फोंडा (गोवा) शहरातील ३ मशिदींतून ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार

नागरिकांना अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना त्रासदायक असणार्‍या गोष्टींवर पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

फोंडा (गोवा)  फोंडा येथील ३ मशिदींमधून नमाजाच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे ध्वनीप्रदूषण होत असून आजूबाजूच्या परिसरात रहाणार्‍या नागरिकांना त्रास होतो, अशी तक्रार नुकतीच येथील स्थानिक रहिवासी श्री. दत्तात्रय कोलवेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.

श्री. कोलवेकर यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, फोंडा शहरात एकूण ३ मशिदी आहेत. या मशिदींतून प्रतिदिन ५ वेळा नमाजाच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून अजान दिली जाते. अतिशय मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावरून दिलेल्या या अजानच्या आवाजाने विशेष करून पहाटे ५ वाजता आजूबाजूच्या परिसरात रहाणार्‍या लोकांच्या झोपेत व्यत्यय येऊन त्यांची झोपमोड होते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी माणसे यांना प्रतिदिन हा त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध  प्रतिदिन अजान ऐकावी लागणे म्हणजे घटनेतील मूलभूत हक्काविरूद्ध आहे. मशिदीतून दिल्या जाणार्‍या अजानमुळे ध्वनीप्रदूषण होत असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या धार्मिक स्थळातून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. फोंडा शहरात नागा मशीद, सफा मशीद आणि जामा मशिद या तीन मशिदी असून या तीनही मशिदींतून दिल्या जाणार्‍या अजानाच्या वेळी ध्वनिप्रदूषणविषयक नियम २००० नुसार आवाजाची योग्य डेसीबल पातळी पाळली जात नाही. नमाजासाठी अजान आवश्यक आहे; परंतु त्यासाठी ध्वनीक्षेपकाची आवश्यकता नाही. शांतताप्रिय नागरिकांना बळजोरीने ही अजान ऐकायला लावणे, हे त्या नागरिकांच्या मूलभूत हक्काविरुद्ध आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनीप्रदूषणाविषयीच्या आदेशाचे पालन करून ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी अजान बंद करावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF