आधुनिक चिकित्सा पद्धतीपेक्षा भारतीय चिकित्सा पद्धतीच श्रेष्ठ !

दैनिक सनातन प्रभात मधील दोन वृत्तांवर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले भाष्य !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. ‘भारतीय वैज्ञानिक निर्मित आणि जगात प्रथमच बनवण्यात आलेले डेंग्यूवरील औषध पुढच्या वर्षी बाजारात येणार !’ या वृत्तावर केलेले भाष्य

‘१७.४.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातच्या पृष्ठ क्र. ३ वर ‘भारतीय वैज्ञानिक निर्मित आणि जगात प्रथमच बनवण्यात आलेले डेंग्यूवरील औषध पुढच्या वर्षी बाजारात येणार !’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘जागतिक स्तरावर प्रथमच डेंग्यू या व्याधीवर औषध बनवण्यात आले असून हे औषध भारतीय वैज्ञानिकांनी बनवले आहे. डेंग्यूवर अद्याप एकही औषध नव्हते. आयुष मंत्रालयाच्या ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद’च्या (सीसीआर्इएस्च्या) वैज्ञानिकांनी ७ प्रकारच्या औषधी रोपट्यांपासून हे औषध बनवले आहे’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

१ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले भाष्य

१ अ १. ‘भारतीय संशोधक परदेशात जाऊन संशोधन करतात; परंतु संशोधक म्हणून स्वतःच्या देशाऐवजी विदेशाचे नाव देतात.

१ अ २. भारतीय संस्कृती सक्षम असल्याने भारतीय संशोधकांची बौद्धिक क्षमता चांगली आहे. आपले वेद आणि शास्त्रे ही शाश्‍वत आहेत. त्यांतील ज्ञान आजच्या काळातही उपयुक्त आहे.’

२. ‘आधुनिक चिकित्सेतील उपकरणांमुळे उपचार महागले !’ – पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

१७.४.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातच्या पृष्ठ क्र. ३ वर ‘आधुनिक चिकित्सेतील उपकरणांमुळे उपचार महागले ! – पुरी पिठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती’ या मथळ्याखाली पुढील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘आधुनिक चिकित्सा पद्धतीत मोठी त्रुटी आहे. या पद्धतीत ‘रुग्णाच्या शरिरापुढे काहीही नाही’, असेच मानले जाते. आधुनिक उपचार पद्धतीत प्रतिदिन येणार्‍या नवीन उपकरणांमुळे ही उपचारपद्धत अत्यंत महाग ठरत आहे. विज्ञानाने कथित प्रगती केली आहे. हे विज्ञान स्वतःच्या सिद्धांतावर कधीच कायम रहात नाही. त्यांची (अ‍ॅलोपॅथीची) औषधे एका कालमर्यादेनंतर वापरण्यायोग्य रहात नाहीत. भारत देशातील चरकसंहिता सांगते, ‘आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि त्याच्यावर या पंचमहाभूतांचा परिणाम होऊन आजार होतात.’ ‘आजारी व्यक्तीवर केवळ औषधेच नाहीत, तर मंत्रांचे उपचारही आवश्यक असतात’, असे प्रतिपादन पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु निश्‍चलानंद सरस्वती यांनी केल्याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

२ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेली आधुनिक उपचार पद्धतीची मर्यादा आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीची श्रेष्ठता !

२ अ १. ‘अ‍ॅलोपॅथी’ उपचारपद्धतीत केवळ स्थूल देहालाच प्राधान्य दिले जाऊन सूक्ष्म ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म कर्मेंद्रिये यांचा विचार केला जात नसणे : या संदर्भात परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पुढीलप्रमाणे भाष्य केले.

‘आधुनिक चिकित्सा पद्धतीत, म्हणजे ‘अ‍ॅलोपॅथी’मध्ये मोठी त्रुटी आहे. यात रुग्णाच्या केवळ स्थूल देहालाच प्राधान्य देतात. (त्याचाच विचार केला जातो.) यात रुग्णाची सूक्ष्म ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म कर्मेंद्रिये यांना महत्त्व दिले जात नाही किंवा ‘आधुनिक चिकित्सा पद्धती त्यांना हे मानतच नाही’, असे म्हणावे लागेल.

२ अ २. ‘आयुर्वेद’ उपचारपद्धतीत सांगितलेले व्याधींचे प्रकार आणि त्यानुसार उपचारपद्धती

‘सुश्रुताचार्यांनी व्याधींचे ७ प्रकार सांगितले आहेत आणि त्यानुसार आयुर्वेदात उपचारपद्धतही सांगितली आहे.

१. आदिबलप्रवृत्त : पित्याच्या वीर्याच्या दोषाने किंवा आईच्या रजाच्या दोषाने होणार्‍या कुष्ट, अर्श इत्यादी व्याधी

२. जन्मबलप्रवृत्त : गरोदरपणी मातेच्या हातून झालेल्या अपचाराच्या परिणामस्वरूप मुलांना काही व्याधी होतात, उदा. लंगडेपणा, जन्मांधपणा इत्यादी

३. दोषबलप्रवृत्त : प्रथम एखादा रोग (व्याधी) होऊन त्या मूळ रोगातील दोषापासून काही व्याधी निर्माण होतात.

