‘प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी प्रवासाला जाण्यापूर्वी वाहनाच्या संदर्भात पुढील आध्यात्मिक उपाय करा !

सर्वत्रच्या साधकांसाठी महत्त्वाची सूचना

‘अनेक साधक वैयक्तिक कारणांसाठी अथवा विविध सेवांच्या निमित्ताने दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने प्रवास करत असतात. वाहनाला कोणतीही अडचण येऊ नये आणि संपूर्ण प्रवास निर्विघ्नपणे व्हावा, यासाठी वाहन घेऊन बाहेर जाण्यापूर्वी पुढील आध्यात्मिक उपाय करावेत.

१. प्रतिदिन उदबत्तीने वाहनाची शुद्धी करणे

प्रतिदिन वाहनाची स्वच्छता झाल्यावर वाहनासमोर उभे राहून उदबत्ती ओवाळावी किंवा प्रवासाला जाण्यापूर्वी संपूर्ण वाहनाभोवती उदबत्ती ओवाळून त्याची शुद्धी करावी.

चारचाकी वाहनाची स्वच्छता झाल्यावर प्रथम आतून उदबत्ती ओवाळून वाहनाची शुद्धी करावी आणि नंतर वाहनाभोवती उदबत्ती ओवाळून बाहेरून शुद्धी करावी. पेटत्या उदबत्तीने वाहनाची शुद्धी करतांना उदबत्तीची ठिणगी खाली पडू नये, याची विशेष दक्षता घ्यावी.

२. पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी वाहनाची नारळाने दृष्ट काढणे

प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी वाहनाची नारळाने दृष्ट काढावी. वाहनाच्या समोरून ३ वेळा नारळ ओवाळावा. त्यानंतर तो नारळ वाहनासमोर फोडावा. नारळ आडवा फुटायला हवा. जर नारळ उभा फुटला, तर आणखी एका नारळाने दृष्ट काढावी आणि तो वाहनासमोर फोडावा. फोडलेला नारळ पाण्यात विसर्जित करावा.

ज्या आश्रमात अधिक वाहने आहेत, तेथील वाहनांपैकी एक वाहन समोर ठेवावे. त्या वाहनात इतर वाहनांचे क्रमांक असलेली पूर्ण सूची ठेवावी. त्या एकाच वाहनाची वरीलप्रमाणे नारळाने दृष्ट काढावी.

३. मोठ्या किंवा महत्त्वाच्या प्रवासाला जातांना लिंबांनी वाहनाची दृष्ट काढणे

मोठ्या किंवा महत्त्वाच्या प्रवासाला जातांना ५ लिंबे घेऊन वाहनाची दृष्ट काढावी. या ५ लिंबांपैकी ४ लिंबे ‘वाहनाच्या प्रत्येक चाकाखाली एक’, याप्रमाणे ठेवावीत. पाचवे लिंबू वाहनाला ओवाळून ते वाहनासमोर ठेवून हाताने फोडावे. त्यानंतर वाहन पुढे न्यावे आणि प्रवासाला आरंभ करावा. (वाहन पुढे नेल्यावर चाकाखाली ठेवलेली चारही लिंबे फुटतील.) फुटलेली लिंबे पाण्यात विसर्जित करावीत.

४. महत्त्वाच्या कामासाठी चारचाकीने जायचे असेल, तर १ लिंबू समवेत न्यावे. काम पूर्ण झाल्यावर ते लिंबू पाण्यात विसर्जित करावे.

उत्तरदायी साधकांसाठी सूचना

सर्व जिल्हासेवक आणि आश्रमसेवक यांनी ‘जिल्हा, तसेच आश्रम येथील सर्व वाहनांची नियमित शुद्धी होत आहे ना, तसेच पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी त्यांची दृष्ट काढली जात आहे ना ?’, याची वेळोवेळी निश्‍चिती करावी.’ ॐ

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF