महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांना संगीताच्या माध्यमातून साधना शिकवणार्‍या मंगळूरू येथील प.पू. देवबाबा यांच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

प.पू. देवबाबा यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

प.पू. देवबाबा

प.पू. देवबाबा यांच्याकडे संगीत साधना शिकणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक !

डावीकडून कु. सुप्रिया नवरंगे, सौ. अनघा जोशी, कु. तेजल पात्रीकर, साधकांना शिकवतांना प.पू. देवबाबा, सौ. सावित्री इचलकरंजीकर, आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, श्री. गिरीजय प्रभुदेसाई

२२.१२.२०१८ या दिवशी मंगळूरू येथील संत प.पू. देवबाबा यांचा ७८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे दिली आहे.

१. उडुपी येथील स्वामी विनायकानंदजी महाराज (बैलूर मठ) आणि मंगळूरू येथील प.पू. देवबाबा यांचे रामनाथी आश्रमात आगमन होणे आणि त्यांचे आश्रमातील आगमन हे ‘संगीत अन् नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संकल्पानुसार ईश्‍वरी नियोजनच असणे

कु. तेजल पात्रीकर

‘वर्ष २०१५ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीत आणि नृत्य या कला अवगत असणार्‍या काही साधिकांना त्या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यास सांगितले. त्याप्रमाणे साधकांचा अभ्यास चालू असतांना जानेवारी २०१७ मध्ये मंगळूरू येथील योगी संत प.पू. देवबाबा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घेण्याची इच्छा कर्नाटक येथील सनातनच्या साधकांकडे व्यक्त केली. त्यानुसार ८.२.२०१७ या दिवशी उडुपी येथील स्वामी विनायकानंदजी महाराज (बैलूर मठ) आणि मंगळूरू येथील प.पू. देवबाबा रामनाथी आश्रमात आले. प.पू. देवबाबांची कर्नाटक राज्यातील साधकांशी पूर्वीपासून ओळख असूनही त्यांनी याच कालावधीत रामनाथी येथील आश्रमात येणे, हे जणू ‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संकल्पानुसार ईश्‍वरी नियोजनच होते. त्या वेळी त्यांनी आम्हाला ‘संगीत आणि नृत्य यांतून साधना होण्यासाठी काय करावे ?’, याविषयी संक्षिप्त मार्गदर्शन केले.

२. प.पू. देवबाबांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांना संगीत साधना शिकण्यासाठी त्यांच्या आश्रमात बोलावणे आणि त्यानंतर आतापर्यंत प.पू. देवबाबांनी संगीत साधनेविषयी अविरत मार्गदर्शन करणे

भेटीच्या वेळी प.पू. देवबाबांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करायची ?’, हे शिकण्यासाठी आम्हाला त्यांच्या आश्रमात येण्यास सांगितले होते. त्यानुसार भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने २० ते २२.३.२०१७ या काळात प.पू. देवबाबांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील श्री शक्तीदर्शन योगाश्रम या आश्रमात रहाण्याची अमूल्य संधी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांना मिळाली. तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ दीड-पावणेदोन वर्षांपासून प.पू. देवबाबा आम्हाला संगीत साधनेविषयी अविरत मार्गदर्शन करत आहेत.

३. प.पू. देवबाबांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांकडून करवून घेतलेली संगीत साधना

३ अ. प.पू. देवबाबांनी आरंभीचे साधारण ६ मास आमच्या संगीताविषयीच्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन तात्त्विक मार्गदर्शन केले.

३ आ. ‘कोणत्याही साधनेसाठी तन अन् मन गुरुचरणी अर्पण केल्यावरच गुरूंची कृपा मिळून ज्ञानप्राप्ती होते’, हे सांगून साधकांकडून तशी कृती करवून घेणे आणि परिणामतः साधकांना सनातनचा आश्रम अन् प.पू. देवबाबांचा आश्रम यांत भेद न वाटणे : काही मासांनी प.पू. देवबाबांनी आम्हा साधकांना आश्रमात गेल्यावर केवळ संगीताविषयीच नाही, तर ‘आश्रमसेवा आणि गोसेवा करून तन अन् मन अर्पण करणे’, यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ‘केवळ बुद्धीने संगीत साधना शिकायला नको, तर कोणत्याही साधनेसाठी तन अन् मन गुरुचरणी अर्पण केल्यावरच गुरूंची कृपा मिळून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते’, हे सांगून त्यांनी आमच्याकडून कृती करवून घेतल्या. परिणामतः आम्हाला सनातनचा आश्रम आणि प.पू. देवबाबा यांचा आश्रम यांत आता भेद वाटत नाही. ‘तो आश्रमही आपलाच आहे आणि गुरुतत्त्व एकच असते’, ही शिकवणही त्यांनी आम्हाला दिली.

