भारतीय सुरक्षायंत्रणेला सतर्कतेचा आदेश
नवी देहली – पाकिस्तानच्या दुतावासातून २३ भारतीय शीख भाविकांचे ‘पासपोर्ट’ (पारपत्र) गायब झाल्याची घटना घडली. (हे आहेत सतत भारताच्या कुरापती काढणार्या पाकला भाजप सरकारने कधीही धडा न शिकवल्याचे दुष्परिणाम ! पाकला धडा न शिकवल्याने भाजप सरकार स्वतःची डोकेदुखी स्वतःच वाढवून घेत आहे, हेच खरे ! – संपादक) या पार्श्वभूमीवर भारतातील सुरक्षायंत्रणांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. हे शीख भाविक गेल्या मासात यात्रेनिमित्त पाकमध्ये गेले होते.
‘पासपोर्ट’ हरवलेल्या शीख भाविकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आता ते ‘पासपोर्ट’ रहित करण्याची प्रकिया चालू केली आहे. मंत्रालयाकडून हे प्रकरण पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसमोरही मांडले जाणार आहे. या ‘पासपोर्ट’चा वापर करून पाकपुरस्कृत आतंकवादी भारतात घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुरुनानक यांच्या ५४९ व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानकडून २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ३ सहस्र ८०० शीख भाविकांना ‘व्हिसा’ संमत करण्यात आला होता. यांपैकी २३ जणांनी पोलिसांकडे ‘पासपोर्ट’ हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. ‘या घटनेमागे आमच्या देशातील अधिकार्यांचा हात नाही’, असे पाकने स्पष्ट केले आहे.
शीख भाविकांकडून देहलीस्थित एका दलालाने त्यांचे ‘पासपोर्ट’ घेतले होते. ‘पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे कागदपत्र सादर करण्यासाठी ते हवे आहेत’, असे सांगत त्याने ते ‘पासपोर्ट’ घेतले होते. या दलालाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने ‘पासपोर्ट’ आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानच्या दुतावासात जमा केली होती. तो ‘पासपोर्ट’ घेण्यासाठी तेथे गेला असता दुतावासातील कर्मचार्यांनी कागदपत्रेच मिळाली नसल्याचे सांगितल्याचे त्याने सांगितले.