भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कोलकाता येथील दक्षिणाकाली मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते पूजाविधी

कोलकाता येथील दक्षिणाकाली मंदिर

‘कोलकाता येथील कालीघाट या ठिकाणी श्री महाकालीदेवीचे मंदिर आहे. देवी दक्षिण दिशेला तोंड करून उभी असल्याने तिला ‘दक्षिणाकाली’ म्हणतात. ५१ शक्तीपिठांपैकी हे एक पीठ आहे. या ठिकाणी सतीचे उजव्या पायाचे बोट पडल्याचे म्हटले जाते. आदिशक्ती जगदंबेच्या दशमहाविद्यांमध्ये ‘महाकाली’ एक आहे.’

श्री महाकालीदेवीचे केलेले पूजन

‘कोलकाता – हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच संत आणि साधक यांचे रक्षण व्हावे, यांसाठी भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ७.१२.२०१८ या दिवशी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील दक्षिणाकालीच्या मंदिरात जाऊन श्री महाकालीदेवीचे दर्शन घेतले अन् कुंकुमार्चन करत २१ लिंबांची माळ अर्पण केली.

या वेळी मंदिराच्या आत असलेल्या यागशाळेत एक छोटा याग करण्यात आला. त्यानंतर श्री महाकालीदेवीच्या मंदिराच्या पश्‍चिमेला असलेल्या पुष्करिणीच्या ठिकाणी बसून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे महाकालीची पूजा केली. (याच पुष्करिणीतून महाकाली ज्योती रूपात प्रकट झाली होती आणि नंतर तिच्या आज्ञेप्रमाणे तिच्यासाठी मंदिर बांधण्यात आले.)

या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह असलेले साधक श्री. दिवाकर आगावणे, श्री. विनायक शानभाग, श्री. अनिमिष नाफडे, श्री. स्नेहल राऊत, तसेच  कोलकाता येथील साधिका सौ. आनंदिता दासगुप्ता आणि त्यांचा २ वर्षांचा मुलगा चि. आदित्य यांनी या पूजेचा लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. काळा रंग हा तमोगुणी असला, तरीही तो श्री महाकालीदेवीशी संबंधित असल्यामुळे त्याच्यातून चैतन्य प्रक्षेपित होत होते. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले आता साधकांना रंगांच्याही पलीकडे घेऊन चालले आहेत’, असेच सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांना जाणवले.

२. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करताच श्री कालीमातेच्या डोक्यावरील मुकुटातील जास्वंदीच्या फुलांची एक मोठी माळ कौल मिळाल्याप्रमाणे खाली आली.

महर्षींनी सांगितलेला पूजाविधी आणि केलेले संकल्प

‘२७.११.२०१८ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या भृगु जीव नाडीवाचन क्रमांक ५ मध्ये भृगु महर्षींनी सांगितले होते की, ७.१२.२०१८ या अमावास्येच्या दिवशी सकाळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कोलकाता येथील दक्षिणाकालीच्या मंदिरात जावे. तेथे देवीला २१ लिंबांची माळ अर्पण करून कुंकुमार्चन करावे. त्यानंतर मंदिराच्या जवळ असलेल्या पाण्याच्या ठिकाणी (तळे किंवा नदी याठिकाणी) १०८ वेळा ‘ॐ क्रीम् काल्यै नम:’ हा मंत्रजप करत केळफूल, कण्हेरीचे फूल आणि रुईचे फूल एक आड एक अर्पण करावे. त्यानंतर निर्माल्य विसर्जन करावे आणि राहिलेले केळफूल तेथील पुजार्‍यांना देऊन अन्नदानासाठी वापरण्यास सांगावे.

या पूजाविधींच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंत्रजप म्हणतांना ‘सर्व साधकांच्या वतीने श्री महाकालीदेवीच्या चरणी मोह, मद आणि क्रोध यांचा मानसबळी देत आहोत’, असा भाव ठेवावा, तसेच पुढील ३ संकल्प करावेत, असे महर्षींनी सांगितले होते.

१. लोकसंकल्प – हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी संकल्प करणे

२. गुरुसंकल्प – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे.

३. वैयक्तिक संकल्प – संत आणि साधक यांचे रक्षण करणे’

पूजेच्या वेळी श्री कालीमातेच्या चित्राला कापूर आरती दाखवतांना अग्नीच्या ज्वाळेत हंसाचे दर्शन होणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना हंसाविषयी आलेली अनुभूती

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ श्री महाकालीदेवीच्या चित्राला कापूर आरती दाखवतांना ज्वाळेत हंसाचा आकार उमटला. (आकार गोलात दाखवला आहे.)

‘सत्ययुगापूर्वी सर्वांचा फक्त एकच वर्ण होता आणि तो म्हणजे हंस वर्ण. ‘हंस’ या शब्दाचा अर्थ ‘आत्मा’ असाही आहे. त्या काळी सर्व जण आत्मानुभूतीत मग्न असायचे. या वेळी मला लक्षात आले की, ‘हंस’ म्हणजे चिरंतन पवित्रतेकडे वाटचाल होय. जिवाची परमसत्याकडे वाटचाल होते, तेव्हा त्याला ‘हंस’ असे म्हटले जाते. पूजेच्या वेळी श्री महाकालीमातेच्या चित्राला कापूर आरती दाखवतांना महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचा बळी महाकालीच्या चरणी देत आहे आणि साधकांचे स्वभावदोष अन् अहं निर्मूलन होऊन त्यांची आत्मानुभूतीकडे आणि मोक्षाकडे वाटचाल होत आहे’, असा भाव सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ठेवून प्रार्थना केली. आत्मानुभूतीचे प्रतीक म्हणून या वेळी आरतीच्या ज्वाळेत हंसाचा आकार दिसला. ईश्‍वराने कापूर-आरतीच्या ज्वाळेच्या माध्यमातून ‘हंसरूपा’चे दर्शन घडवले.’


Multi Language |Offline reading | PDF