संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी अपचनाचा त्रास दूर होण्यासाठी गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या लक्षात आलेली सूत्रे

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री. प्रदीप चिटणीस

‘श्री. प्रदीप चिटणीस यांनी अपचनाचा त्रास दूर होण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मालकंस हे ३ राग गायले. यांतील प्रत्येक रागाचा अपचनावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो. हे राग अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. राग वृंदावनी सारंग

अ. वृंदावनी सारंग राग आरंभ होण्यापूर्वी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. राग आरंभ झाल्यावर मला मणिपूरचक्रावर स्पंदने जाणवू लागली.

इ. पुढे ती स्पंदने स्वाधिष्ठानचक्रावरही जाणवू लागली.

ई. ‘वृंदावनी सारंग हा राग मणिपूर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम करून तेथे उष्णता निर्माण करत आहे’, असे जाणवले. तेव्हा माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

उ. त्या चक्रांवर परिणाम करून झाल्यावर वृंदावनी सारंग रागाची उष्ण स्पंदने वर छातीपर्यंत पसरली; पण ती अनाहतचक्रावर परिणाम करत नव्हती. ती स्पंदने अन्ननलिकेमध्ये पसरत असल्याचे जाणवले. त्याच वेळी मला ओटीपोटातही उष्ण स्पंदने जाणवत होती. याचा अर्थ वृंदावनी सारंग रागाने संपूर्ण पचन संस्थेवर परिणाम केला.

ऊ. वृंदावनी सारंग रागाचा परिणाम पूर्ण झाल्यावर मला माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोनच मिनिटांनी रागगायन संपले.

२. राग शुद्ध सारंग

२ अ. राग आरंभ झाल्यावर लगेचच सुषुम्ना नाडीला आरंभ होणे : शुद्ध सारंग राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत होती. राग आरंभ झाल्यावर लगेचच सुषुम्ना नाडीला आरंभ झाला.

२ आ. मणिपूरचक्रावर थोडी उष्ण स्पंदने जाणवणे : माझ्या मणिपूरचक्रावर परिणाम होऊ लागला. तो परिणाम मला दाबाच्या स्वरूपात जाणवला. त्या वेळी मला मणिपूरचक्रावर थोडी उष्ण स्पंदने जाणवत होती.

२ इ. गळा ते खाली पोटापर्यंत अशी वरून खाली उपाय करणारी थोडी उष्ण स्पंदने पुनःपुन्हा जाणवू लागणे : त्यानंतर लगेचच मला गळ्यामध्ये स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने धिम्या गतीने अन्ननलिकेमधून खाली सरकू लागली. शुद्ध सारंग रागाने अन्न जठरामध्ये जाण्याच्या मार्गावर उपाय केल्याचे जाणवले. गळा ते खाली पोटापर्यंत अशी वरून खाली उपाय करणारी स्पंदने पुनःपुन्हा जाणवू लागली. ती स्पंदने थोडी उष्ण होती.

२ ई. श्‍वासाची गती संथ होणे आणि शुद्ध सारंग रागाचे गायनही संथ असणे : माझ्या श्‍वासाची गती संथ झाली होती, तसेच माझी सुषुम्ना नाडी अजूनही कार्यरत होती. शुद्ध सारंग रागाचे गायनही संथ आहे.

२ उ. पोटामध्ये थंड स्पंदने जाणवू लागणे आणि त्यानंतर रागाचा विशेष काही परिणाम न जाणवणे : रागगायन १३ मिनिटे झाल्यावर मला पोटामध्ये थंड स्पंदने जाणवू लागली. त्यानंतर शेवटपर्यंत मला माझ्यावर रागाचा विशेष काही परिणाम जाणवला नाही.

२ ऊ. सुषुम्ना नाडीमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेजतत्त्वाचे किंवा वायुतत्त्वाचे कार्य करण्याची क्षमता असणे : सूत्र ‘२ इ, २ ई आणि २ उ’ यांवरून लक्षात येते, ‘सुषुम्ना नाडी आवश्यकतेप्रमाणे उष्ण स्पंदनेही निर्माण करू शकते, तसेच थंड स्पंदनेही निर्माण करू शकते. सुषुम्ना नाडीमध्ये आवश्यकतेप्रमाणे कार्य करण्याची क्षमता आहे; म्हणून सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांपेक्षा सुषुम्ना नाडीला अधिक महत्त्व आहे.’ अध्यात्मात उन्नती केलेल्यांमध्ये सुषुम्ना नाडी अधिक वेळ कार्यरत असते. सामान्य माणसामध्ये १ घंटा चंद्रनाडी आणि १ घंटा सूर्यनाडी, असे आलटून पालटून २४ घंटे चाललेले असते अन् जेव्हा चंद्रनाडी थांबून सूर्यनाडी आरंभ होते किंवा सूर्यनाडी थांबून चंद्रनाडी आरंभ होते, तेव्हा मधल्या परिवर्तनाच्या २ ते ४ मिनिटांच्या कालावधीत सुषुम्ना नाडी कार्यरत असते.

