हिंदु राष्ट्र स्थापन होणे काळाची आवश्यकता आहे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

नंदुरबार येथे आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला २ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

नंदुरबार – भारतातील राज्यकर्त्यांवर दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव वाढलेला असल्याने वर्तमान स्थितीत राष्ट्रभक्त घडवणार्‍या योजनांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चिंतन शिथिल झाले आहे. भारताला आध्यात्मिक नेतृत्व करण्याची क्षमता असतांनाही आध्यात्मिक अंग मृतवत होत चालले आहे. म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन होणे काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष  ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा ९ डिसेंबर या दिवशी जुने पोलीस ग्राउंड येथे पार पडली. ही समितीची नंदुरबार जिल्ह्यातील १५ वी सभा होती. या ऐतिहासिक सभेला श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केलेल्या शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, या जयघोषात ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती श्री. योगेश गव्हाले यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा डॉ. नरेंद्र पाटील यांनी मांडला. सूत्रसंचालन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. सभेला सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. नंदुरबार शहर आणि आजूबाजूच्या खेड्यांतील २ सहस्र १०० धर्माभिमानी महिला आणि पुरुष यांनी या सभेला उपस्थित लावली.

श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल पुढे म्हणाले की,

१. आतंकवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मानवी बॉम्ब बनण्यास सिद्ध असणारी संघटना म्हणजे लष्कर-ए-हिंद ! हिंदू बहुसंख्य असलेल्या हिंदुस्थानात हिंदु आणि हिंदु धर्म दोन्हीही असुरक्षित आहेत. महिलांवरील अत्याचार, मंदिरांवर आक्रमण, संतांना तुरुंगात डांबणे, धर्मप्रेमी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीसारख्या संस्थांवर बंदीची मागणी करणे, यांसारख्या घटना म्हणजे संकटांची पूर्वसूचना आहे. याविषयी ‘भविष्यपुराण’ या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे. तरीही आपण गप्प का बसतो ?,

२. भारतीय वैदिक संस्कृतीचा जगाने स्वीकार केला असून त्यावर जगभर संशोधन होत आहे. नासा संस्थेसह अन्य देश रामसेतू असल्याचे मान्य करत आहेत. भारतीय सहिष्णु आहेत म्हणूनच अन्य धर्मीय भारतातच मोठ्या प्रमाणात रहात आहेत. इस्लामिक देशात अन्य धर्मीय राहूच शकत नाहीत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी खंडेलवाल म्हणाले, ‘ज्याप्रमाणे आपण सायकलवरून जात असतांना एखाद्या चारचाकी मोटारीला धरतो, तेव्हा त्या चारचाकी मोटारीचा वेग सायकलला आपोआपच प्राप्त होतो. त्याचप्रमाणे उपस्थित हिंदूंनी धर्मकार्याला गती प्राप्त करून देण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करा !’’

पुरोगाम्यांचा वैचारिक आतंकवाद सनातन संस्था कदापि सहन करणार नाही ! – अभय वर्तक, सनातन संस्था

पुरोगाम्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा निरपराध हिंदु तरुणांना लक्ष्य करीत आहेत. गेल्या १० वर्षांपासून भारत देश पुरोगामी आतंकवादाला बळी पडत आहे. या पुरोगाम्यांच्या वैचारीक आतंकवादाला सनातन संस्था कदापि सहन करणार नाही. तो सनातन संस्था हाणून पाडेल आणि हिंदु राष्ट्र स्थापन करेल. नालासोपारा स्फोटक सापडल्याच्या प्रकरणात हेतूपुरस्सरपणे सनातन संस्थेचे नाव गोवले जात आहे. पुरोगामी शक्ती बेकायदेशीरपणे त्यासाठी दबाव आणत आहेत. कोणत्याही न्यायालयाचा निकाल येण्याआधीच बंदी आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून आतंकवादविरोधी पथक खोटी विधाने असलेली प्रसिद्धीपत्रके सातत्याने प्रसिद्ध करत आहे. या सर्व त्रासांविरोधात सनातन संस्थेचा लढा सनदशीर मार्गाने चालूच राहील.

