कै. सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) यांच्या सूक्ष्मातील अस्तित्वाच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुषमा पेडणेकर यांना आलेल्या अनुभूती

कै. सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले

१. ‘सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांची आठवण झाल्यावर ते आजूबाजूलाच आहेत’, असे वाटणे आणि ते सहजपणे बोलत असल्याने त्यांच्याशी अनुसंधान साधणे सोपे जाणे

‘सद्गुरु (कै.) अप्पाकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची मला आठवण झाल्यावर ‘ते माझ्या आजूबाजूलाच आहेत’, असे मला वाटते. तसेच ‘त्यांचा तोंडवळा आनंदी आहे’, असे मला जाणवते. ‘ते माझ्याशी सहजतेने बोलत आहेत’, असेही मला जाणवते. त्यामुळे मला त्यांच्याशी सहजतेने अनुसंधान साधता येते. ‘सद्गुरु (कै.) अप्पाकाका आपल्यापासून कुठेतरी दूर गेले आहेत’, असे न वाटता ते ‘आपल्यातच आहेत’, असे मला वाटते.

कु. सुषमा पेडणेकर

२. सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांना ते अध्यात्मात उशिरा आल्याची खंत असणे, आध्यात्मिक जीवन जगण्याची त्यांची तळमळ आणि जिज्ञासू वृत्ती यांमुळे त्यांनी अल्प वेळेत संतपद प्राप्त करणे अन् देहत्यागानंतरही ते लगेचच सद्गुरुपदी विराजमान होणे

‘सेवेनिमित्त माझा सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संपर्क होत असे. त्या वेळी ते मला म्हणायचे, ‘‘तुम्ही तरुणपणी अध्यात्मात आला आहात. मी तर माझे सर्व जीवन व्यवहारात घालवले. मी पुष्कळ उशिरा अध्यात्मात आलो. माझ्याकडे वेळ अल्प आहे आणि या अल्प वेळेतच मला ते सर्व साध्य करून आध्यात्मिक जीवन जगायचे आहे.’’ त्यांच्या बोलण्यातून मला ‘ते उशिरा अध्यात्मात आले आहेत’, याची त्यांना खंत वाटत असल्याचे जाणवले, तसेच त्यांची आध्यात्मिक जीवन जगण्याची तळमळही मला जाणवली. सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांनी त्यांच्यात असलेल्या जिज्ञासू वृत्तीमुळे अल्प काळात संतपद प्राप्त केले आणि देहत्यागानंतरही ते लगेचच सद्गुरुपदी विराजमान झाले.

३. सकाळी उठल्यावर परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना प्रार्थना करतांना सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांची आठवण होऊन त्यांचा हसरा तोंडवळा डोळ्यांसमोर दिसणे, ‘आता त्यांची पुण्यतिथी असेल’, असा विचार मनात येणे आणि दुपारी दैनिक सनातन प्रभात वाचतांना त्याच दिवशी त्यांची पुण्यतिथी असल्याचे समजणे

१४.११.२०१८ या दिवशी सकाळी उठल्यावर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करत होते. त्या वेळी मला सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांची आठवण झाली आणि त्यांचा हसरा तोंडवळा माझ्या डोळ्यांसमोर दिसला. ‘आता त्यांची पुण्यतिथी असेल’, असा विचार माझ्या मनात आला. दुपारी मी दैनिक सनातन प्रभातचे वाचन करायला घेतल्यावर मला सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांची त्याच दिवशी पुण्यतिथी असल्याचे समजले.

४. सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांनी प.पू. गुरुमाऊलींसारखे हावभाव करत आणि हसत ‘आम्हाला तुम्ही प्रिय आहात’, असे सांगितल्यावर ‘कशी होऊ मी उतराई’ ही भजनाची ओळ आठवून मन कृतज्ञतेने भरून येणे

‘त्यानंतर मी ‘सद्गुरु (कै.) अप्पाकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना म्हणाले, ‘सद्गुरु अप्पाकाका, तुम्ही स्थुलातून आमच्यात नसतांना सूक्ष्मातून सतत मी तुमच्यासमवेत असल्याची मला प्रचीती येत आहे. माझी पात्रता नसतांना तुम्ही माझ्याशी बोलता आणि मला पुष्कळ प्रेम देता. यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. जशी प.पू. गुरुमाऊली मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे, तसेच तुम्हीही आहात. त्या वेळी प.पू. गुरुमाऊली जसे हावभाव करते आणि हसत सांगते, तसे हावभाव करत अन् हसत सद्गुरु अप्पाकाका मला म्हणाले, ‘आम्हालाही तुम्ही प्रिय आहात !’ त्यानंतर ते अदृश्य झाले. त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर मी भारावून गेले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ‘होऊ कशी मी उतराई’ ही भजनाची ओळ आठवून मन कृतज्ञतेने भरून आले.’

– कु. सुषमा पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now