४. संघातबलप्रवृत्त : बाहेरून आघात झाल्याने होणार्‍या व्याधी, उदा. शरिरावर आघात होणे, हाड मोडणे किंवा दुखावणे, आपटणे, शस्त्राघात किंवा सर्पादी विषयुक्त प्राण्यांचा दंश होणे इत्यादी

५. कालबलप्रवृत्त : थंडी, वारा, पाऊस आणि उन्हाळा यांपासून होणारे विकार

६. देवबलप्रवृत्त : देवाचा कोप झाला असता, तसेच शत्रूने जारण-मारणादी मंत्रप्रयोग केल्यामुळे होणारे रोग, वीज पडून किंवा घर, डोंगराचा कडा कोसळून झालेल्या व्याधी किंवा पिशाचाची पीडा बाधल्याने होणार्‍या व्याधी

७. स्वभावबलप्रवृत्त : भूक, तहान, जरा, मृत्यू, निद्रा इत्यादी विकृत व्याधी

स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे शरिराचे ३ भाग आहेत. आयुर्वेदात त्यांचा अभ्यास केला आहे. ‘अ‍ॅलोपॅथी’ उपचारपद्धतीत यांचा विचार न केल्यामुळे उपचारांचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) भोगावे लागतात.’

(संदर्भ : चिकित्साप्रभाकर, देशकाल लक्षण, रोग किंवा व्याधीचे प्रकार)

२ अ ३. अ‍ॅलोपॅथी’ उपचार पद्धतीत रुग्णावर तात्काळ परिणाम होण्यासाठी औषधाची मात्रा वाढवावी लागत असल्याने परिणामस्वरूप रुग्णाच्या शरिराची नैसर्गिक शक्ती व्यय होणे : लोकांना औषधांचा तात्काळ परिणाम हवा असतो. यासाठी ‘अ‍ॅलोपॅथी’उपचारपद्धतीत औषधाची मात्रा आणि शक्ती वाढवावी लागते. त्याचा परिणाम रुग्णाच्या शरिरावर होतो. त्याच्या शरिराची नैसर्गिक शक्ती उपयोगात आणली जात नाही. इथे औषधातील रसायन कार्य करू लागते. रुग्णाला या उपायांविना दुसरा पर्याय रहात नाही. त्या वेळी औषधाची मात्रा वाढवावी लागते आणि त्याची मर्यादा संपली की, रुग्णाच्या शरिरावर त्याचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) दिसू लागतात. प्रत्यक्षात औषधाचे कार्य ‘नैसर्गिक शक्तीला प्रज्वलित करणे, म्हणजे कार्यान्वित करणे’, हे असले पाहिजे; परंतु या आधुनिक उपचार पद्धतीत औषधाचे दुष्परिणाम शरिरावर होतांना दिसतात.

२ अ ४. ‘अ‍ॅलोपॅथी’ उपचारपद्धतीत केवळ लक्षणांवर औषध दिले जाणे : खोकला झाल्यावर श्‍वसनमार्गात जंतूसंसर्ग झाला असल्याने ‘अ‍ॅलोपॅथी’ या उपचारपद्धतीत केवळ जंतूनाशाचे औषध दिले जाते; परंतु मूळ रोगावर म्हणजे खोकल्यावर औषधोपचार न झाल्याने खोकला मात्र नंतर काही दिवस असतो.

२ आ. भारतात ऋषि-मुनींनी संशोधन केलेल्या आणि पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाचा उपयोग न करता आधुनिक उपचार पद्धतीचा उपयोग केला जात असणे : भारतात ऋषिमुनींनी संशोधन केलेले (उपचारपद्धतीचे) ज्ञान पूर्वापार चालत आले आहे. मागील काही दशकांपासून त्या ज्ञानाचा उपयोग न करता केवळ आधुनिक उपचार पद्धतीचा (या उपचार पद्धतीने सिद्ध केलेल्या औषधांचा) उपयोग केला जात आहे.

२ इ. परकियांच्या औषधांना प्राधान्य देणे : भारतात चांगल्या वनौैषधी उपलब्ध असतांना त्यांचा उपयोग न करता परकीय औषधांचा रुग्णांसाठी वापर केला जातो. इथे परकियांच्या औषधांना प्राधान्य दिले जात आहे. (खरेतर हे एक राजकीय षड्यंत्र आहे. हे येथील राज्यकर्त्यांनी सामान्य जनतेला कधी कळूच दिलेले नाही.)

