दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमधून संस्कृतीविरोधी गोष्टींचे प्रसारण

अशा नीतीमत्ताहीन मालिका समाजमनावर कुसंस्कार करून समाजाला अधोगतीकडे नेतात !

पुणे – झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत ४० वर्षीय पुरुष आणि त्याच्या निम्म्या वयाची युवती यांच्यातील प्रेमप्रकरणाचे कथानक आहे. ही मालिका बंद व्हावी, यासाठी नुकतेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्या निमित्ताने मालिकांमधून दाखवल्या जाणार्‍या हिंदु संस्कृतीविरोधी कथानकांचे सूत्र ऐरणीवर आले असून सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून त्याविषयी चर्चा होत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवर्‍याची बायको’, तसेच कलर्स मराठीवरील ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ आणि ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकांविषयीही असाच काहीसा प्रकार होत आहे. विवाहित जोडप्याच्या संसारात नवर्‍यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती आल्यावर होणारी गुंतागुंत आणि त्याचे होणारे विपरीत परिणाम ‘माझ्या नवर्‍याची बायको’ या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहेत. ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिकेत अनिच्छेने विवाह झालेल्या जोडप्याचा घटस्फोट आणि नवर्‍याचे प्रेयसीसोबतचे लग्न आदी गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. ‘राधा प्रेमरंगी रंगली’ या मालिकेतही मालिकेची खलनायिका विवाहित प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीय यांना कशा प्रकारे त्रास देते, हे दाखवण्यात आले आहे. (या मालिकांचा शेवट भले काहीही होवो; पण टीआर्पी वाढवण्याच्या नादात आपण मालिकांमधून काय दाखवत आहोत आणि त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याचा विचारही दिग्दर्शक करत नाहीत का ? समाजाला दिशा देण्याऐवजी सध्या मनोरंजनाच्या नावाखाली वास्तवाला धरून नसलेल्या, तसेच आपल्या रूढी, परंपरा, नीतीमूल्य यांचा र्‍हास करणार्‍या गोष्टी अतिरंजित करून दाखवल्या जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनीच आता या मालिका पहायच्या कि नाही, याचा सूज्ञपणे विचार केला पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF