दोन वेगवेगळ्या विकारांवर परिणाम करणारा राग एकच असला, तरी त्या विकारांच्या संदर्भात तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असणे

‘भारतीय शास्त्रीय संगीतातील एखादा राग दोन वेगवेगळ्या विकारांवरही परिणामकारक असू शकतो. येथे दिलेल्या उदाहरणांमध्ये गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी एखादा राग त्या दोन विकारांसाठी वेगवेगळ्या दिवशी गातांना त्या रागाची एकच बंदीश गायली होती. तरीही त्या रागाने त्या दोन विकारांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे परिणाम केल्याचे दिसून आले. याची माहिती येथे दिली आहे.

१. अपचन आणि पित्त हे विकार दूर करणारा राग वृंदावनी सारंग

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

१ अ. अपचन : अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी वृंदावनी सारंग या रागाने मणिपुर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम करून तेथे उष्णता निर्माण केली. तसेच त्याने अन्ननलिका आणि ओटीपोट यांवरही परिणाम करून संपूर्ण पचन संस्थेवर आध्यात्मिक उपाय केले. त्याने हे कार्य सूर्यनाडीच्या माध्यमातून केले.

१ आ. पित्त : वृंदावनी सारंग या रागाने पित्तविकार दूर करण्यासाठी मणिपुर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम न करता आज्ञाचक्र अन् मुख्यत्वे विशुद्धचक्र यांवर परिणाम केला; कारण पित्तविकारामध्ये घशात जळजळते. त्या रागाने हे कार्य सूर्यनाडीच्या माध्यमातूनच केले.

श्री. प्रदीप चिटणीस

२. पित्त आणि थकवा दूर करणारा राग ललत

२ अ. पित्त : ललत रागाने अनाहतचक्रावर परिणाम करून, तसेच सुषुम्ना नाडी कार्यरत करून पित्ताचा छातीतील जळजळण्याचा त्रास दूर केला. तसेच त्या रागाने मणिपुरचक्रावरही परिणाम करून पित्ताच्या उगमस्थानावरही आध्यात्मिक उपाय केले.

२ आ. थकवा : ललत रागाने सुषुम्ना नाडी कार्यरत करून प्रथम अनाहत, त्यानंतर मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार आणि शेवटी सहस्रार या चक्रांवर परिणाम करून त्यांना चैतन्य अन् थंडावा दिला.

३. थकवा आणि उच्च रक्तदाब दूर करणारा राग यमन

३ अ. थकवा : यमन रागाने अनाहत आणि मणिपुर या चक्रांना शक्ती दिली. तेथून ती स्पंदने अनुक्रमे हातांना आणि पायांना मिळाली. तसेच यमन रागाची स्पंदने देहाच्या पुढील आणि मागील बाजूंमध्येही प्रवाहित झाल्याचे जाणवले. हे कार्य यमन रागाने सुषुम्ना नाडी कार्यरत करून केले.

३ आ. उच्च रक्तदाब : यमन रागाने उच्च रक्तदाब न्यून करण्यासाठी आज्ञा आणि अनाहत या चक्रांना थंडावा देऊन अनुक्रमे बुद्धी अन् मन यांना शांत केले. तसेच त्याने इच्छेचा, म्हणजेच विचारांचा उगम असलेल्या मणिपुरचक्रालाही थंडावा देऊन अकार्यरत केले. या प्रक्रियेतही सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. अशा प्रकारे उद्देशानुरूप भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांचे त्या त्या चक्रांवर आणि शरिराच्या भागांमध्ये आपोआपच आध्यात्मिक उपाय होतात. दोन विकारांवर उपाय करणारा राग एकच असला, तरी तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रक्रियेतील एक साम्य म्हणजे त्या दोन विकारांचे निर्मूलन करतांना त्या दोन्ही वेळी तो राग व्यक्तीची एकच नाडी कार्यरत करतो. त्या दोन विकारांपैकी एका विकारावर उपाय करतांना त्या रागाने व्यक्तीची समजा सुषुम्ना नाडी कार्यरत केली, तर दुसर्‍या विकारावर उपाय करतांना व्यक्तीची सुषुम्ना नाडीच कार्यरत होते.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१.१०.२०१८)

‘नेहमीची औषधे अधिक करून पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असतात, तर संगीत पंचमहाभूतांतील सर्वांत सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने त्याची परिणामकारकता सर्वाधिक असते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF