परात्पर गुरुदेवांप्रती सतत दास्यभावात असलेले प.पू. दास महाराज !

प.पू. दास महाराज

१. प.पू. दास महाराज यांचा दास्यभाव

‘प.पू. दास महाराज यांना शारीरिक त्रासांमुळे अधिक वेळ बसता येत नाही; मात्र साधकांसाठी नामजप करण्यासाठी रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी वास्तव्याला असलेल्या खोलीत ते सलग १ घंटा बसतात. मी त्यांना विचारले, ‘‘बाबा, तुम्हाला सलग १ घंटा बसणे शक्य होईल का ? नामजप करण्याचा कालावधी थोडा अल्प करायचा का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नको. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी सांगितल्यामुळे मी नामजप करण्यासाठी बसू शकतो. मी नामजप करतांना माझे पूर्ण १ घंटा ध्यान लागते. ‘मी बसलो आहे’, असे वाटतच नाही. मला शारीरिक त्रासही जाणवत नाही.’’

कु. माधुरी दुसे

२. साधिकेने दैनिक सनातन प्रभातमध्ये लिहिलेल्या लेखासाठी तिचे कौतुक करणे

काही दिवसांपूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त साधकांनी करायचे भावाचे प्रयत्न, याविषयी माझा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर मला प.पू. बाबांनी बोलावले. तेव्हा आमच्यात पुढील संभाषण झाले.

प.पू. दास महाराज : लेख छान लिहिला आहेस.

मी : परात्पर गुरुदेवांनीच लिहून घेतला.

प.पू. दास महाराज : विषय फारच छान मांडला आहेस.

मी : परात्पर गुरुदेवांनीच सुचवले.

प.पू. दास महाराज : पण तुम्ही सोप्या शब्दांत लिहिला ना ! छान आहे. असे लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून यायला हवेत.

तेव्हा मला वाटले, ‘प.पू. दास महाराज स्वतः सोप्या शब्दांत लेख लिहितात, तरी ते साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात.’

३. साधिकेकडून चूक झाल्यावर तिला परात्पर गुरुदेवांची क्षमा मागायला सांगणे आणि स्वतःही क्षमायाचना करणे

प.पू. दास महाराज यांच्या समवेत सेवा करतांना माझ्याकडून एक गंभीर चूक झाली. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी मला त्याची जाणीव करून दिली. त्यासाठी मी प्रायश्‍चित्तही घेतले. मी प.पू. दास महाराज यांची क्षमा मागायला गेले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझी क्षमा मागू नको. परात्पर गुरुदेवांची क्षमा माग.’’ त्यांनी आसंदी मागे घेऊन मला परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले. माझ्याकडून झालेल्या चुकीसाठी त्यांनीही क्षमायाचना केली. त्यांनी मला प्रसाद देऊन ‘आता प्रयत्न कर’, असे सांगितले.

४. भगवंताची कृपा आणि प्रीती अनुभवता येणे

यातून लक्षात आले, ‘साधकांकडून गंभीर चुका होऊनही भगवंत त्यांच्यावर किती प्रेम करतो ! तसेच साधकांच्या साधनेची हानी व्हायला नको, यासाठी तत्त्वनिष्ठतेने चुकाही दाखवतो.’ या प्रसंगात भगवंतरूपी या संतद्वयीच्या रूपातून त्यांची प्रीती अनुभवायला आली. यासाठी मी दोघांच्या चरणी कृतज्ञ आहे.

‘हे ईश्‍वरा, चुकांमधून शिकून तुला अपेक्षित अशी आमची साधना होऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.’

– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF