‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, अधिवेशन, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करा !

साधक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

‘भारतभर विविध ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशने, ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, हिंदूसंघटन मेळावे, वाचक मेळावे, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे. हे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आणि त्यांची पूर्ण फलनिष्पत्ती मिळण्यासाठी या कार्यक्रमांच्या १ – २ दिवस आधीपासून कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत साधकांनी पुढील आध्यात्मिक उपाय करावेत.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. संकटे आणि अडचणी दूर होऊन कार्यक्रमाच्या जागेभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी त्या अनुरूप प्रार्थना श्रीकृष्णाच्या नामजपाच्या मंडलात लिहिणे

कार्यक्रमाचे नियोजन होताच कागदावर प्रथम श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल काढून नंतर त्यामध्ये पुढील प्रार्थना लिहावी, ‘हे श्रीकृष्णा, ‘… या कार्यक्रमात येणारे सर्व अडथळे नष्ट कर. संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे आणि कार्यक्रमाचा उद्देश सफल होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

काही विशिष्ट अडथळे येत असल्याचे लक्षात आल्यास ते दूर होण्यासाठी नामजपाच्या मंडलात प्रार्थना लिहावी.

२. सभागृहात भजने लावणे आणि उदबत्तीने तेथील शुद्धी करणे

कार्यक्रमाच्या ठिकाणच्या वातावरणाच्या शुद्धीसाठी कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी, तसेच कार्यक्रमाच्या वेळी सभागृहात संत भक्तराज महाराज यांची भजने हळू आवाजात लावून ठेवावीत. कार्यक्रम आरंभ होण्यापूर्वी सभागृहाची आणि ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ मैदानात असल्यास तेथील व्यासपिठाची उदबत्तीने शुद्धी करावी. कार्यक्रम चालू असतांना मधे-मधे उदबत्ती लावण्यासाठी एका साधकाचे नियोजन करावे. शक्य असल्यास उपायांसाठी सभागृहाच्या ४ कोपर्‍यांत प्रत्येकी १ खोका लावावा. त्यांची उघडी बाजू सभागृहाच्या दिशेने असावी.

३. सभागृहात दाब जाणवत असल्यास किंवा कार्यक्रमाचे दायित्व असणार्‍या साधकाला काही त्रास होत असल्यास त्याची लिंबाने दृष्ट काढणे

सूक्ष्मातील कळत असलेल्या ६० टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाने किंवा भाव असलेल्या साधकाने कार्यक्रमापूर्वी ३० मिनिटे ‘सभागृहात दाब जाणवतो का ?’, हे पहावे. दाब जाणवत असल्यास सभागृहात व्यासपिठाच्या विरुद्ध दिशेच्या भिंतीजवळ व्यासपिठाकडे तोंड करून उभे राहून एका लिंबाने संपूर्ण सभागृहाची दृष्ट काढावी. दृष्ट काढतांना लिंबू उजव्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ६ वेळा आणि उलट दिशेने ६ वेळा गोल फिरवून दृष्ट काढावी. नंतर ते लिंबू पाण्यात विसर्जित करावे. कार्यक्रमाचे दायित्व असणार्‍या साधकाला काही त्रास होत असल्यास त्याची दृष्टही अशाच पद्धतीने त्याच्यासमोर उभे राहून काढावी.

४. साधक-वक्त्यांना आध्यात्मिक त्रास होऊ नये; म्हणून त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी जवळ (खिशात) लिंबू ठेवणे

कार्यक्रमाला संबोधित करणार्‍या साधक-वक्त्यांना आध्यात्मिक त्रास होऊ नये; म्हणून त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी स्वतःजवळ (खिशात) एक लिंबू ठेवावे आणि स्वतःचे रक्षण होण्यासाठी प्रार्थना करावी. कार्यक्रमानंतर त्यांनी स्वत:जवळील लिंबू वहात्या पाण्यात विसर्जित करावे. वहाते पाणी उपलब्ध नसल्यास लिंबू निर्जन स्थळी टाकावे किंवा तिठ्यावर ठेवावे. लिंबू विसर्जित करण्यापूर्वी त्या लिंबाचा रंग पालटल्याचे, त्याच्यावर आकृती उमटल्याचे अथवा डाग पडल्याचे आढळल्यास त्याचे छायाचित्रकाने किंवा चांगल्या भ्रमणभाषने छायाचित्र काढावे. ते छायाचित्र आणि त्या संदर्भातील अनुभूती, तसेच स्वतःला आपले रक्षण झाल्याची किंवा त्रासदायक अनुभूती आली असल्यास ती लिहून रामनाथी आश्रमात संकलनासाठी पाठवावी. कार्यक्रमाच्या दिवशी साधक-वक्त्यांनी नामजपादी आध्यात्मिक उपायांकडेही लक्ष द्यावे.

‘या समवेतच कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी व्यासपिठावर (दर्शनी भागात येणार नाही, अशा ठिकाणी) लिंबू ठेवावे.

५. अडथळे दूर होण्यासाठी श्रीकृष्णाचा नामजप करणे

कार्यक्रमात पुष्कळच अडथळे येत असल्यास वरील उपायांच्या व्यतिरिक्त ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकाला किंवा संतांना ते अडथळे दूर होण्यासाठी श्रीकृष्णाचा नामजप करण्यास सांगावे.

कार्यक्रमस्थळी या व्यतिरिक्त अन्य काही त्रास जाणवत असल्यास उपायांच्या संदर्भात प्रसारसेवकांना विचारावे.

धर्मप्रेमींच्या संघटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या या कार्यक्रमांत विघ्ने आणण्याचा वाईट शक्ती प्रयत्न करू शकतात. कितीही अडथळे आले, तरी साधकांनी घाबरून जाऊ नये. श्री गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून सर्व आध्यात्मिक उपाय गांभीर्याने आणि भावपूर्ण करावेत.’

धर्मजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनाचे दायित्व असणार्‍या साधकांनी (आयोजन करणार्‍या सेवकांनी) ‘कार्यक्रमस्थळी सर्व आध्यात्मिक उपाय केले जात आहेत ना ?’, याची निश्‍चिती करावी.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now