रेेल्वे प्रकल्प राबवण्यात वस्तुनिष्ठतेचा अभाव !

पुढील वर्षांत होणार्‍या लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रखडलेल्या प्रकल्पांचे गाजर दाखवणारे लोकप्रतिनिधी ! समस्यांच्या मुळाशी न जाता वरवरची आश्‍वासने देणारे लोकप्रतिनिधी मिळणे ही लोकशाहीची निरर्थकताच होय !

मुंबई – रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी निवडणुकीच्या तोंडावर नुकतीच पश्‍चिम आणि मध्य रेल्वेवरील बारा डब्यांची गाडी पंधरा डब्यांची करणे, परळ टर्मिनस करण्यासह ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग करणे आदी मोठमोठ्या घोषणांची राळ उडवून दिली; परंतु मोठे प्रकल्प राबवतांना जाणवणारी जागेची अडचण, तांत्रिक अडचणी, व्यय पहाता यातील एक तरी प्रकल्प निवडणुकीआधी पूर्ण होईल का, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

गोयल यांनी वरील प्रकल्पांसह वातानुकूलित लोकलगाड्यांच्या कामांना गती देणे, ‘एम्यूटीपी-३ ए’ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संमती मिळवणे याचाही प्रयत्न चालू आहे. रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणे, त्यामुळे नवीन मार्ग, तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणी, विलंबाने धावणार्‍या उपनगरी गाड्या, स्थानकांतील सुविधा यांची ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांकडून फक्त रोषच व्यक्त केला जात आहे.

सर्व उपनगरी गाड्या पंधरा डब्यांच्या करण्याची चाचपणी करण्याच्या सूचना देऊन त्याचा अहवाल सादर करण्यास मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला सांगितले; मात्र जागेची कमतरता, तांत्रिक मुद्दे, खर्च पहाता सर्व उपनगरी गाड्या पंधरा डब्यांच्या करणे अशक्य आहे. चर्चगेट ते वांद्रेपर्यंत फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागाच नसल्याचे रेल्वेचेे अधिकारी सांगतात. पश्‍चिम आणि मध्य रेल्वेवर सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित चालवण्याचा निर्धारही केला असला, तरी प्रत्यक्षात चालू असलेल्या या गाडीकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे बिगर वातानुकूलित अशी बारा डबा अर्धवातानुकूलित उपनगरी गाडी चालवण्याचा विचार चालू आहे. त्यामुळे हे स्वप्न कधी पूर्ण होईल ?, हे सांगता येणे अशक्य आहे.

लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला दिले; मात्र त्यात सुधारणा झालेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF