सामाजिक कार्यासाठी दान : कितपत लाभदायक ?

एका दैनिकाने त्याच्या वाचकांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करून  समाजकार्य करणार्‍या संस्थांना साहाय्य करण्यासाठी देणगी म्हणून दिला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलेल्या एका गांधीवादी समाजसेविकेने आपल्या भाषणात ‘इतर देशांच्या तुलनेत भारतात परोपकाराची परंपरा अल्प असून इतर धर्मांमध्ये जकात, सेवा, लंगर, ऋण माफी अशा अनेक चांगल्या गोष्टी आढळून येत आहेत. यासाठी हिंदूंनी धर्मातील वैयक्तिक मोक्ष आणि वैयक्तिक पुण्य या पलीकडे जाऊन सामाजिक पुण्य अन् सामाजिक विधायक कामांना साहाय्य करावे’, असे आवाहन केले.

इतर पंथांमध्ये ‘भौतिक सुख कसे मिळेल आणि पुण्याने स्वर्ग मिळतो’, एवढेच सांगितले गेले आहे. हिंदु धर्मात स्वर्गाच्या पुढे चिरंतन आनंद देणारा मोक्ष आहे. तो सर्व पाप धुतल्यानंतरच मिळतो. ‘मनुष्याने पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी निष्काम कर्म करावे, दानधर्म हे सत्पात्री असावे’, अशी शिकवण हिंदु धर्म देतो. कोणतेही दान हे कर्तव्यभावनेने आणि समर्पणाने केले, तरच त्याचा उपयोग होतो. भावनेच्या आहारी जाऊन कित्येक जण भिकारी आणि समाजसेवी उपक्रम यांना साहाय्य करतात. आपण भिकारी आणि तत्सम व्यक्तींना पैसे दिल्याने त्यांच्या निकडी तात्पुरत्या दूर होणार असून पुन्हा काही काळाने त्यांना वस्त्र अन् अन्न यांची आवश्यकता भासणार आहे. या जन्मी हे भोग, दु:ख, दारिद्रय, रोग एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला आले. त्याला आर्थिक साहाय्य आपण कुठपर्यंत करणार आणि ते केल्याने त्याची भोगदशा कायमस्वरूपी नष्ट होणार आहे का ?, याचा विचार मानवतावादी विचारवंतांचा कंपू कधी करत नाही.

समाजातील वाढलेल्या समष्टी पापामुळे विविध आपत्तींचा सामना समाजाला करावा लागतो. त्या अल्प करण्यासाठी समष्टी पुण्य वाढवणे, हा एक उपाय आहे. सामान्य माणसाचा यात हातभार लागून परस्परांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी काही संत अन्नदान, भंडारे करायला सांगतात; परंतु समाजसेवी लोकांना यामागचा सूक्ष्म आध्यात्मिक कार्यकारणभाव दिसून येत नाही. समाजसेवा करणार्‍या लोकांमध्ये अहंभाव अधिक दिसून येतो. दिलेल्या देणगीची ते प्रसिद्धी करतात. त्याकरता कार्यक्रम आयोजित करतात. ‘दिलेले दान या हातचे त्या हाताला कळू नये’, असे हिंदु धर्म सांगतो.

‘आतापर्यंत दात्याने धर्माने सांगितलेल्या सत्पात्री दानाऐवजी भावनेच्या आहारी जाऊन समाजकार्य म्हणून करोडो रुपये दान देऊन केलेल्या सामाजिक पुण्याच्या प्रभावामुळे लोकांच्या समस्या, दारिद्य्र, रोगराई, नैसर्गिक आपत्ती यांची तीव्रता अल्प का झाली नाही’, याचे उत्तर समाजसेवकांकडे नाही. त्यांनी ईश्‍वराचे अधिष्ठान ठेऊन धर्माचे अंग म्हणून निष्काम समाजसेवा केली असती, तर दात्याने दिलेल्या दानाचा निश्‍चितच दोघांनाही लाभ झाला असता. हे समजण्यासाठी धर्माचे ज्ञान आवश्यक आहे. ते केवळ धर्मशिक्षणाने मिळू शकेल.

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF