रजांनी १५० वर्षे भारतियांवर अनन्वित अत्याचार केले; म्हणून आज मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याविषयी तुमच्या पूर्वजांनी आम्हाला त्रास दिला; म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देणार, असे म्हणतांना कोणी दिसत नाही ?

१७. ‘नैनं दहति पावक: ।’ : ग्रंथ जाळल्याने त्यातील विचार संपत नाहीत. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे ‘नैनं दहति पावक: ।’ म्हणजे अग्नी जाळू शकणार नाही, अशी मनुस्मृति आहे. त्यामुळे ती जाळल्याने वा फाडल्याने, तोडफोड केल्याने त्यातील विचार संपणार नाहीत; कारण मनुस्मृतीमध्ये अग्नीप्रमाणे जीवनाला आवश्यक असे तत्त्व असल्याने बाह्य आग तिच्यातील तत्त्वाला कदापि जाळू शकत नाही. मनुस्मृतीतील तत्त्वज्ञान हे परमश्रेष्ठ, अविनाशी आणि वंदनीय आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now