२ ए. शुद्ध सारंग रागाच्या गायनामुळे नाडीचे ठोके तेवढेच रहाणे : शुद्ध सारंग राग आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ५८ होते. राग संपल्यावर ते तेवढेच राहिले होते.

३. राग मालकंस

३ अ. मालकंस रागाचा आरंभ झाल्यावर ४ मिनिटांतच सुषुम्ना नाडी कार्यरत होणे : मालकंस रागाचा आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत होती. राग आरंभ झाल्या झाल्या माझी चंद्रनाडी कार्यरत होऊ लागली. त्यानंतर ४ मिनिटांतच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

३ आ. मालकंस रागाने अनाहत ते मूलाधार पर्यंतच्या सर्व चक्रांवर आध्यात्मिक उपाय करणे; पण आज्ञा आणि सहस्रार या चक्रांवर मात्र परिणाम न करणे; कारण या चक्रांचे पचनकार्याच्या दृष्टीने काही महत्त्व नसणे अन् यावरून अध्यात्मात अनावश्यक गोष्टींसाठी शक्ती व्यय (खर्च) होत नसल्याचे लक्षात येणे : मला छातीमध्ये थंडावा जाणवू लागला. मला पायांच्या तळव्यांपर्यंत थंड स्पंदने जाणवू लागली. तेव्हा मला अनाहत ते मूलाधारपर्यंतच्या सर्व चक्रांवर थंडावा जाणवत होता. या रागाने आज्ञा आणि सहस्रार या चक्रांवर मात्र परिणाम केला नाही; कारण या चक्रांचे पचनकार्याच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. यावरून लक्षात येते की, अध्यात्मात अनावश्यक गोष्टींसाठी शक्ती व्यय (खर्च) होत नाही.

३ इ. मन शांत होऊन ध्यान लावावेसे वाटणे : माझे मन शांत झाले. मान खाली झुकू लागली आणि मला ध्यान लावावेसे वाटू लागले.

३ ई. मालकंस रागाच्या गायनाच्या शेवटी सुषुम्ना नाडी पालटून सूर्यनाडी आरंभ होणे आणि यावरून ‘अन्नपचन सुधारण्याचे आध्यात्मिक कार्य केल्यावर अन्नपचनाचे शारीरिक कार्य करण्यासाठी पुन्हा सूर्यनाडी आरंभ झाली’, हे लक्षात येणे : मला विशुद्धचक्रावर स्पंदने जाणवू लागली. तेव्हा माझी सूर्यनाडी आरंभ झाली होती. मला शरिरात थोडी उष्णता जाणवू लागली. तेव्हा रागगायन संपले. यावरून लक्षात येते, ‘अन्नपचनासाठी सूर्यनाडीची आवश्यकता असते. त्यामुळे अन्नपचन सुधारण्याचे आध्यात्मिक कार्य केल्यावर अन्नपचनाचे शारीरिक कार्य करण्यासाठी पुन्हा सूर्यनाडी आरंभ झाली.’ यावरून देवाचे कार्य कसे अचूकतेने चालू असते, ते समजते.

३ उ. मालकंस रागाचे गायन ऐकल्यामुळे नाडीचे ठोके न्यून होणे : मालकंस राग आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६४ होते. रागगायन संपल्यावर ते ६० झाले होते. या रागाने कुंडलिनीचक्रांना थंडावा देण्याचे कार्य केल्याने असे झाले.

४. वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मालकंस या रागांच्या परिणामांचा सारांश

अपचन दूर करण्यासाठी वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मालकंस या तिन्ही रागांनी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केले. ते पुढीलप्रमाणे आहे.

४ अ. वृंदावनी सारंग : या रागाने सूर्यनाडीद्वारे उष्णता देऊन मणिपूर आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर परिणाम केला, तसेच संपूर्ण पचन संस्थेवर परिणाम केला.

४ आ. शुद्ध सारंग : याही रागाने संपूर्ण पचनसंस्थेवर कार्य केले; पण ते सुषुम्ना नाडीद्वारे केले. त्यामुळे ते अधिक आध्यात्मिक स्तराचे होते.

४ इ. मालकंस : या रागाने पचनसंस्थेवर परिणाम न करता तिच्याशी संबंधित विशुद्ध ते मूलाधार या चक्रांवर मुख्यत्वे सुषुम्ना नाडीद्वारे परिणाम केला, म्हणजेच आध्यात्मिक उपाय केले.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१.१०.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now