प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांनी गायनसेवा अन् नृत्यसेवा सादर करतांना तेथे उपस्थित असणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती !

११.११.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या भिलई (छत्तीसगढ) येथील अनुक्रमे ५५ टक्के आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. अंजली कानस्कर (वय १९ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) या भगिनींनी कथ्थक, तर रामनाथी आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पूर्णवेळ साधिका कु. प्रतीक्षा आचार्य यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या भगिनी कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी भक्तीगीते गायली. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

नृत्य सादर करतांना कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर

३. साधिका नृत्यसेवा

सादर करत असतांना उपस्थित साधिकांना आलेल्या अनुभूती

३ अ. नृत्यातील ‘देवता वंदना’ प्रकार

३ अ १. ‘कु. शर्वरी गुरुवंदना करत असतांना ‘ती सर्व देवतांना आवाहन करत आहे’, असे मला वाटत होते.’ – सौ. अनुपमा कानस्कर (कु. शर्वरीची आई) आणि कु. अंजली कानस्कर (कु. शर्वरीची बहीण), दुर्ग, छत्तीसगड.

३ अ २. साधिकांनी नृत्यातील ‘वंदना’ हा प्रकार सादर करतांना त्या ठिकाणी ‘त्रिदेव उपस्थित आहेत’, असे जाणवणे : ‘प्रथम कु. शर्वरीने गुरुवंदना, कु. अंजलीने विष्णुवंदना आणि नंतर कु. प्रतीक्षा आचार्य यांनी शिववंदना सादर केली. तेव्हा ‘त्रिदेव त्या स्थळी उपस्थित आहेत’, असे मला वाटले.’ – कु. म्रिणालिनी देवघरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ आ. कथ्थक शुद्ध नृत्य

३ आ १. आमद : ‘अंजलीने सादर केलेला कथ्थक नृत्यातील ‘आमद’ हा नृत्यप्रकार पाहून माझी नृत्य करण्याची इच्छा जागृत झाली.

(आमद (आगमन) : नर्तक किंवा नर्तकी रंगमंचावर येऊन सर्वप्रथम एखाद्या विशिष्ट पारंपरिक बोलांवर तोडा किंवा तुकडा सादर करते. त्याला ‘आमद’ असे म्हणतात.)

३ आ २. तोडे-तुकडे

३ आ २ अ. कु. अंजली अन् कु. शर्वरी ‘तोडे’ हा नृत्यप्रकार करत असतांना गुलाबी रंगाची आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे आणि ‘दोघींसमोर श्रीकृष्ण आहे अन् त्या श्रीकृष्णाला आळवत आहेत’, असे वाटणे : कु. अंजली आणि कु. शर्वरी या ‘तोडे’ हा नृत्यप्रकार करत असतांना त्यातून गुलाबी रंगाची आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवत होते. त्यांच्या पदन्यासामुळे माझ्या मनाला आनंद होत होता. घुंगरांचा नाद ऐकून ‘घुंगरू ते बोल म्हणत आहेत’, असे मला वाटत होेते. मला शांत आणि स्थिर जाणवत होते. मी त्या नृत्यात मग्न झाले होते. ‘दोघींसमोर श्रीकृष्ण आहे आणि त्या श्रीकृष्णाला आळवत आहेत’, असे मला वाटले.’

– कु. म्रिणालिनी देवघरे

३ आ २ आ. ‘कु. शर्वरी अन् कु. अंजली या सहजतेने नृत्य करत आहेत’, असे जाणवणे आणि दोघींच्या तोंडवळ्यावर शरणागत भाव दिसणे : ‘कु. शर्वरी आणि कु. अंजली एकत्रित ‘तोडे-तुकडे’ हे नृत्यप्रकार करत असतांना ‘त्या सहजतेने नृत्य करत आहेत’, असे मला जाणवत होते. एरव्ही सराव करतांना त्यांच्याकडून काही ठिकाणी चुका होत असत किंवा अभ्यासाच्या स्तरावर काही गोष्टी राहून जात असत; पण येथे त्यांचे नृत्य चांगल्या प्रकारे आणि त्रुटींविरहित झाल्याचे लक्षात आले. नृत्यामध्ये बोल संपतांना समेवर आल्यावर हावभाव अपेक्षित असतात. अन्य ठिकाणी नृत्य करतात, तेव्हा समेवर येतांना त्यात अहंकार किंवा एक ताठरपणा जाणवतो; परंतु येथे (आश्रमात) समेवर आल्यावर दोघींच्या तोंडवळ्यावर शरणागत भाव दिसत होता.

(तुकडा : समेपासून समेपर्यंत अशा एका आवर्तनात येणार्‍या बोलसमुहास ‘तुकडा’ किंवा ‘त्रोटकम्’ म्हणतात.

तोडा : तोड्यातील बोल एकापेक्षा अधिक आवर्तनांचे असतात. त्याचे बोल नाजूक असून ते तबल्यावर वाजवले जातात, उदा. तिगदा, दिग, तत् तत् इत्यादी.

सम : तालाच्या पहिल्या मात्रेस ‘सम’ असे म्हणतात.)

