परात्पर गुरु डॉक्टर आठवले विष्णुस्वरूप असल्याविषयी साधकाला मिळालेल्या पूर्वसूचना

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. हनुमंत करंबेळकर

१. कार्यालयात जात असतांना दुकानातील शेषशायी विष्णूच्या चित्राकडे लक्ष वेधले जाणे

१ अ. शेषशायी विष्णूचे चित्र विकत घेऊन घरातील भिंतीवर लावणे, काही वर्षांनी ते चित्र खराब झाल्यावर विसर्जित करणे : ‘वर्ष १९८५ मध्ये मी कार्यालयात ज्या मार्गावरून जात असे, त्या मार्गावर एका तसबिरींचे दुकान होते. त्या दुकानात एक शेषशायी विष्णूचे चित्र लावलेले होते. पुष्कळ दिवस ते मला आकर्षित करत होते. पंधरा दिवसांनी मी ते चित्र विकत घेतले आणि घरातील बाहेरच्या खोलीत दर्शनी भागात लावले. आमच्याकडे ते चित्र सुमारे १५ वर्षे होते. त्यानंतर ते आतून थोडे खराब झाल्याने विसर्जित करावे लागले.

१ आ. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी विष्णूच्या रूपात दर्शन झाल्यावर ‘गुरुदेवांनी त्यांच्या विष्णुस्वरूपाची पूर्वीच जाणीव करून दिली होती’, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटणे : ७.५.२०१८ या गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी साधकांना त्यांचे विष्णूच्या रूपात दर्शन झाले. त्या वेळी मला घरात पूर्वी लावलेल्या शेषशायी विष्णूच्या चित्राचे स्मरण झाले. ‘गुरुदेवांनी मला त्यांच्या विष्णुस्वरूपाची पूर्वीच जाणीव करून दिली होती’, हे लक्षात येऊन माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतापूर्वक अश्रू आले.

२. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे वारंवार श्रीविठ्ठलाच्या रूपात दर्शन होणे आणि त्यामागचे कारण गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या दिवशी कळणे

२ अ. कार्यालयात जातांना डोळे मिटून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार केल्यावर डोळ्यांसमोर गुरुदेवांचे रूप न येता श्री विठ्ठलाचे रूप दिसणे : वर्ष १९९८ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन साधना करू लागलो. त्यापूर्वी १२ वर्षे मी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि पोथीवाचन करत असे.

संस्थेत आल्यानंतर काही मासांनी (महिन्यांनी) मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणले. मी कार्यालयात जातांना डोळे मिटून गुरुदेवांना नमस्कार करून जात असे. डोळे मिटल्यावर गुरुदेवांचे रूप डोळ्यांसमोर यावे, यासाठी मी हा प्रयत्न करत असे; परंतु गुरुदेवांच्या ठिकाणी मला श्री विठ्ठलच दिसत असे. मला त्यामागील कार्यकारणभाव समजत नसे.

२ आ. मला त्या प्रसंगाचा गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या कार्याक्रमाच्या वेळी उलगडा झाला. तेव्हा मला जाणवले, ‘पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष पांडुरंग स्वत: अवतरले, तसेच आम्ही सर्व साधक आणि धर्मप्रेमी यांचा उद्धार करण्यासाठी विष्णुस्वरूप गुरुमाऊली अवतरली आहे.’

परात्पर गुरुदेवांनीच सर्व प्रसंगाचे कोडे उलगडून दिले, याबद्दल मी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

– श्री. हनुमंत करंबेळकर, रत्नागिरी (२२.८.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now