प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त गायनसेवा आणि नृत्यसेवा सादर करणार्‍या अन् तेथे उपस्थित असणार्‍या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांना आलेल्या अनुभूती !

११.११.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या भिलई (छत्तीसगड) येथील अनुक्रमे ५५ टक्के आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. अंजली कानस्कर (वय १९ वर्षे) आणि कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) या भगिनींनी कथ्थक, तर रामनाथी आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पूर्णवेळ साधिका कु. प्रतीक्षा आचार्य यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या भगिनी कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी भक्तीगीते गायली. या कार्यक्रमाच्या वेळी नृत्य आणि गायन करणार्‍या साधिका, तसेच उपस्थित साधक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(पूर्वार्ध)

१. प.पू. देवबाबांच्या आश्रमात नृत्यसेवा सादर करणार्‍या साधिकांना आलेल्या अनुभूती

नृत्य सादर करतांना कु. अंजली कानस्कर

१ अ. कु. अंजली कानस्कर, दुर्ग, छत्तीसगड.

१ अ १. शिवस्तुतीवर आधारित नृत्य करतांना भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागणे आणि ‘तू भगवान शिवाच्या अनुसंधानात असल्याने तुझ्यात निर्माण झालेले तेजतत्त्व बाष्प बनून अश्रूंच्या माध्यमातून बाहेर पडले’, असे प.पू. देवबाबांनी सांगणे : ‘मी शिवस्तुतीवर आधारित नृत्य करत असतांना मला तेजतत्त्वाची आणि भगवान शिवाचे रौद्र रूप यांची अनुभूती येत होती. नृत्याच्या अंतिम सत्रात माझी अकस्मात भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. त्या वेळी ‘मला असे का होत आहे ?’, हे समजत नव्हते. या संदर्भात प.पू. देवबाबांना विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तू भगवान शिवाच्या अनुसंधानात असल्याने तुझ्यात निर्माण झालेले तेजतत्त्व बाष्प बनून अश्रूंच्या माध्यमातून बाहेर पडले. तू शरणागत भावाच्या स्थितीत असल्याने ते अश्रूरूपात वाहू लागले.’’ मला भावजागृतीची ही स्थिती ५ ते ७ मिनिटे अनुभवता आली.

१ अ २. ‘तराना’ या नृत्यप्रकारातील साधिकेच्या पदन्यासांतून विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्याने प.पू. देवबाबांची दोन कुंडलिनीचक्रे जागृत होणे, साधिकेच्या मनात नकारात्मक विचार निर्माण झाल्याने तिचे अनुसंधान तुटणे आणि त्यामुळे प.पू. देवबाबांच्या कुंडलिनीचक्रांची जागृती थांबणे : प.पू. देवबाबा मला म्हणाले, ‘‘तराना’ या नृत्यप्रकारातील तुझे पदन्यास अनुभवतांना त्यांतून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होत होती. त्यामुळे माझ्या कुंडलिनीचक्रांपैकी दोन चक्रे जागृत झाली होती; परंतु नंतर तुझ्या मनात ‘मी करते, ते योग्य आहे कि नाही ?’, अशी शंका निर्माण झाल्यामुळे तुझे ईश्‍वराशी असलेले अनुसंधान तुटले आणि त्यामुळे माझ्याही अन्य चक्रांची जागृती थांबली.’’

नृत्य सादर करतांना कु. प्रतीक्षा आचार्य

१ आ. कु. प्रतीक्षा आचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ आ १. शिवाचा नामजप आतून चालू होणे आणि आरंभी शिव अन् नंतर देवी यांचे अस्तित्व जाणवणे : ‘सकाळपासून मला शिवाचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवत होते आणि पूर्ण सिद्धता होईपर्यंत माझा आतून शिवाचा नामजप चालू होता. माझे मन शांत होते. मी नृत्य करण्याची सिद्धता करत असतांना मला प्रथम शिवाचे अस्तित्व अधिक जाणवत होते. नंतर मी अलंकार घालायला आरंभ केल्यावर मला देवीचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवू लागले.

