आपण जन्माने हिंदू असलो, तरी कर्माने हिंदू होणे आवश्यक आहे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

पनवेल येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

आधुनिक वैद्य उदय धुरी

पनवेल, ४ डिसेंबर (वार्ता.) – शिर्डी येथील साई संस्थानकडून राज्य सरकारला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. पूर्वीचे राजे मंदिरात हस्तक्षेप न करता मंदिराला दान करत होते, पण आताचे शासनकर्ते भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाची वारंवार लूट करत आहेत. भारतामध्ये मंदिरांचे सरकारीकरण जलद होतेे; पण एकाही चर्च किंवा मशिदीचे सरकारीकरण ऐकिवात नाही. जोपर्यंत हिंदूंचे संघटन होत नाही, तोपर्यंत हिंदु राष्ट्र येणे शक्य नाही. आपण जन्माने हिंदू असलो, तरी कर्माने हिंदू होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले. २ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील विसपुते फार्मसी कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हे उपस्थित होते. देवद येथील सनातनच्या आश्रमाच्या उभारणीस साहाय्य केल्याविषयी श्री. अभय वर्तक यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

सभेला देवद गावच्या सरपंच सौ. करुणा वासुदेव वाघमारे, देवद गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप वाघमारे यांचीही उपस्थिती लाभली. १४० धर्मप्रेमींनी या सभेचा लाभ घेतला. श्री. धनराज विसपुते यांनी सभेसाठी महाविद्यालयाचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. सभेनंतर झालेल्या बैठकीत २० धर्माभिमानी सहभागी झाले. धर्मासाठी प्रतिदिन १ घंटा तरी वेळ देणे आवश्यक आहे, यावर सर्वांनी एकमत दर्शवले.

मंदिरांच्या निर्माणकार्यात अडथळे येतात; पण चर्च; तसेच मशिदी पेव फुटल्याप्रमाणे निर्माण होतात ! – अभय वर्तक, सनातन संस्था

देवद-विचुंबे गावकर्‍यांचे भाग्य आहे की, येथे हाकेच्या अंतरावर सनातनचा आश्रम आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या निर्माण कार्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. मंदिरांच्या निर्माणकार्यात अनेक अडथळे येतात; पण पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात चर्च तसेच मशिदी पेव फुटल्याप्रमाणे निर्माण होतात. उल्हासनगर येथे दीड लाख सिंधी हिंदु बांधवांचे धर्मांतर झाले, हे हिंदूंसाठी घातक आहे.


Multi Language |Offline reading | PDF