३ इ. साधकांना गायन, वादन अन् नृत्य सादर करण्यासाठी आश्रमातील व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ‘त्या सेवेतून भगवंताला कसे अनुभवावे ?’, हे शिकवणे : साधारण १ वर्षानंतर आतापर्यंत ‘आमचा आत्मविश्‍वास वाढावा’, यासाठी ते आमच्याकडून संगीताविषयीचा प्रायोगिक भागही करवून घेत आहेत. त्यांनी आम्हाला गायन, वादन आणि नृत्य सादर करण्यासाठी त्यांच्या आश्रमातील व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘या संगीत (नृत्य आणि गायन यांच्या) सेवेतून भगवंताला कसे अनुभवावे ?’, हे त्यांनी आम्हाला शिकवले आणि शिकवत आहेत.

३ ई. आरंभी प.पू. देवबाबा आम्हाला २ मासांनंतर त्यांच्या आश्रमात बोलवायचे. त्यानंतर हळूहळू ते आता आम्हाला प्रत्येक मासालाच शिकण्यासाठी बोलवतात.

(‘प.पू. देवबाबा यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवरूनच ‘संतांनी संगीत शिकवणे’ आणि ‘सामान्य व्यक्तीने संगीत शिकवणे’, यांतील भेद लक्षात येतो.’ – संकलक)

४. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी उपाय सांगणे

प.पू. देवबाबांनी साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास पाहिल्यावर ते न्यून होण्यासाठी काही साधकांसाठी आध्यात्मिक उपाय करण्याची सिद्धता दर्शवली. ते त्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय करत आहेत.

५. प.पू. देवबाबा यांचे द्रष्टेपण !

‘पुढे-पुढे तुमचे (सनातनचे) पुष्कळ साधक या (त्यांच्या) आश्रमात शिकण्यासाठी येतील’, असे प.पू. देवबाबांनी आम्हाला आरंभीच्या काळातच सांगितले होते. त्याप्रमाणे आरंभी आम्ही ४ – ५ साधकच त्यांच्या आश्रमात जात होतो. आता १५ – १६ साधक त्यांच्याकडे जात आहेत. यात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. आज आम्ही त्यांच्या बोलण्याची प्रचीती घेत आहोत.

६. प.पू. देवबाबा यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आणि त्याचे साधक यांविषयी काढलेले गौरवोद्गार

अ. आतापर्यंत माझ्याकडे संगीत शिकण्यासाठी बरेच जण येऊन गेले; परंतु ‘संगीतातून ईश्‍वर हवा’, असे म्हणणारा एकही नव्हता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक हे खर्‍या अर्थाने आंतरिक संगीत शिकण्यास पात्र आहेत.

आ. या साधकांसाठी भगवान श्रीकृष्णाने मला ‘संगीत कसे शिकवावे ?’, हे सांगून ठेवले आहे. त्याप्रमाणे मी माध्यम बनून त्यांना ते शिकवतो. कृष्णच माझ्या माध्यमातून त्यांना ते शिकवतो.

इ. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेले संगीताविषयीच्या संशोधनाचे कार्य आज काळानुसार आवश्यकच आहे. याचा मानवजातीला पुष्कळ लाभ होणार आहे.

ई. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक आता आमचेच (आमच्या आश्रमातील साधकांप्रमाणेच) झाले आहेत.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

आतापर्यंत प.पू. देवबाबांचा आम्हाला लाभलेला सत्संग, त्यांनी केलेले संगीत साधनेतील अमूल्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर केलेले उपाय, यांसाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘यापुढेही त्यांचे आम्हाला असेच अखंड मार्गदर्शन लाभो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना !’

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now