१ आ २. शिव-पार्वतीवर स्तुतीपर नृत्य करतांना देहभान विसरणे आणि ‘शिव-शक्ती नृत्य करत आहेत’, असे जाणवणे : या वेळी भगवंताने मला ‘अर्धनारीनटेश्‍वर’ हे शिव-पार्वतीवर स्तुतीपर नृत्य सादर करण्याची संधी दिली. हे नृत्य चालू असतांनाच वीजपुरवठा खंडित झाला. त्या वेळी नृत्य करतांना मी देहभान विसरले. ‘मी नृत्य करत नसून माझ्या ठिकाणी भगवान शिव नृत्य करत आहे. शिवाची शक्ती जणू नृत्य करत आहे’, असे मला जाणवले.

१ आ ३. नृत्य झाल्यानंतर रात्री मला वातावरणात भगवान शिवाचे अस्तित्व जाणवत होते.’

२. गायनसेवा सादर करणार्‍या साधिकांना आलेल्या अनुभूती

२ अ. सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल 

२ अ १. ‘रामा रघुनंदना…’ हे भक्तीगीत म्हणतांना ध्यानावस्था अनुभवणे : ‘प.पू. देवबाबांनी नृत्याचा कार्यक्रम झाल्यावर मला भक्तीगीत म्हणायला सांगितले. मी ‘रामा रघुनंदना…’ हे भक्तीगीत स्थुलातून म्हणत होते; पण ‘आतून ध्यानावस्था अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते.

२ अ २. खोलीत भक्तीगीते म्हणतांना देवाला प्रार्थना होऊन डोळ्यांतून भावाश्रू येणे : कार्यक्रमाच्या दुुसर्‍या दिवशी प.पू. देवबाबांच्या आश्रमात आम्ही रहात असलेल्या खोलीत मी एकटीच होते. तेव्हा मी ‘गगन सदन तेजोमय…’ आणि ‘ॐ नमः शिवाय…’ ही भक्तीगीते म्हटली. ही भक्तीगीते म्हणत असतांना देवाला ‘आता मला तुझ्याजवळ घे’, अशी आर्ततेने प्रार्थना होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’

२ आ. कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

२ आ १. गुरूंवरील ‘गुरु चरणन सो लागे, लगन मोहे..’, ही बंदीश म्हणतांना सर्व विसरून गायनात तल्लीन होणे : ‘सौ. अनघा जोशी यांचे भजन म्हणून झाल्यावर प.पू. देवबाबांनी मलाही गायन करण्यास सांगितले. त्या वेळी मला ‘मोगरा फुलला…’ हेच गीत म्हणावे’, असे वाटले. हे गीत ‘गोरखकल्याण’ रागातील असून त्या गीताला जोडूनच त्या रागाची गुरूंवरील ‘गुरु चरणन सो लागे, लगन मोहे..’, ही बंदीश म्हणावी’, असे मला वाटले. गीत म्हणण्यास आरंभ केल्यावर मी सर्व विसरून गायनात तल्लीन झाले.

२ आ २. ‘कोणते गीत म्हणायचे ?’, हे देवच सुचवतो’, याची अनुभूती येणे : माझे गायन झाल्यानंतर प.पू. देवबाबांच्या पत्नी सौ. ज्योतीअम्मा राव आणि अन्य २ – ३ साधक यांच्याही मनात ‘मी हेच गीत म्हणावे’, असे आल्याचे त्यांनी सांगितले. यातून ‘आम्ही कोणते गीत म्हणावे ?’, हे आमच्या हातात नसून देवच सुचवतो’, हे देवाने मला अनुभवायला दिले.

‘हे गुरुदेवा, मनात कर्तेपणाची जाणीव न रहाता ही सर्व सेवारूपी पुष्पे तुझ्या चरणी अर्पण होऊ देत’, हीच शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०१८)

(उत्तरार्ध वाचा पुढील रविवारी)


Multi Language |Offline reading | PDF