२ ई. भारतीय अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत शाश्‍वत असून भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट शाश्‍वताशी जोडलेली असणे, तर आधुनिक विज्ञानाचे सिद्धांत कायमस्वरूपी नसून मायेशी जोडलेले असल्याने विकार उद्भवत असणे : विज्ञानाने जरी भौतिक प्रगती केली असली, तरी त्याचे सिद्धांत शाश्‍वत आणि चिरकाल टिकणारे (कायमस्वरूपी) नसतात; परंतु अध्यात्मशास्त्र शाश्‍वत आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट शाश्‍वताशी जोडली आहे, मायेशी नाही. आधुनिक विज्ञानाचे कार्य मायेशी जोडलेले आहे. त्यामुळे विकार उद्भवतांना दिसत आहेत; म्हणूनच सर्वच प्रकारच्या प्रदूषणांनी युक्त अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

२ उ. पंचमहाभूतांपासून बनलेल्या मानवी शरिरावर वातावरणाचा परिणाम होत असल्याने रुग्णांना केवळ औषधे न देता त्यांच्यावर मंत्र, देवतांचे जप, भजन, कीर्तन या माध्यमांतून उपचार करणे आवश्यक असणे : आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनले आहे. त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होऊन व्याधी होतात. रुग्णांना केवळ औषध न देता त्यांच्यावर मंत्र, देवतांचे जप, भजन, कीर्तन या माध्यमांतून उपचार करणे आवश्यक असते. मंत्रांची स्पंदने (‘व्हायब्रेशन्स’) उपचाराचे कार्य करतात. जपातील वाणीचा उच्चारही कार्य करतो. इतकेच नव्हे, तर गायीच्या सान्निध्यात रहाणे, तिची विविध उत्सर्जक द्रव्ये, यांमुळेही रुग्णावर चांगला परिणाम होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

२ ऊ. ‘ॐ’ कार जिवाला भगवंताशी जोडणारे साधन असल्याने रुग्णाला बरे करण्यासाठी मंत्रोपायांना महत्त्व देण्याची आवश्यकता असणे : मूळ परमात्मा हा अनामिक असून शब्दातीत आहे. ‘ॐ’कार हे सगुण आणि निर्गुण परब्रह्माचे मूळ आहे. ‘ॐ’कार हे जिवाला भगवंताशी जोडणारे साधन आहे. तो सगुण-निर्गुणाला जोडतो. ‘ॐ’कार हा अनाहत नाद असून तो हृदयात सदैव चालू असतो. हृदयातील आत्मचैतन्य शक्तीद्वारे ‘ॐ’कार अखंड कार्यरत असून तो मायेशी संबंध जोडून शरिरातील इंद्रियांद्वारे कार्य करतो.

‘ॐ’ हा बीजमंत्र आहे. बीजमंत्राच्या नियमबद्ध जपामुळे त्याची फलप्राप्ती सिद्ध होते. वाणी (वर्ण, शब्द) ‘ॐ’कारापासून निर्माण झाली आहे. वर्णरूपी वाणीला, म्हणजेच मंत्राला (रुग्णांच्या उपचारांसाठी) महत्त्व देणे आवश्यक ठरते. त्यामुळे मंत्रोपायांनी रुग्ण बरे होण्याची परिणामकारकता अधिक असतेे.

२ ए. भारतीय संस्कृतीला महत्त्व न देणे हे दुर्दैव ! : ‘भारतीय संस्कृती’ हेच राष्ट्राचे दैवत आहे. तिला भारतातील स्थानिक लोक महत्त्व देत नाहीत. तिचे महत्त्व जाणून घेत नाहीत. तिला प्राधान्य देत नाहीत. त्यानुसार आचरण करत नाहीत. हे दुर्दैव आहे. केवळ कार्य चालू ठेवण्याचे काम तर कुणीही करू शकेल. त्यासाठी राज्यकारभाराची काय आवश्यकता आहे ? ‘नवीन काही न करता जे आहे, ते त्याच स्थितीत ठेवणे’, एवढेच आताच्या राज्यकर्त्यांचे काम आहे. प्रत्यक्षात त्यांनी सर्व प्रकारे उन्नतावस्था प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असणार्‍या आयुर्वेदाला महत्त्व देऊन त्याचा वापर करण्यास आरंभ केला पाहिजे.

३. भारतात सर्व शास्त्रांची निर्मिती झाली असूनही त्यांचा आधार न घेता पाश्‍चिमात्यांचा आधार घेऊन समस्या सोडवणारे भारतीय !

आपण भौतिकाशी जवळीक साधून स्वतःचेच अकल्याण करून घेत आहोत. कृष्णावतारातून भगवंताने आपल्याला ‘आचरण कसे असावे ?’, याविषयी सांगून ठेवले आहे. न्यायशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी ज्ञान आपल्याजवळ आहेच. ‘भारतातच या सर्व विषयांची (शास्त्रांची) निर्मिती झाली असतांना त्यांचा आधार न घेता पाश्‍चिमात्त्यांचा आधार घेऊन समस्या सोडवणे चालू आहे’, हेच या दोन्ही वृत्तांमधून दिसून येत आहे.’’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(२५.४.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now