श्रीदत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्रीदत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे !

कु. मधुरा भोसले

१. श्रीदत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे

‘वर्ष २०१९ च्या ‘सनातन पंचाग’ च्या डिसेंबर मासातील पानावर श्रीदत्ताचे नवीन चित्र प्रसिद्ध झाले आहे. या चित्रामध्ये श्रीदत्ताच्या संपूर्ण देहाची कांती आणि श्रीदत्ताच्या तीन मुखांची कांती सोनेरी रंगाची दाखवली आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीदत्ताच्या चित्रात श्रीदत्ताच्या त्रिमुखांची कांती भिन्न रंगाची होती, उदा. ब्रह्मदेवाची सोनेरी, श्रीविष्णूची निळ्या आणि शिवाची राखाडी रंगाची होती. श्रीदत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील आध्यात्मिक कारणे  पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. श्रीदत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे : श्रीदत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न रंगाची दाखवल्यामुळे त्रिदेवांमध्ये द्वैत असल्याचे जाणवते. जेव्हा त्रिमूर्तींचे कार्य श्रीदत्तरूपातही स्वतंत्रपणे चालू असते, म्हणजे त्रिमूर्तींमध्ये द्वैतभाव असतो, तेव्हा त्रिमूर्तींची कांती भिन्न असते.

१ आ. श्रीदत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची एकसारखी असणे : जेव्हा श्रीदत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींचे कार्य श्रीदत्तरूपातही स्वतंत्रपणे चालू न रहाता एकत्रितपणे, म्हणजे अद्वैत भावाच्या स्तरावर चालू असते, तेव्हा श्रीदत्तातील त्रिमूर्तींची कांती एकसारखी असते.

२. श्रीदत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे

श्रीदत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्रीदत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते. पुण्याजवळील ‘नारायणपूर’ येथे श्रीदत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्रीदत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे पुढील प्रमाणे आहेत.

२ अ. श्रीदत्ताची मूर्ती त्रिमुखी असणे : जेव्हा श्रीदत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तिन्ही तत्त्वे सगुण स्तरावर कार्यरत असतात, तेव्हा या तिन्ही रूपांमध्ये द्वैतभाव असतो आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कार्यरत असते. तेव्हा श्रीदत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते.

२ आ. श्रीदत्ताची मूर्ती एकमुखी असणे : जेव्हा दत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तिन्ही तत्त्वे सगुण स्तरावर कार्यरत असतात, तेव्हा या तिन्ही रूपांमध्ये अद्वैतभाव कायम राहून ती एकमेकांशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांची तीन भिन्न मुखे न दाखवता एकच मुख मूर्तीमध्ये दाखवले असते. त्यामुळे ती मूर्ती ‘एकमुखी’ असते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१८, रात्री १२)


Multi Language |Offline reading | PDF