३ आ ३. तत्कार

३ आ ३ अ. ‘कु. शर्वरी आणि कु. अंजली यांच्याकडून चारही दिशांना शक्तीरूपी दैवी कण अन् एक विशिष्ट ऊर्जा वातावरणात प्रक्षेपित होत असून त्यांचे शरीर अन् मन हलके होत आहे’, असे जाणवणे : कु. शर्वरी आणि कु. अंजली एकत्रित तत्कार करत असतांना ‘त्यांच्याकडून चारही दिशांना शक्तीरूपी दैवी कण अन् एक विशिष्ट ऊर्जा वातावरणात प्रक्षेपित होत असून त्यांचे शरीर अन् मन हलके होत आहेत’, असे मला जाणवले. एखादे युद्ध संपवून विजय मिळवल्यावर आनंद मिळतो, तसे मला वाटत होते.

(तत्कार : पावलांचे विशिष्ट प्रकारे संचलन करून पायांच्या आघाताद्वारे जे बोल प्रगट केले जातात, त्यांना ‘तत्कार’ असे म्हणतात.)

३ आ ४. कवित्त

३ आ ४ अ. ‘कु. शर्वरी हिच्यात श्रीकृष्णाचे बालरूप सामावले आहे’, असे वाटणे : कु. शर्वरी कवित्त करत असतांना ‘तिच्यात श्रीकृष्णाचे बालरूप सामावले आहे. ती श्रीकृष्णाप्रमाणेच खोड्या काढत आहे’, असे मला वाटत होते. घडा फोडण्याचे भाव करत असतांना ती जणू कृष्णच असल्याचे मला जाणवत होते.

(कवित्त : नृत्याच्या तोड्याच्या वजनात बांधलेल्या काव्यपंक्ती म्हणजे ‘कवित्त’. नृत्यात कवित्तावर भाव दाखवतांना संगीताचा (गायनाचा) वापर न करता ते मुक्तछंदात्मक बोलले जाते आणि त्यावर भावदर्शन केले जाते.)

३ इ. शिवस्तुती

३ इ १. कु. अंजली कानस्कर हिने केलेली शिवस्तुती

३ इ १ अ. ‘शिव तांडव (मारक) रूपात नृत्यातील पदन्यास करत आहे’, असे जाणवणे : कु. अंजली शिवस्तुती करत असतांना ‘शिव तांडव (मारक) रूपात, म्हणजे एका हातात त्रिशूल धरून दुसर्‍या हाताने डमरू वाजवत वेगाने नृत्यातील पदन्यास करत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवत होते.’

– सौ. अनुपमा कानस्कर

३ इ १ आ. शिवाचे मारक तत्त्व जाणवून ‘ऊर्जा बाहेर पडत आहे’, असे दिसणे : ‘कु. अंजली हिने सादर केलेल्या शिवस्तुतीच्या नृत्यातून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले. त्या वेळी मला शिवाचे मारक तत्त्व जाणवून ‘ऊर्जा बाहेर पडत आहे’, असे दिसले.’ – कु. म्रिणालिनी देवघरे

३ इ २. कु. प्रतीक्षा आचार्य यांनी केलेली शिवस्तुती

३ इ २ अ. शिव आणि शक्ती यांचे अस्तित्व वातावरणात अनुभवायला येणे आणि नृत्यातील नवरसांपैकी काही नवरसांची अनुभूती येणे : ‘तिचे नृत्य पहातांना शिव आणि शक्ती यांचे अस्तित्व वातावरणात अनुभवायला येत होते. कु. प्रतीक्षा यांचे हावभावही त्याप्रमाणेच होत असल्याचे जाणवत होते. नृत्यातील नवरसांपैकी मला कधी रौद्र, कधी शृंगार, कधी वीर, तर कधी शांत, या रसांची अनुभूती येत होती.’ – कु. अंजली आणि सौ. अनुपमा कानस्कर

३ इ २ आ. ‘हे नृत्य पहातांना माझी वृत्ती अंतर्मुख होत असल्याचे मला जाणवले. तिच्या नृत्यामुळे माझी भावजागृती होऊन मी शांती अनुभवली.’ – कु. तेजल पात्रीकर

३ ई. भजन

३ ई १. ‘प्रभु श्रीराम तेथे उपस्थित आहे आणि तोच कु. शर्वरीकडून नृत्य करवून घेत आहे’, असे जाणवणे : ‘कु. शर्वरी नृत्य करत असतांना श्रीरामाच्या स्वरूपाची अनुभूती येऊन आम्हाला आनंद होत होता. ‘तिच्या तोंडवळ्याकडे पहातच रहावे. तेथून दृष्टी हलवूच नये’, असे आम्हाला वाटत होते. तिच्या तोंडवळ्यावरील हावभाव नैसर्गिक वाटत होते. हे नृत्य

पहातांना आम्हाला वाटत होते, ‘प्रभु श्रीराम तेथे उपस्थित आहे आणि तोच तिच्याकडून नृत्य करवून घेत आहे. ती श्रीरामाच्या भक्तीत लीन आहे. ती प्रभु श्रीरामासाठीच नृत्य करत आहे.’ तिला आनंदी असल्याचे पाहून आम्हालाही आनंद होत होता.’ – कु. अंजली आणि सौ. अनुपमा कानस्कर अन् कु. तेजल पात्रीकर

(क्रमश: पुढील रविवारी)


Multi Language |Offline reading | PDF