आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य हेच खरे साहाय्य ! – सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

फ्रीबर्ग, जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’ या विषयावरील शोधनिबंध सादर

शोधनिबंध सादर करतांना सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

फ्रीबर्ग (जर्मनी) – ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत येथे झालेल्या ‘दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स क्रिस्मस कॉन्फरन्स, फ्रीबर्ग २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ६ डिसेंबर या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, हा शोधनिबंध सादर केला. ‘अलीकडच्या काळात समाजसेवेच्या क्षेत्रात अध्यात्म आणि धर्म यांविषयी संवेदनशील राहून त्यांचा समावेश करण्याकडे कल वाढत आहे. याचा अर्थ ‘समाजसेवक, तसेच ते ज्यांची सेवा करतात त्या व्यक्ती, यांच्या धर्म आणि आध्यात्मिक श्रद्धा यांविषयी संवेदनशील असणे’, असा आहे. ‘अध्यात्म आणि समाजसेवा यांचा काय संबंध आहे ?’, ‘समाजसेवा हे आध्यात्मिक उन्नती करण्याचे प्रभावी माध्यम आहे का ?’ या सूत्रांचा उहापोह करतांना ‘आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य, हेच खरे साहाय्य असते’, असे सौ. किस्लोव्हस्की यांनी सांगितले.

या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, तर सौ. द्रगाना किस्लोव्हस्की आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. फ्रीबर्ग, जर्मनीमधील ‘दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ने या परिषदेचे आयोजन केले होते.

शोधप्रबंधामध्ये सौ. किस्लोव्हस्की यांनी मांडलेली काही महत्त्वाची सूत्रे

१. सोप्या भाषेत सांगायचे, तर ‘मानवाची ईश्‍वराची अनुभूती घेण्यासाठीची धडपड’, म्हणजे अध्यात्म. ही अनुभूती एखाद्या उन्नत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून घेतली जाते. मूलतः हे म्हणजे स्वतःची पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन आत्मा, म्हणजेच प्रत्येकातील ईश्‍वराच्या अंशाची अनुभूती घेणे होय.

२. आजच्या काळात बहुतांश व्यक्ती केवळ स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करतात. इतरांचा विचार करणारे विरळच असतात. त्यामुळे इतरांचा विचार करणे, हे महानतेचे लक्षण आहे, विशेषतः जर समाजसेवा विनामूल्य केली जात असेल तर ! इतरांचा विचार केल्यामुळे काही प्रमाणात आध्यात्मिक उन्नती होते; परंतु समाजसेवक, तसेच ते ज्यांची सेवा करतात, त्या व्यक्तींचीही जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीने समाजसेवेचे अध्यात्मीकरण कसे करू शकतो ? सर्वप्रथम समाजसेवकाने हे समजून घेणे आवश्यक आहे की, लोकांच्या समस्यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारणे असतात, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, अतृप्त पूर्वजांचे सूक्ष्मदेह इत्यादी. जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा त्यावर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे किंवा आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते. समाजसेवेच्या क्षेत्रात याचा अर्थ ‘जी समस्या असेल, त्यावर शारीरिक आणि मानसिक स्तराच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक उपाययोजनाही अनिवार्य आहे’, असा होतो.

३. वैयक्तिक स्तरावरही परिस्थिती आणि व्यक्ती यांच्याप्रती समाजसेवकाने स्वतःची वृत्ती अन् वर्तन यांकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे; कारण आध्यात्मिकदृष्ट्या अनुचित विचार अन् कृती यांमुळे त्याने केलेले सर्व चांगले कार्य निष्फळ होऊ शकते, उदा. अहंकारामुळे आध्यात्मिक उन्नती खुंटित होऊ शकते किंवा अधोगती होऊ शकते, मानसिक स्तरावरील अत्यधिक गुंतवणुकीमुळे आसक्ती निर्माण होते, अपेक्षांमुळे दुःख आणि कर्तेपणा (पहा मी किती केले !) पदरी पडतो आणि यांमुळे नव्याने देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो.

४. मूलभूत आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्या टाळणे, तसेच त्यांवर मात करण्याचा उपाय यांसाठी ज्या धर्मात आपला जन्म झाला असेल, त्यानुसार देवाचा नामजप करणे, हा एक विनामूल्य आणि प्रभावी उपाय असल्याचे आमच्या संशोधनात निष्पन्न झाले आहे. हा उपाय समस्याग्रस्त व्यक्ती, तसेच समाजसेवक यांनीही करणे आवश्यक आहे. अंतिमतः आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य हेच खरे साहाय्य होय; कारण ते व्यक्तीला आपल्या अनिष्ट प्रारब्धाचे बळी होऊ न देता, त्यावर मात करण्यास सक्षम बनवते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now