रा.स्व. संघ-भाजपच्या ७ हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ आहे का ?

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचा प्रश्‍न

पत्रकार परिषदेत (डावीकडून) सर्वश्री वरदराजे पिल्ले, गुरुप्रसाद गौडा, ऋषिकेश गुजर

बेळगाव, १७ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दलाचे ‘सेक्युलर’ सरकार हिंदुत्वनिष्ठांविषयी पक्षपतीपणाचे धोरण राबवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पक्षातील ७ हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार मेहेरबान आहे का ? असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे १७ डिसेंबरला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. हिंदु जनजागृती समितीचे बेळगाव जिल्हा समन्वयक श्री. ऋषिकेश गुजर, श्री. संजय तसेच आबिद पाशाच्या आक्रमणात मृत त्यागराज पिल्लई यांचे बंधू वरदराज पिल्लई हे उपस्थित होते. या वेळी आबिद पाशा आणि टोळीच्या सदस्यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचा जामीन रहित करून त्यांना त्वरित अटक करावी, या आक्रमणांतील हिंदुत्वनिष्ठांचे कुटुंबीय, तसेच साक्षीदार यांना त्वरित संरक्षण द्यावे, तसेच शासनाने त्यांना आर्थिक साहाय्य करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

श्री. गुरुप्रसाद गौडा पुढे म्हणाले की,

१. भारतातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी निष्पक्षता दर्शवते; मात्र प्रत्यक्षात कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरचे आघाडी सरकार हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या प्रकरणात दुर्लक्ष करून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपवण्यासाठी कायदा आणि पोलीस यांचा वापर करत आहे.

२. कर्नाटकातील २३ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या प्रकरणांतील सूत्रधार शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. भटकळ येथील भाजपचे आमदार डॉ. चित्तरंजन आणि भाजपचे स्थानिक नेता तिमप्पा नाईक यांची हत्या करणार्‍यांना आजही १४ वर्षांनंतर कर्नाटक पोलिसांना शोधून काढता आलेले नाही; मात्र वामपंथी पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी त्वरित ‘एस्आयटी’ स्थापन करून १६ हिंदु कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली.

३. तसेच या हिंदु आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसतांनाही त्यांच्यावर कठोर ‘कोक्का’ कलम लावण्यात आले; मात्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या मैसूरू येथील ‘आबिद पाशा आणि टोळी’ने रा.स्व.संघ, बजरंग दल, भाजप आदी हिंदु संघटना आणि पक्ष यांच्या ७ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या क्रूर हत्या केल्याचे अन्वेषणात उघड झाले असतांनाही त्यांच्यावर अद्यापपर्यंत ‘कोक्का’ का लावण्यात आला नाही ?

४. त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अन्वेषणात त्रुटी ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही.

५. कर्नाटक सरकारच्या या पक्षपातीपणामुळे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे धर्मांध गुन्हेगार आज मैसूरू शहरात उघडपणे फिरत असून या प्रकरणातील कुटुंबीय आणि साक्षीदार यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या आक्रमणांतील निर्दोष हिंदुत्वनिष्ठांचे परिवार जीव मुठीत धरून दहशतीखाली जगत आहेत. या हिंदु परिवारांना कर्नाटक सरकारकडून न्याय मिळेल का ?

६. आबिद पाशा आणि टोळी यांनी सर्व हत्या थंड डोक्याने करत असतांना मैसूर पोलिसांनी, तसेच कर्नाटक सरकारने मात्र अन्वेषणात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून त्यांना साहाय्य केले. त्यामुळे आबिद पाशा आणि त्याच्या टोळीतील आरोपींची एकतर मुक्तता झाली अथवा त्यांना त्वरित जामीन मिळाला आहे.

७. काही प्रकरणांत या आरोपींवर पोलिसांनी ‘युएपीए’सारखा कठोर कायदा लावला होता. असे असूनही पोलिसांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही आणि आश्‍चर्यकारकरीत्या आरोपपत्र प्रविष्ट करतांना ‘युएपीए’ कायद्याचे कलम वगळण्यात आले. ‘युएपीए’ कायद्यानुसार ३० दिवसांची पोलीस कोठडी मिळू शकत असतांनाही मुजम्मिल या आरोपीला केवळ ७ दिवसांची पोलीस कोठडी मागून सोडण्यात आले.

८. न्यायालयाने पोलिसांवर कठोर ताशेरे मारत या टोळीतील आरोपींना जामीन समंत केला. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात म्हणजे वर्ष २०१६ मध्येच आबिद पाशाने २५ जणांच्या साहाय्याने ७ हिंदूंच्या हत्या केल्याचे मान्य केले होते; मात्र मुसलमानांच्या मतपेटीसाठी काँग्रेसी शासन निष्क्रीय राहिले आणि पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेल्या कुचकामी अन्वेषणामुळे आरोपींना लाभ मिळत गेला. यातून कर्नाटकातील निधर्मी सरकार आणि पोलीस आबिद पाशा टोळीवर ‘मेहेरबान’ असल्याचे दिसते.

९. एवढ्या हत्या करूनही आबिद पाशासह त्याच्या टोळीतील सर्व गुन्हेगार आज मैसुरू शहरात उघडपणे फिरत आहेत. जामिनाच्या अटींचे उल्लंघन करत आहेत. त्यांनी विघ्नेश आणि सुधींद्र या विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणातील के. राजू या साक्षीदाराची हत्या केल्याचे उदाहरण असतांनाही कोणत्याही साक्षीदाराला सुरक्षा देण्यात आलेली नाही. यामुळे हिंदुत्वनिष्ठांचे कुटुंबीय दहशतीखाली जगत आहेत.

१०. या प्रकरणांचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सी.बी.आय.) अथवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एन्.आय.ए.) देऊन सखोल अन्वेषण करावे. यात मैसूर येथील हत्यांच्या प्रकरणाचा पसार सूत्रधार ‘टिंबर आतिक’चा शोध घ्यावा, तसेच कर्नाटकातील अन्य ठिकाणच्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमध्येही या आरोपींचा संबंध आहे का, याचे अन्वेषण करावे.

११. अन्वेषणात, तसेच न्यायालयीन कामकाजात त्रुटी ठेवणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी.१२. ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ या बंदी घातलेल्या सीमीशी संलग्न संघटनेचे आबिद पाशा आणि गँगचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संस्थेशी असलेले संबंध लक्षात घेता तिच्यावर बंदी घालावी.


Multi Language |Offline reading | PDF