विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा वाशी येथे मोर्चा

भाजप सरकारच्या काळातही गोरगरीब, नोकरदारापासून ते अगदी अंगमेहनतीचे काम करणार्‍या कष्टकर्‍यापर्यंत सर्वांनाच हक्काच्या रोजीरोटीसाठी रस्त्यावर यावे लागत आहे. माथाडी कामगारांविषयी जी स्थिती आघाडी सरकारच्या काळात होती, तीच भाजप सरकारच्या काळात असेल, तर येत्या निवडणुकीत जनतेला भाजपलाही नाकारावेसे वाटल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

नवी मुंबई – विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी माथाडी कामगारांनी १२ डिसेंबर या दिवशी माथाडी भवन ते वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्च्याचे नेतृत्व माथाडी नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दोन घंटे ठिय्या मांडून मूक आंदोलन केल्यानंतर मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत या मागण्यांविषयी सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर भविष्यात याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी नरेंद्र पाटील यांनी या वेळी दिली.

महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध भागांतील कामगार सहभागी झाले होते. या वेळी माथाडी कायदा आणि कामगार चळवळ मोडीत काढण्याचा चालू असलेला प्रयत्न निषेधार्ह असल्याचा आरोप माथाडी नेत्यांनी केला.

राज्याचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पणन विभाग यांचा निषेध या प्रसंगी करण्यात आला. महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्या वतीने दोन वर्षांपासून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आंदोलने होत आहेत; परंतु सरकारकडून माथाडी कामगारांना न्याय देण्यात उदासीनता दाखवली जात असल्याचीही खंत काही माथाडी नेत्यांनी या वेळी व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF