राहुल गांधी यांनी देशाची आणि सैन्यदलाची क्षमा मागावी ! – भाजप

नवी देहली – राफेल विमानखरेदीच्या प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केवळ धादांत खोटा प्रचार केला. त्यामुळे त्यांनी देशातील जनता आणि सैन्यदल यांची क्षमा मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला ‘क्लीन चीट’ दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

शहा पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी हे ‘चौकीदार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) चोर आहे’, अशी ओरड करत होते; परंतु आज न्यायालयाच्या निर्णयानंतर उघड झाली की, राहुल गांधी यांना देशाच्या चौकीदारापासूनच भीती होती; म्हणूनच त्यांनी चौकीदारावर आरोप केले. या प्रकरणी बेछूट आरोप करणार्‍या राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणातील त्यांचा माहितीचा स्रोत घोषित करावा, तसेच काँग्रेसच्या सत्ताकाळात राफेलचा व्यवहार का अडकवून ठेवण्यात आला होता ?, तेही जनतेला सांगावे. न्यायालयाच्या निर्णयाने ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’, झाले आहे. सूर्यावर कितीही चिखलफेक केली, तरी सूर्याचे तेज तसूभरही अल्प होत नाही. सरकार संसदेत याविषयावर चर्चा करण्यास सिद्ध आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF