‘होय, मी हिंदू आहे’, असे अभिमानाने आणि ठणकावून सांगा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

शिरोली-पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथील सभेत हिंदुत्वाचे स्फुल्लिगं प्रज्वलीत

• ९५० पेक्षा अधिक धर्मप्रेमींची कृतीशील उपस्थिती

व्यासपीठावर डावीकडून आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे, श्री. मनोज खाडये,आणि दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन

शिरोली-पुलाची (जिल्हा कोल्हापूर), ५ डिसेंबर (वार्ता.) – आज छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, याचे चित्र लावण्यास बंदी केली जात आहे. हिंदूंना त्यांचा जाज्वल्य इतिहास सांगण्यास प्रतिबंध केला जात आहे. आपण इतिहास विसरलो, तर येणार्‍या पिढीला काय सांगणार ? होय, मी हिंदू आहे, असे अभिमानाने आणि ठणकावून सांगण्याची आज वेळ आली आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केले. ३ डिसेंबर या दिवशी श्री बिरदेव मंदिर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

या सभेत हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये, सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेला ९५० पेक्षा अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली.

सभेच्या प्रारंभी मान्यवर वक्त्यांनी धर्मप्रेमींच्या समवेत ग्रामदैवत श्री बिरदेवाचे दर्शन घेतले. सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि सौ. भक्ती मिरजे यांनी केले. प्रारंभी शंखनादानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा सत्कार गाव कामगार पाटील आणि माजी सरपंच श्री. राजेश पाटील यांनी केला. श्री. मनोज खाडये यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच श्री. शशिकांत खवरे, तर आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या सौ. पुष्पा पाटील यांनी केला. या वेळी ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील यांचा विशेष सत्कार अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. नितीन चव्हाण यांनी म्हटलेल्या ध्येयमंत्राने सभेचा समारोप झाला.

विशेष

१. सभेच्या प्रारंभीपासूनच धर्मप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सभा चालू झाल्यावर ती इतकी वाढली की, आसंद्या अपुर्‍या पडल्याने अन्य बैठकव्यवस्था करण्यात आली. तीही अपुरी पडल्याने अनेक धर्मप्रेमींनी उभे राहून सभा ऐकली.

२. सभेसाठी महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. आढावा बैठकीसाठीही काही महिला, युवती शेवटपर्यंत उपस्थित होत्या. सभेसाठी लहान मुलेही उपस्थित होती.

३. सभेचे अनेकांनी ध्वनीचित्रीकरण, तसेच ध्वनीमुद्रण केले.

४. सभेचे ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे प्रक्षेपण करण्यात आल्याने सभा १२ सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचली.

आभार

सरपंच श्री. शशिकांत खवरे यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. श्री. राजेश पाटील यांनी बैठकव्यवस्था, तर सभेसाठी लागणारे अन्य सर्व साहित्य उपसरपंच श्री. सुरेश यादव, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सतीश पाटील, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. नितीन चव्हाण आणि श्री. उन्हाळेबापू यांनी दिले. सर्व हिंदुत्वनिष्ठ, ग्रामपंचायत यांनी सभेसाठी विविध योगदान दिले.

उपस्थित धर्माभिमानी हिंदु

अल्पसंख्यांकांच्या मतांच्या भिकेपोटी देशात कायद्याची काटेकोर कार्यवाही नाही ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदूबहुल देशात हज यात्रेला सवलत दिली जाते, तर प्रयाग येथील कुंभमेळ्याला ४० रुपये अतिरिक्त भार लावण्यात येतो. हिंदू देश चालवण्यासाठी कर देतात, तर मंदिरे चालवण्यासाठी देणगी देतात. असे असतांना राज्यकर्ते हिंदूंच्या मंदिरांचा पैसा विकासाच्या नावाखाली वापरतात. अल्पसंख्यांकांच्या मतांच्या भिकेपाटी देशात कायद्याची काटेकोर कार्यवाही होत नाही, हे आपले दुर्दैव आहे !

श्री. मनोज खाडये यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. हिंदु जनजागृती समिती घेत असलेल्या सभा या राजकीय नसून त्या गेली १० वर्षे चालू आहेत. हिंदु जनजागृती समिती घेत असलेल्या सभांच्या काळात निवडणुका येतात. त्यामुळे निवडणुकांशी आम्हाला काहीएक देणेघेणे नसून हिंदु राष्ट्र हेच आमचे ध्येय आहे.

२. राजकीय क्षेत्रात धर्मांधांच्या मतांसाठी त्यांच्याविषयी आत्मियता बाळगली जाते. ‘हिंदु-मुस्लीम, भाई-भाई’, असे शिकवले जाते. हिंदु धर्मात ‘वसुधैव कुटुम्बकम्’, अशी शिकवण असल्याने राजकीय लोकांनी आम्हाला कोणासमवेत मैत्री करावी, हे शिकवू नये.

उपस्थित मान्यवर

पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष श्री. अंबादास खवरे, शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख सौ. रूपाली खवरे, शाहू दूध संघाचे माजी अध्यक्ष श्री. सुभाष चौगुले, उपसरपंच श्री. सुरेश यादव, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री संतोष चव्हाण, अण्णा सावंत, रणजित कदम, नितीन चव्हाण, अर्जुन चौगुले, धोंडीराम चौगुले

सभेनंतरची आढावा बैठक !

सभेनंतरच्या आढावा बैठकीत धर्मप्रेमी युवती कु. राजलक्ष्मी कदम हिने गावात स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. या बैठकीत ६ जानेवारीला कोल्हापूर येथे होणार्‍या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘विवाहप्रसंगी, तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये धर्मप्रसार करा, धर्मशिक्षणाचे फलक लावा’, अशा सूचना धर्मप्रेमींना या प्रसंगी केल्या.

अधिवक्ता समीर पटवर्धन यांना धर्मप्रेमींकडून छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट !

अधिवक्ता समीर पटवर्धन (डावीकडे) यांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करतांना शिरोली येथील धर्मप्रेमी

हिंदुत्वाचे विशेष कार्य करत असल्याविषयी शिरोली येथील धर्मप्रेमींनी अधिवक्ता समीर पटवर्धन यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. या सत्कारानंतर अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘लहानपणापासूनच मला हिंदु धर्मासाठी प्राणांचे बलीदान देणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विशेष आकर्षण आहे. हे छायाचित्र मिळाल्याने मी सद्गदित झालो.’’

या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले, ‘‘कॉ. पानसरे हत्या प्रकरणात धर्मप्रेमी श्री. अमोल काळे यांना अटक करून कोल्हापुरात आणण्यात आले. त्या वेळी त्यांच्या त्यांच्या तोंडवळ्यावर काळे कापड घातले होते. त्या वेळी पत्रकारांनी श्री. अमोल काळे यांना ‘तुम्ही हिंदु आतंकवादाचे पुरस्कर्ते आहात का ?’, असे विचाल्यावर श्री. अमोल काळे यांनी पोलिसांच्या गराड्यात बाणेदारपणे ‘हिंदू आतंकवादी असू शकत नाही आणि मला हिंदु असल्याचा सार्थ अभिमान आहे’, असे उत्तर दिले. जर श्री. अमोल काळे इतक्या बिकट परिस्थितीत ठामपणे उत्तर देऊ शकतो, तर हाच आदर्श हिंदूंनीही समोर ठेवून आपण हिंदु असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.’’


Multi Language |Offline reading | PDF