‘सेक्युलॅरिझम’मुळे देशाची सर्वांत अधिक हानी झाली ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सुराज्य अभियान’ या विषयावर बोलतांना श्री. जुवेकर म्हणाले, ‘‘शासकीय कार्यालयात देवतांच्या प्रतिमा नसाव्यात, असा आदेश वर्ष २००२ मध्ये काढण्यात आला होता. आता पुन्हा २०१७ ला महाराष्ट्र शासनाच्या एका विभागाने पुन्हा हा आदेश काढला आहे. शासकीय कार्यालयांत जर देवतांच्या प्रतिमा चालत नाहीत; मात्र निधर्मीवाद राबवणार्‍या शासनाला त्याच हिंदु देवतांच्या मंदिरांचा निधी सरकारला कसा चालतो ? हा कोणता निधर्मीवाद आहे ? ‘सेक्युलॅरिझम’ मुळे देशाची सर्वांत अधिक हानी झाली आहे.

ज्या छत्रपती शिवरायांच्या गनिमी युद्धकलेचा सन्मान संपूर्ण जगाने केला, त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचे फलक लावू दिले जात नाहीत. ‘अफझलखान वधाचे फलक लावू नयेत’, असा आदेश कोणत्याही न्यायालयाने दिलेला नाही. अफझलखानाचे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली असंख्य एकर वनजमीन संबंधित समितीने हडपली आहे. ती शासकीय जमीन न्यायालयाने कह्यात घेण्याचे आदेश दिलेले असतांनाही ते मिळवू न शकणारे महाराष्ट्रातील राज्यकर्ते हिंदूंच्या मंदिरांची भूमी कह्यात घेत आहेत.

महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रश्‍न अतिशय गंभीर आहे. तुमच्या आमच्या उंबरठ्यावर धर्मांतर येऊन ठेपले असल्यामुळे आता आपण ‘धर्मातर बंदी कायदा लागू झालाच पाहिजे’, अशी मागणी एकमुखाने करूया !, असे जाहीर आवाहन श्री. जुवेकर यांनी केले.

विशेष

१. सभेला उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

२. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. १६ सहस्रांहून अधिक लोकांनी हे प्रसारण प्रत्यक्ष पाहिले.

३. या वेळी सभेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन, सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष लावण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वंदनीय उपस्थिती

सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच सनातनच्या पू. (सौ.) केवळबाई जामराव पाटील यांची सभेला वंदनीय उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवर

खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित अधिवक्ता

भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित, नगरसेवक श्री. आनंदा माळी, नगरसेवक श्री. नीलेश माळी, अधिवक्ता अनिल लोढा, अधिवक्ता देवेंद्र मराठे, अधिवक्ता शारदा मराठे, अधिवक्ता सुशील गवळी

विशेष सत्कार

अनिल लोढा यांचा सत्कार करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता अनिल लोढा आणि सचिव अधिवक्ता देवेंद्र मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वर्षीच्या गणेशोत्सव काळात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. मयूर चौधरी यांना अन्यायकारकरित्या शहरातून हद्दपार करण्यात आले होते. त्या विरोधात अधिवक्ता लोढा आणि अधिवक्ता मराठे यांनी न्यायालयीन लढा देऊन हद्दपारीचा आदेश रहित करण्यास भाग पाडले.

क्षणचित्रे

१. सभेला ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत येणारी युवकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती.

२. भगवे ध्वज फडकवत आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत येणार्‍या तरुणांमुळे सभास्थळी चैतन्य निर्माण झाले होते.

३. युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.

४. सभेच्या ठिकाणी लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनास आणि सात्त्विक उत्पादन कक्षास चांगला प्रतिसाद मिळाला.

५. सभेच्या प्रारंभापासूनच पोलिसांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

६. या वर्षी प्रथमच पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ ‘मेटल डिटेक्टर’ बसवले होते.

७. सभास्थळाच्या चारही बाजूने मोठ्या संख्येने पोलीस उभे होते.

८. सभेच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत पोलिसांकडून चित्रीकरण करण्यात आले.

९. सभास्थळी पत्रकार कक्षात पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती लक्षणीय होती.


Multi Language |Offline reading | PDF