उपेक्षित भारतीय खेळाडू !

उत्तरप्रदेश येथील स्पर्धा संपल्यानंतर महाराष्ट्राच्या कुस्तीपथकातील पदकविजेत्या कुस्तीवीरांसह अन्य खेळाडूंना तिकीट निश्‍चिती न झाल्याने रेल्वेतील शौचालयाजवळ बसून प्रवास करावा लागला. यामध्ये महिला खेळाडूही होत्या, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंसमवेत गेलेला अधिकारीवर्ग विमानाने माघारी परतला. तिकीट निश्‍चिती न झाल्याने खेळाडूंना केवळ ४०० ते ५०० रुपयांची भरपाई देण्यात आली. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळणे होते. हेच जर क्रिकेटपटूंच्या संदर्भात घडले असते, तर माध्यमांनी त्याची नोंद घेवून आकांडतांडव केले असते; परंतु आपल्याकडे क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांना वलय नसल्याने खेळाडूंच्या सोयी सुविधेविषयी प्रचंड अनास्था आहे. या स्पर्धा अगोदर ठरलेल्या असतात. खेळाडूंच्या प्रवाशाचे नियोजन प्रशासनाला करता येत नाही का ? तसेच या प्रसंगानंतर धडा घेवून सरकारने खेळाडूंसाठी विशेष आरक्षणाचा कोटा रेल्वेत ठेवावा किंवा तात्काळ कोट्यातून त्यांची तिकिटाची निश्‍चिती करणे अपेक्षित आहे. आपल्याकडे कलावंत आणि लेखक यांना पुष्कळ प्रसिद्धी अन् पैसा मिळतो; परंतु क्रिकेटचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंच्या वाट्याला हे भाग्य येत नाही. कोणत्याही कर्मचारी अथवा कलाकाराची कारकीर्द मोठी असते; परंतु खेळाडूंची काही वर्षांची असते. त्यामुळे पुढील जीवनाचा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा रहात असतो. केंद्रीय क्रीडामंत्रालयाने सर्व राज्यांच्या सहकार्याने टी.ओ.पी (टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम) योजना चालू केली आहे. ऑलिम्पिक पदक जे खेळाडू जिंकून देवू शकतात, अशा खेळाडूंना या योजनेत सामील करून घेण्यात आले आहे; परंतु या योजनेची प्रत्यक्ष कार्यवाही अतिशय  सावकाश चालू आहे. तसाच प्रकार ‘खेलो इंडिया’ या मोहिमेविषयी आहे. सरकारने पायाभूत सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून द्यायला हव्यात. एरव्ही स्वत:चे वेतन आणि भत्ते अन् अन्य सुविधा वाढवून घेणार्‍या सरकारला खेळाविषयी काहीही आस्था नाही. सरकारी पातळीवर निर्णय पुष्कळ संथ गतीने होत असल्याने त्याचा फटका खेळाडूंना बसतो. खेळाडू म्हणून प्रतिस्पर्धी खेळाडूसमोर युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे लढायचे असते; मात्र येथील व्यवस्थेशी या खेळाडूला पहिल्यांदा लढावे लागते. क्रीडाधोरणाच्या मसुद्याला वर्ष १९७१ पासून अद्याप संमती मिळालेली नाही. ही आपल्याकडे खेदाची गोष्ट आहे. पावसाळा आला की, गळणारे घर दुरुस्त करायला जातो. तसे ऑलिम्पिक स्पर्धा जवळ आल्या की, लगीनघाई चालू होते. बॅडमिंटन खेळाडू पुलेला गोपीचंद यांनी या खेळासाठी स्वत:ची संपत्ती, तन, मन सर्व अर्पण करून अकादमी स्थापन केली. आज सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्या रूपाने त्यांच्या श्रमाचे चीज झाले आहे. त्यांच्यासारखी खेळाविषयीची तळमळ राज्यकर्ते आणि सरकारी अधिकारी दाखवतील का ?

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now