केसांना खोबरेल तेल लावल्यानंतर केस कोरडे होणे किंवा काही वेळा पुष्कळ तेलकट होणे यांमागील शास्त्र

कु. मधुरा भोसले

‘केसांना खोबरेल तेल लावल्यावर केस थोडे तेलकट होतात. हा तेलाचा केसांवरील सर्वसामान्य परिणाम आहे; परंतु काही वेळा केसांना खोबरेल तेल लावल्यानंतर केस कोरडे होतात किंवा काही वेळा पुष्कळ तेलकट किंवा चिकट होतात. या मागील आध्यात्मिक कारण पुढीलप्रमाणे आहे.

१. केसांमध्ये घडणारी सूक्ष्म प्रक्रिया आणि केसाला तेल न लावल्यामुळे होणारी हानी

केसांच्या पोकळीमध्ये चांगल्या किंवा वाईट शक्तींच्या लहरी प्रवाहित होत असतात. वातावरण रज-तम प्रधान असेल, तर केसांमधून त्रासदायक शक्तीच्या लहरी अधिक प्रमाणात प्रवाहित होतात. त्यामुळे केसाच्या टोकापासून मुळापर्यंत आणि मुळापासून टोकापर्यंत त्रासदायक शक्तीच्या लहरी वहात असतात. त्यामुळे व्यक्तीच्या डोक्यामध्ये त्रासदायक शक्तीचे स्थान निर्माण होण्यास पूरक स्थिती निर्माण होते. डोक्यामध्ये त्रासदायक शक्तीची स्थाने निर्माण झाल्यावर केसांमधून त्रासदायक शक्तीच्या लहरींचे वहन सतत चालू होते. अशा प्रकारे केस त्रासदायक शक्तीचे वहनकेंद्र बनतात.

२. केसांना खोबरेल तेल किंवा सात्त्विक सुगंधी तेल लावल्यामुळे होणारा परिणाम

केसांना खोबरेल तेल लावल्यावर केसांद्वारे तेल शोषून घेतले जाते. त्यामुळे केसांच्या सूक्ष्म पोकळीत तेलाचा अंश भरून जातो. त्यामुळे केस पोकळ न रहाता भरीव होतात. खोबरेल तेल सात्त्विक असल्यामुळे केसांमध्ये सत्त्व-रज प्रधान शक्तीच्या लहरी प्रवाहित होतात आणि केसांचे, तसेच डोक्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते. खोबरेल तेल किंवा अन्य सात्त्विक सुगंधी तेल लावल्यामुळे ते केसांद्वारे शोषून घेतले जाते आणि डोक्याभोवती पिवळसर रंगाच्या प्रकाशलहरींचे संरक्षककवच निर्माण होते.

३. केसांना असात्त्विक तेल किंवा जेल लावल्यामुळे होणारा परिणाम

हल्ली फॅशन म्हणून केस आकर्षक दिसण्यासाठी केसांना विविध प्रकारचे जेल किंवा विचित्र गंध येणारे विविध प्रकारचे तेल लावले जाते किंवा कृत्रिम रंगाने केस रंगवले जाते. त्यामुळे केसांमध्ये तमप्रधान शक्तीच्या लहरी कार्यान्वित होऊन डोक्याभोवती रज-तम लहरींचे आवरण निर्माण होते. अशा प्रकारे रज-तम प्रधान जेल, तेल किंवा कृत्रिम रंग केसांना लावल्यामुळे डोक्याकडे वातावरणातील त्रासदायक शक्तीच्या लहरी आकृष्ट होऊन डोक्यामध्ये त्रासदायक शक्तीच्या लहरींची स्थाने निर्माण होतात. त्यामुळे डोके जड होणे, डोके बधीर होणे, काहीही न सुचणे आणि डोके दुखणे यांसारखे त्रास व्यक्तीला होतात.

४. काही वेळा केसांना खोबरेल तेल लावल्यानंतर केस कोरडे किंवा काही वेळा पुष्कळ तेलकट होण्यामागील कारण

४ अ. भौतिक कारण : वातावरणातील उष्णतेमुळे केसांना लावलेले तेल हवेत शोषून घेतले जाते आणि केस लवकर कोरडे होतात, तर वातावरणातील दमटपणामुळे केसांभोवती चिकटपणा जाणवतो.

४ आ. आध्यात्मिक कारण : वातावरणातील चांगल्या आणि वाईट या शक्तींमध्ये सूक्ष्मातून युद्ध चालू असतांना या युद्धाचा केंद्रबिंदू व्यक्ती असेल, तर तिच्यावर या सूक्ष्म युद्धाचा परिणाम झालेला आढळतो. वाईट शक्तींनी तेजतत्त्वाच्या स्तरावर ऊर्जा प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्तीच्या केसांना तेल लावलेले असतांनाही कोरडेपणा जाणवतो. वाईट शक्तींनी आपतत्त्वाच्या स्तरावर चिकट काळ्या शक्तीच्या लहरींचे प्रक्षेपण केले, तर केसांचा तेलकटपणा किंवा चिकटपणा अधिक वाढतो.

केसांच्या स्थितीनुसार व्यक्तीवर होणार्‍या सूक्ष्मातील युद्धाचा परिणाम अभ्यासता येतो आणि त्याची तीव्रता लक्षात येते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१८, रात्री १०.२३)


Multi Language |Offline reading | PDF